प्रत्येक गडावरील अतिक्रमण हटवणे ही सरकारची भावना ! – गृहमंत्री

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – विशाळगडावरील अतिक्रमण हटवले गेलेच पाहिजे, ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती; मात्र अतिक्रमण हटवतांना ते कायद्याने-नियमाने हटवले गेले पाहिजे, अशी सरकारची भावना आहे. सध्या सरकारच्या वतीने अतिक्रमण हटवण्यात येत असून ही प्रक्रिया चालूच राहील. आताच्या परिस्थितीत शांतता प्रस्थापित करणे अपेक्षित आहे. केवळ विशाळगडावरील नाही, तर राज्यातील प्रत्येक गडावर असलेले अतिक्रमण हटवण्याची सरकारची भावना आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. त्यामुळे तेथील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात केवळ एका समुदायाची मते मिळवण्यासाठी जर राजकारण होत असेल, तर ते दुर्दैवी आहे. विशाळगडावरील अतिक्रमण जर हटवले जात असेल, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटात का दुखत आहे ? महाविकास आघाडीने हे स्पष्ट केले पाहिजे की, ते गडावर अतिक्रमण करून हिरवे झेंडे लावणार्‍यांच्या बाजूने आहेत कि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूने आहेत?’’