श्रीमती आदिती देवल (वय ६६ वर्षे) यांचा १७.७.२०२४ या दिवशी निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या श्रीमती आदिती देवल यांना मी प्रत्यक्ष कधीच भेटलो नाही; परंतु लिखाणाच्या संकलनासंबंधीची सेवा करतांना माझा त्यांच्याशी ‘व्हॉट्सॲप’च्या लघुसंदेशाद्वारे काही वेळा संपर्क झाला. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सतत शिकण्याच्या स्थितीत असणे
मी केलेले लिखाण श्रीमती देवलकाकूंकडे संकलनासाठी गेल्यावर त्या मला ‘व्हाट्सॲप’द्वारे लघुसंदेश पाठवून शंका आणि लिखाणाविषयी काही स्पष्टीकरण असल्यास विचारून घ्यायच्या. त्या वेळी माझी चूक दाखवण्याऐवजी त्या स्वतः शिकण्याच्या स्थितीत असायच्या. त्यामुळे मला माझी चूक लक्षात येऊन शिकायला मिळायचे. त्यांचे लघुसंदेश वाचल्यावर मला त्यांचा ‘साधेपणा’, ‘नम्रता’ आणि ‘कृतज्ञताभाव’ जाणवत असे.
२. संकलनाची सेवा अभ्यासपूर्वक आणि परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी करणे
देवलकाकूंनी माझ्या साधनाप्रवासाचे प्राथमिक संकलन पुष्कळ चांगल्या प्रकारे केले होते. ‘संकलन ही गुरुसेवा अधिकाधिक चांगली कशी होईल’, असा विचार करून त्या सेवा करत. त्यासाठी त्या पुष्कळ वेळ देऊन, तळमळीने आणि अभ्यासपूर्वक सेवा करत. लिखाणाचे संकलन करतांना त्या व्याकरणाच्या दृष्टीने परिपूर्ण, वाचकांचा विचार करून, समष्टीला लाभदायक आणि गुरूंना अपेक्षित अशा प्रकारे सेवा करत असत.
३. चूक लक्षात आणून दिल्यास ती त्वरित कृतज्ञतापूर्वक स्वीकारणे
काकूंना सेवेत त्यांच्याकडून झालेली एखादी चूक लक्षात आणून दिल्यास त्या ती त्वरित स्वीकारत असत, उदा. एकदा प्रकाशित झालेल्या एका लेखातील त्यांची चूक मी त्यांना ‘व्हॉट्सॲप’वरून कळवली. त्या वेळी त्यांनी मला ‘कृतज्ञता पू. काका, माझी चूक मला लक्षात आणून दिलीत. असेच आपले लक्ष असावे आणि मला साहाय्य व्हावे, ही प्रार्थना’, असा लघुसंदेश पाठवला.
कै. (श्रीमती) आदिती देवल यांची गुणवैशिष्ट्ये जेवढी वर्णावी, तेवढी अल्पच आहेत. ‘त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या गुरुछत्राखाली सिद्ध झालेल्या अत्यंत गुणी साधिका होत्या’, असे मला वाटते. त्यांची ‘आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.७.२०२४)