भारतीय परंपरेतील श्री गुरूंची विविध रूपे, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि गुरुतत्त्वाच्या सर्व गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारे ‘परम गुरु’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

२१ जुलै २०२४ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भारतीय संस्कृतीमध्ये श्री गुरु आणि श्री गुरूंची परंपरा यांना पुष्कळ महत्त्व आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत  आठवलेरूपी गुरूंची महती वर्णावी तेवढी अल्पच आहे; तरीही माझ्या अल्पशा बुद्धीला जे उमजले, ते मी श्री गुरुचरणी अर्पण करत आहे. १७ जुलै या दिवशी या लेखातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/814913.html

४. दीक्षागुरु

शक्तीपातयोगानुसार साधना करणार्‍या जिवाला जेव्हा श्री गुरूंकडून दीक्षा मिळते, तेव्हा त्याची सुप्तावस्थेत असणारी कुंडलिनीशक्ती जागृत होते. अशा प्रकारे शिष्याला शक्तीपातयोगाची दीक्षा देऊन त्याला शिष्य म्हणून स्वीकारणार्‍या श्री गुरूंना ‘दीक्षागुरु’ असे म्हणतात, उदा. जेव्हा आद्यगुरु शंकराचार्य भारत भ्रमण करत होते, तेव्हा त्यांनी ‘गिरी’ नावाच्या मूढ मती व्यक्तीला दीक्षा देऊन त्याला शिष्य म्हणून स्वीकारले. दीक्षा दिल्यामुळे त्याची कुंडलिनीशक्ती जागृत झाली आणि त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. तेव्हा त्यांनी एक भावपूर्ण अष्टक रचले. जेव्हा आद्यगुरु शंकराचार्य यांनी हे अष्टक (आठ श्लोकांचे स्तोत्र) ऐकले, तेव्हा ते गिरीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी ‘गिरीचे’ नामकरण ‘तोटकाचार्य’ केले. त्यानंतर तोटकाचार्यांनी रचलेले अष्टक हे ‘तोटकाष्टक’ म्हणून प्रसिद्ध झाले.

५. गुणगुरु

सुश्री (कु.) मधुरा भोसले

सृष्टीच्या चराचरामध्ये वावरणार्‍या प्रत्येक जिवाकडून आपण काही ना काही शिकू शकतो. ‘प्रत्येक जिवातील गुण किंवा अवगुण ओळखून त्यातून योग्य तो बोध घेणे’, याला ‘चराचरातील प्रत्येक जिवाकडून शिकणे’, असे म्हणतात. त्यामुळे प्रत्येक जीव हा दुसर्‍यासाठी ‘गुणगुरु’ असतो, उदा. भगवान दत्तात्रेय हे स्वत: मूर्तीमंत गुरु असूनही त्यांनी कीटकपतंगापासून अजगरापर्यंत ४ गुरु आणि २४ उपगुरु करून प्रत्येकातील गुण आणि अवगुण हेरून त्यातून शिकले होते. हे सर्व त्यांचे गुणगुरु होतो.

६. अनुभवीगुरु

ज्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळते त्यांना ‘अनुभवीगुरु’ म्हणतात, उदा. महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण पांडवांसह शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांचे दर्शन घेण्यासाठी कुरुक्षेत्रावर येतात, तेव्हा ते युधिष्ठिराला भीष्माचार्यांकडून अनुभवाचे बोल शिकण्यास सांगतात. तेव्हा भीष्माचार्य श्रीकृष्णाला विचारतात,‘‘भगवान तुम्ही परम ज्ञानी असतांना युधिष्ठिराला माझ्याकडून शिकण्यासाठी का सांगत आहात ?’’, तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘माझ्याकडे ज्ञान आहे; पण तुमच्यासारखा अनुभव नाही. त्यामुळे मी युधिष्ठिराला तसे सांगितले.’’ तेव्हा भीष्माचार्य युधिष्ठिराला स्वत:कडून राजधर्माचे पालन करतांना ‘भीष्म प्रतिज्ञेपोटी हस्तिनापूर राज्याचे विभाजन करणे, दुर्याेधनाच्या सांगण्यावरून दु:शासन कुलवधु द्रौपदीचे वस्त्रहरण करत असतांना मूग गिळून गप्प रहाणे, महाभारताच्या युद्धात अधर्माची म्हणजे कौरवांची साथ देणे’, यांसारख्या त्यांच्याकडून झालेल्या अक्षम्य चुकांचा अपराधबोधाने उल्लेख करून ‘एखाद्या राजाने योग्य प्रकारे राजधर्माचे पालन कसे करावे’, याचे ज्ञान देतात.

