भाव म्हणजे काय ?

भाव हा शब्‍द ‘भा’ आणि ‘व’ या २ अक्षरांनी बनला आहे. यातील ‘भा’ म्‍हणजे तेज आणि ‘व’ म्‍हणजे वृद्धी करणारा. ज्‍याच्‍या जागृतीने आपल्‍यामध्‍ये तेजतत्त्वाची वृद्धी होते, तो ‘भाव’ ! तेजतत्त्व हे ईश्वराच्‍या रूपाशी संबंधित आहे.
(संदर्भ : संकेतस्थळ Sanatan.org) 

संत भक्तराज महाराज,

भावामुळे जगाकडे पहाण्याची दृष्टी पालटते !

भाव म्‍हणजे सतत ईश्वराच्‍या रूपाची म्‍हणजेच अस्तित्त्वाची जाणीव असणे. संतांना ईश्वराच्‍या अस्तित्त्वाची जाणीव असल्‍याने ते सतत भावावस्‍थेत असायचे. भावामुळे स्‍थूल देहाची, तसेच मनाची शुद्धी होते. देहातील रज-तमाचे प्रमाण न्‍यून होऊन सत्त्वगुण वाढतो. नामजपादी उपाय केल्‍याने जेवढा आध्‍यात्मिक लाभ होतो, तेवढाच भावजागृतीनेही होतो. भावामुळे संपूर्ण जगाकडे बघण्‍याची दृष्‍टीच प्रेमळ आणि सकारात्‍मक होते.

(संदर्भ : संकेतस्थळ Sanatan.org)

मानसपूजा म्‍हणजे काय ?

मानसपूजा म्‍हणजे काय ? तर देवता किंवा गुरु यांच्‍या रूपाची मनाने कल्‍पना करून सर्व पूजा उपचार देवाला अर्पण करून जी पूजा केली जाते ती म्‍हणजे मानसपूजा. मानसपूजेला स्‍थळ, काळाचे बंधन नाही. आपण प्रतिदिन देवाची जी पूजा करतो, ती स्‍थूल पूजा असते. स्‍थूलरित्‍या पूजा करत असतांना काही वेळा आपले मन अन्‍य गोष्‍टींकडे जाऊ शकते. याउलट मानसपूजा सूक्ष्म स्‍तरावरची आहे.

मानसपूजा करतांना डोळे बंद करून आपल्‍या कुलदेवीचे रूप आपल्‍या डोळ्‍यांसमोर आणावे. ज्‍यांना कुलदेवी ठाऊक नाही, त्‍यांनी अष्‍टभुजा दुर्गादेवीचे रूप डोळ्‍यांसमोर आणूया. पूजेला आरंभ करण्‍यापूर्वी आपण देवीला संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करूया, ‘हे माते, या अज्ञानी लेकराला तुझी मानसपूजा करायची आहे. हे देवी, ही पूजा कशी करायची ?, ते मी जाणत नाही; पण हे देवी तूच या पामर जिवावर कृपा कर. मला तुझे दर्शन दे.’ आपण आर्तभावाने प्रार्थना केल्‍यावर श्री दुर्गादेवी प्रत्‍यक्ष आपल्‍यासमोर अवतरित होत आहे. आईचा चेहरा प्रसन्‍न असून ती आपल्‍याला आशीर्वाद देत आहे. देवीच्‍या पूजेसाठी आपण सर्व सिद्धता केली आहे. सुवर्णसिंहासन, सोन्‍याचे तबक, सोन्‍याच्‍या परडीत फुले, रत्नजडित ताह्मण आणि कलश, सोन्‍याची ५ निरांजने अन् मोठ्या वाट्यांत हळद-कुंकू घेतले आहे. मी देवीला सुवर्णसिंहासनावर विराजमान होण्‍याची प्रार्थना करत आहे. देवी सिंहासनावर आसनस्‍थ होत आहे. देवीचे चरण ठेवण्‍यासाठी मी रत्नजडित ताह्मण घेतले आहे. मी देवीचे चरण दोन्‍ही हातांत धरून ताह्मणात ठेवत आहे. प्रत्‍यक्ष देवीच्‍या चरणांना स्‍पर्श करण्‍याचे भाग्‍य मिळाल्‍याने मला सद्गतीत वाटत आहे. देवीच्‍या चरणांतून मला पुष्‍कळ चैतन्‍य मिळून माझ्‍या भोवतीचे त्रासदायक आवरण नष्‍ट होत आहे. मी एका सोन्‍याच्‍या कलशात कोमट सुगंधी जल घेतले आहे. आता त्‍या कोमट जलाने मी देवीच्‍या चरणांना स्नान घालत आहे. नंतर पंचामृताने अभिषेक करत आहे. त्‍यानंतर पुन्‍हा कोमट जलाने देवीच्‍या चरणांना स्नान घालत आहे. आता ताह्मण बाजूला ठेवून मी मऊ रेशमी वस्‍त्राने देवीचे चरणकमल हळूवारपणे पुसत आहे. आता देवीच्‍या दोन्‍ही चरणांवर मी ओल्‍या लाल कुंकवाने स्‍वस्तिक काढत आहे. त्‍यावर अक्षता अर्पण करत आहे. बाजूला चांदीच्‍या उदबत्तीच्‍या घरात २ सुवासिक उदबत्त्या लावल्‍या आहेत. निरांजन लावले आहे.

