२१ जुलै २०२४ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…
‘भारतीय संस्कृतीमध्ये श्री गुरु आणि श्री गुरूंची परंपरा यांना पुष्कळ महत्त्व दिलेले आहे. किंबहुना ‘गुरु’ हा शब्द ऐकताच मनामध्ये गुरुरूपी परमेश्वराप्रतीचा आदरभाव, कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव यांसारखे भाव जागृत होऊन मन गुरुभक्तीने भरून येते. अशा ‘श्री गुरूंचे कृपाशीर्वाद लाभावेत’, असे साधक आणि शिष्य यांना वाटते. त्यामुळेच संत एकनाथ महाराजांनी श्री गुरूंचे महत्त्व विशद करतांना म्हटले आहे होते, ‘गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ।।१।।’ म्हणजे ‘गुरु हा साक्षात् परमात्माच आहे, असा दृढ विश्वास शिष्याचा हवा. तसेच श्री. शंकर वैद्य यांनी म्हटले आहे, ‘गुरुविण नाही दुजा आधार !’, म्हणजे ‘गुरूंविना शिष्याला अन्य कुणाचाही आधार वाटत नाही. अशा श्री गुरूंची कार्यानुमेय असंख्य रूपे असून ती विश्वकल्याणार्थ अविरतपणे कार्यरत असतात. गुरुतत्त्व हे अवतार, देवता, ऋषिमुनी आणि भक्त यांच्या माध्यमातून विविध प्रसंगी कार्यरत होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेरूपी गुरूंची महती वर्णावी तेवढी अल्पच आहे; तरीही माझ्या या अल्पशा बुद्धीला जे उमजले ते मी लेखरूपाने शब्दबद्ध करून भक्तीभावाने श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. गुरु
जेव्हा एखादा जीव ७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठतो, तेव्हा तो ‘संत’ होतो. जेव्हा त्याची आध्यात्मिक पातळी ७५ होते, तेव्हा तो गुरुपदी विराजमान होतो. ‘गुरुपदी’ विराजमान झाल्यानंतर तो जीव अन्य जिवांना साधना करून मुक्ती आणि मोक्ष यांची प्राप्ती करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करत असतो, उदा. गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांना आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून त्यांची आध्यात्मिक उन्नती करवून घेतली.
२. कुलगुरु
जे गुरु एखाद्या कुळाचे संपूर्ण उत्तरदायित्व सांभाळतात, त्यांना ‘कुलगुरु’ असे संबोधले जाते. कुलगुरु कुळातील प्रत्येक व्यक्तीकडून कुलाचाराचे पालन करून तिच्याकडून धर्माचरण करवून घेतात. कुलगुरु संपूर्ण कुळाची ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती करवून घेण्यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, उदा. गर्गमुनी हे यादव कुळाचे आणि शांडिल्यऋषि हे नंदकुळाचे कुलगुरु होते. गर्गमुनींनी बाळकृष्ण बाळबलराम यांचे नामकरण केले होते. दोन्ही ऋषि संबंधित कुळातील व्यक्तींकडून धर्माचरण आणि साधना करवून घ्यायचे.
३. योगगुरु
जे गुरु त्यांच्या शिष्यांना ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, ध्यानयोग, हठयोग, शक्तीपातयोग इत्यादी योगमार्गांनुसार साधना करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात, त्यांना ‘योगगुरु’ म्हणतात, उदा. पतंजलिऋषींनी योगसाधना करून त्यांच्या शिष्यांना त्यांच्या प्रकृतीनुसार शक्तीपातयोग, ज्ञानयोग इत्यादी योग शिकवले. पतंजलिऋषींनी विविध प्रकारची योगासने शोधून त्यातून ‘अष्टांगयोग’ (यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी) शिकवले आणि हठयोगाने ईश्वरप्राप्ती करण्याचा मार्ग दाखवला. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अष्टांगयोगानुसार साधना करण्यासंदर्भातही मार्गदर्शन केले होते. कलियुगात दत्तावतारी संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनीही योगसाधनेविषयी अनेक शिष्यांना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मोत्कर्ष केला.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०२३) (क्रमश:)
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/815292.html