७. उपायगुरु

काही गुरु त्यांच्या जवळ येणारे पीडित आणि दु:खीजन यांना त्यांच्या आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक समस्यांवर विविध प्रकारचे उपाय सांगून त्यांना मार्गदर्शन करत असतात. समाजातील अनेक संत हे ‘उपायगुरु’ होऊन समाजाचे दु:ख हरण करतात. जेव्हा देवतांवर असुरांमुळे संकटे येतात, तेव्हा देवता ‘शिव’  किंवा ‘विष्णु’ यांना शरण जातात. तेव्हा शिव किंवा विष्णु त्यांना विविध प्रकारचे उपाय सांगून त्यांची समस्या सोडवतात. अशा प्रसंगांत शिव किंवा विष्णु हे ‘उपायगुरु’ बनून देवतांना मार्गदर्शन करत असतात, उदा. सनातन संस्थेतील सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ हे साधकांना होणार्‍या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा विविध प्रकारच्या त्रासांवर विविध देवतांचे आणि तत्त्वांचे नामजप, न्यास अन् मुद्रा शोधून उपाय करण्यास सांगतात.

८. मंत्रगुरु

जे गुरु मंत्र देऊन शिष्याचा उद्धार करतात, त्यांना ‘मंत्रगुरु’ म्हणतात.

उदा. १. शिवाने बाल मार्कण्डेयाला ‘महामृत्यूंजय’ हा महामंत्र देणे :  बाल मार्कण्डेयाच्या प्रारब्धात अपमृत्यूयोग होता. त्यामुळे जेव्हा १२ वर्षांच्या बाल मार्कण्डेयाचा मृत्यू समीप आला, तेव्हा त्याने शिवाची अखंड आराधना चालू केली. तेव्हा शिवाच्या कृपेने त्याला महामृत्यूंजय या महामंत्राचे ज्ञान झाले. त्यानंतर बाल मार्कण्डेयाने अरण्यात जाऊन महामृत्यूंजय मंत्राचा जप अखंड चालू केला. त्यामुळे जेव्हा यम त्याचे प्राणहरण करण्यासाठी आला, तेव्हा अरण्यात साक्षात् शिव प्रगट झाले आणि त्याने बाल मार्कण्डेयाचे रक्षण करून त्याला सात कल्पांतापर्यंत चिरंजीवी होण्याचे वरदान दिले. शिवाच्याच कृपेने मार्कण्डेयऋषि अमर झाले आणि त्यांनी मार्कण्डेय पुराण अन् देवीच्या ‘सप्तशती’ या ग्रंथाची निर्मिती केली.

उदा. २. महर्षि दुर्वासांनी कुंतीला देवतांना वश करणारे वशीकरणाचे मंत्र देणे : कुंतीने दुर्वासऋषींची मनोभावे सेवा केल्यामुळे दुर्वासऋषींनी तिला ‘देवतांना वश करण्याचे’, म्हणजे ‘वशीकरणाचे’ विविध मंत्र दिले होते. या मंत्रांचा प्रयोग केल्यामुळे कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर, पवनदेवापासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन हे पुत्र लाभले. तसेच तिने हे मंत्र तिची सवत माद्री हिलाही दिले. त्यामुळे माद्रीला ‘दस्त्र आणि नासत्य’ या अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव या पुत्रांची प्राप्ती झाली.

 ९. उपास्य गुरु

काही वेळा भक्तांची भक्ती आणि त्यांची तीव्र जिज्ञासा यांच्यावर प्रसन्न होऊन भक्तांच्या उपास्य देवता त्यांना दिव्य ज्ञान देतात. अशा वेळी संबंधित उपास्य देवतांना ‘उपास्य गुरु’ असे संबोधले जाते, उदा. नचिकेताच्या तीव्र जिज्ञासेपोटी यमधर्माने त्याला अध्यात्माचे गूढ ज्ञान आणि आत्मज्ञान दिले. द्वापरयुगामध्ये श्री गणेशाचा ‘गजानन’ हा अवतार झाला होता. त्याने सिंधुरासुराचा वध केला. श्री गणेशाने त्याचा परम भक्त असणार्‍या वरेण्या राजाला योगमार्गप्रकाशक, सर्वसिद्धिदायक, अज्ञाननाशक आणि मनुष्यजीवनाचे उद्दिष्ट सांगणारी ‘गणेशगीता’ सांगितली.

१०. शक्तीगुरु

ज्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे किंवा उपासनेमुळे जिवाचा खचलेला आत्मविश्वास जागृत होऊन त्याची आत्मशक्ती प्रगट होते, त्याला ‘शक्तीगुरु’ म्हणतात, उदा. जेव्हा इंद्रजिताने प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यावर नागपाश टाकून त्यांना बेशुद्ध पाडले, तेव्हा संपूर्ण वानरसेना खचून गेली होती. तेव्हा हनुमानाने संपूर्ण वानरसेनेला धीर देऊन तिचे मनोबळ वाढवले. त्यामुळे संपूर्ण वानरसेनेत शक्तीचा नवसंचार होऊन ती रावणाच्या सेनेशी युद्ध करू लागली. आताही हनुमंताच्या भक्तीमार्गीय बलोपासनेमुळे खचलेल्या व्यक्तींचा आत्मविश्वास जागृत होऊन ते बलसंपन्न होतात.

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०२३)     (क्रमश:)

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.