पुणे येथे ३ लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक सेवेतून बडतर्फ !

सौजन्य : पोलीसनामा संकेतस्थळ

पुणे – नोंद केलेल्या गुन्ह्यातील कारवाई टाळण्यासाठी ३ लाख रुपयांची लाचेची मागणी करणार्‍या पोलीस उपनिरीक्षक तानाजी शेगर याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. पुणे पोलीस आयुक्तालयातील चंदननगर पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस होते. त्यांच्यावर १७ मे या दिवशी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर १९ मे या दिवशी त्यांना निलंबित करण्यात आले होते.

हडपसर विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त या प्रकरणाची चौकशी करत होते. चौकशीसाठी उपस्थित रहाण्यासाठी शेगर यांना वेळोवेळी नोटीस बजावण्यात आली; मात्र ज्या वेळी नोटीस घेऊन पोलीस कर्मचारी घरी जात होते, त्या वेळी शेगर घरी उपस्थित नसायचे. त्यामुळे एकतर्फी चौकशी होऊन शेगर दोषी आढळले. त्याखेरीज शेगर यांच्याकडे असलेल्या अन्वेषणाच्या गुन्ह्यांत त्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले होते.

संपादकीय भूमिका :

पोलिसांनी लाच मागणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय !