श्री शांतादुर्गा सेवा समितीच्या वतीने जलाभिषेक सोहळा
कुंकळ्ळी, १५ जुलै (वार्ता) – येथील श्री शांतादुर्गा सेवा समितीच्या वतीने १५ जुलै १५८३ या दिवशी पोर्तुगीज शासनाने चालवलेल्या धर्मच्छळाविरुद्ध आवाज उठवणार्या कुंकळ्ळीच्या १६ महानायकांना मानवंदना देण्यासाठी जलाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुंकळ्ळीच्या गावकर्यांचा हा उठाव युरोपीय वसाहतवादाविरुद्ध केलेला आशिया खंडातील पहिला उठाव होता. भारत सरकारने या उठावाला ‘गोवा राज्य राष्ट्रीय युद्ध स्मारक दिवस’, असे घोषित केले आहे. गेल्या ६ वर्षांपासून श्री शांतादुर्गा सेवा समिती हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचावा या उद्देशाने जलाभिषेक तथा व्याख्यान आयोजित करत आहे.
गोव्यातील विविध मंदिरांतून आणलेल्या जलकलशांतून या स्मारकाला जलाभिषेक करण्यात आला. यावर्षी गोव्यातील सुप्रसिद्ध मूर्तीकार आणि इतिहासकार श्री. सचिन मदगे यांचे ‘कुंकळ्ळीचा अपरिचित इतिहास’ या विषयावर व्याख्यान झाले. हा कार्यक्रम कुंकळ्ळी महानगरपालिकेच्या शेजारी असलेल्या कुंकळ्ळी महानायक स्मारकाच्या आवारात दुपारी ३.३० वाजता झाला.
या कार्यक्रमास रा.स्व. संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख नीलेश भास्कर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश संघटन मंत्री नीरज चौधरकर, बजरंग दलाचे क्षेत्रीय पदाधिकारी, आणि गोवा राज्य पुराभिलेख अन् पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘ज्यांनी धर्मरक्षणासाठी बलीदान दिले, ते महान हुतात्मे होते. त्यांना आदरांजली वहाण्यासाठी हा जलाभिषेक सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहाणे हे मी माझे भाग्य समजतो. हा इतिहास बरीच वर्षे लुप्त होता; कारण सत्य समोर आणायला काही लोक घाबरतात. हिंदूंची धर्मस्थळे उद्ध्वस्त करणार्या पोर्तुगीज सत्तेला नामोहरम करण्यासाठी या कुंकळ्ळीच्या १६ महानायकांनी केलेल्या धाडसाला तोड नाही. विद्यार्थ्यांनी हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.’’
विश्व हिंदु परिषदेचे श्री. मारुति मतलापूरकर यांनी कुंकळ्ळीचे १६ धर्मवीर हे आद्य धर्मरक्षकच होत ! त्यांनी धर्मासाठी बलीदान केले. त्यांचे स्मरण प्रत्येक हिंदूने करायलाच हवे. त्यांच्याकडून युवा पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे, असे विचार व्यक्त केले.
कुंकळ्ळीवासियांनी पोर्तुगिजांच्या विरोधात ४ शतके लढा दिला ! – सचिन मदगे, इतिहासतज्ञ
प्रमुख वक्ते इतिहासतज्ञ श्री. सचिन मदगे म्हणाले, ‘‘गोव्याचे आद्य क्रांतीकारक असे या १६ महानायकांना म्हटले पाहिजे. कुंकळ्ळीवासियांनी पोर्तुगिजांच्या विरोधात ४ शतके लढा दिलेला आहे. हा कुंकळ्ळीचा अपरिचित इतिहास आहे. वर्ष १५६० मध्ये कुंकळ्ळीच्या मंदिरांवर पोर्तुगिजांनी घाला घातला, तेव्हापासून येथील धर्मनिष्ठांनी पोर्तुगिजांशी संघर्ष केला. वर्ष १६७५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कुंकळ्ळीला आल्याची नोंद आहे. कुंकळ्ळी आणि असोळणा या गावांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन पोर्तुगिजांच्या विरोधात अनेक वेळा बंड पुकारले होते. कुंकळ्ळी आणि असोळणा या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी सतत पोर्तुगिजांना जेरीस आणले. येथील ग्रामस्थांनी श्री शांतादुर्गादेवीला मस्तकी धरून स्वातंत्र्याचे आणि धर्मजागृतीचे कार्य केले आहे. त्यांना आपण आज मानवंदना दिली आहे. हा इतिहास समजून घेणे आणि युवक-युवतींनी धर्मरक्षक बनणे, ही काळाची आवश्यकता आहे.’’
शेवटी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
१६ महानायकाच्या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम लवकरच चालू होणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी – कुंकळ्ळीच्या १६ महानायकांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम लवकरच चालू होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ जुलै या दिवशी विधानसभेत दिले. कुंकळ्ळीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी स्मारकाच्या नूतनीकरणाच्या काम लवकर हाती घेण्याची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ जुलै या दिवशी सकाळी ११.३० वाजता विधानसभेचे कामकाज चालू झाल्यानंतर प्रथम १५ जुलै १५८३ या दिवशी १६ महानायक आणि कुंकळ्ळीवासीय यांनी पोर्तुगीज शासनाने चालवलेल्या धर्मच्छलाच्या विरोधात केलेल्या उठावाच्या स्मृतींना उजाळा दिला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ महानायकांना मानवंदना !
कुंकळ्ळी – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंकळ्ळीच्या १६ महानायकांना मानवंदना देतांना समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी कुंकळ्ळी येथील स्मारकावर जलाभिषेक केला.
या ठिकाणी समितीच्या वतीने गोव्यावर पोर्तुगिजांनी लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयीचे (धर्मच्छळाविषयीचे) फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. पुराभिलेख अन् पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासह अनेकांनी या फलक प्रदर्शनाला भेट देऊन ते पाहिले.