माळशिरस (सोलापूर) येथे पालखी रिंगण सोहळ्यात घोडा अंगावर पडल्याने छायाचित्रकाराचा मृत्यू !

प्रतिकात्मक चित्र

माळशिरस (सोलापूर) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील पुरंदवडे येथील पहिल्या गोल रिंगणात स्वाराचा अश्व अंगावर पडल्याने बंगालमधील एका मुक्त छायाचित्रकाराचा मृत्यू झाला. कल्याण चट्टोपाध्याय असे मृत्यू झालेल्या छायाचित्रकाराचे नाव आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. छायाचित्रकार चटोपाध्याय बंगालमधून छायाचित्र काढण्यासाठी ११ जुलै या दिवशी आले होते. रिंगण चालू असतांना रिंगण आखलेल्या ठिकाणी ते कडेला बसले होते. रिंगण चालू असतांना माऊलींच्या अश्वाच्या लगामीत स्वाराच्या अश्वाचा पाय अडकला आणि स्वाराचा अश्व रिंगणाच्या कडेला बसलेल्या भाविकांच्या गर्दीत तोल जाऊन पडला. या वेळी चटोपाध्याय अश्वाच्या अंगाखाली आले. गंभीर घायाळ झालेल्या चटोपाध्याय यांच्या तोंडातून रक्त आले.

घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि स्वयंसेवक यांनी त्यांना अकलूज येथे उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात नेले. तेथील आधुनिक वैद्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.