सोन्‍याच्‍या ताह्मनात असलेल्‍या सोन्‍याच्‍या वाट्यांत हळद-कुंकू, केशर, अष्‍टगंध अन् कस्‍तुरी आहे. ते मी देवीच्‍या कपाळावर अलगद लावत आहे. देवीला कुंकू लावतांच बोटातून प्रचंड मोठा शक्तीचा झोत माझ्‍या शरिरात जात आहे. आता मी देवीला आवडणारी मोगरा, कमळ, चाफा, बकुळी इत्‍यादी सुवासिक फुले तिच्‍या चरणी अर्पण करत आहे. देवीला फुले अर्पण केल्‍यावर फुलांचा घमघमाट येत आहे. आता मी पंचारतीने देवीला ओवाळत आहे. ज्‍योतीच्‍या प्रकाशात देवीचे रूप अतिशय तेजस्‍वी दिसत आहे. आता मी देवीला पुरणाच्‍या पोळीचा नैवेद्य दाखवत आहे आणि देवीला तो नैवेद्य ग्रहण करण्‍यासाठी शरणागतभावाने प्रार्थना करत आहे. आता अत्‍यंत उत्‍कट भावाने मी देवीची आरती करत आहे. आरती करून झाल्‍यावर संपूर्णपणे शरणागतभावाने देवीच्‍या चरणांवर माथा टेकवत आहे. देवीच्या एका कृपाकटाक्षाने माझ्‍या सर्व दुःखांचा नाश झाला आहे. आई तिचा प्रेमळ वरदहस्‍त माझ्‍या डोक्‍यावर ठेवून मला आशीर्वाद देत आहे. पूजा झाल्‍यावर देवी अंतर्धान पावत आहे. मला मानसपूजा करण्‍याची संधी दिल्‍याविषयी मी देवीच्‍या चरणी अनन्‍यभावे कृतज्ञता व्‍यक्त करत आहे. आता हळूहळू डोळे उघडावेत.

अशा प्रकारे आपण गुरुदेवांची किंवा इष्‍टदेवतेची प्रतिदिन मानसपूजा करू शकतो.

(संदर्भ : संकेतस्थळ Sanatan.org)

भावाचे महत्त्व !

‘भावात आनंद आहे. भावानंतर शांतीचा टप्पा आहे. भावाच्या स्थितीत जाणे अवघड असते. सतत शरणागतभावाने प्रयत्न करायला हवेत. भावाच्या स्तरावर असणार्‍या साधकांची प्रार्थना देव ऐकणारच ! भाव-भक्ती वाढली की, शक्ती वाढते. पुढील आपत्काळात ज्यांच्यात शारीरिक बळ आहे, ते प्रत्यक्ष कृती करतील. ज्यांच्यात बौद्धिक बळ आहे, ते नियोजन करतील आणि या दोघांनाही चैतन्य पुरवण्याचे कार्य भाव असणारे, म्हणजेच आध्यात्मिक बळ असणारे साधक करतील; मात्र त्या वेळी हे चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता साधकांत असायला हवी. त्यासाठी आता नामजप आणि साधना करणे आवश्यक आहे.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले   

भाव आणि भक्ती दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू !

संत कबीर

संत कबीर यांनी त्यांच्या सुंदर अशा दोह्यांमधून भाव आणि भक्ती यांविषयी पुष्कळ सुंदर वर्णन केले आहे. ते पुढीलप्रमाणे

भाव बिना नहिं भक्ति जग, भक्ति बिना नहीं भाव ।
भक्ति भाव एक रूप हैं, दोऊ एक सुभाव ।।

अर्थ : भाव (प्रेम) बिना भक्ति नहीं होती, भक्ति बिना भाव (प्रेम) नहीं होते । भाव और भक्ति एक ही रूप के दो नाम हैं, क्योंकि दोनों का स्वभाव एक ही है ।

उत्कट भावालाच भक्ती म्हणतात. भक्ती निर्माण होण्यासाठी भगवंताप्रती भाव असायला हवा. त्यामुळे दोन्हीत वेगळे असे काही भेद नाही. त्या माध्यमातून आपल्यात भगवंताविषयीचे प्रेम असते. त्याच्यावरील असलेल्या प्रेमापोटी आपण सर्व काही करत असतो.
(संदर्भ : सनातनचा भक्तीसत्संग)

संत नामदेवांचा उत्कट भाव !

संत नामदेव

संत नामदेव लहान असतांना एकदा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी विठ्ठालाच्या  देवळात गेले होते. ‘देवाला नैवेद्य दाखवायचा; म्‍हणजे देवाने तो प्रत्‍यक्ष खायला हवा’, असे नामदेवांना वाटायचे. देवाने नैवेद्य घेतल्‍याविना परत जायचेच नाही; या भावाने ते भगवंताने नैवेद्य ग्रहण करण्‍याची वाट पहात बसले; पण देव काही प्रगटला नाही. ‘देवाने नैवेद्य ग्रहण केला नाही, तर मी प्राणत्‍याग करीन’, असे नामदेवाने देवाला सांगितले. तरीही देवाने नैवेद्य घेतला नाही. अखेर संत नामदेव खरोखरच प्राणत्‍याग करण्‍यासाठी निघाल्‍यावर मूर्तीतून पांडुरंग अवतरित झाले. नामदेवाच्‍या भक्तीपायी देवाला प्रगट व्‍हावे लागले आणि नैवेद्य ग्रहण करावा लागला. (संदर्भ : संकेतस्थळ Sanatan.org)

‘समष्टी भक्त’ प्रल्हाद !

‘भक्ती म्हणजे निरपेक्ष समर्पण.’ जो निरपेक्षपणे गुरूंनी सांगितलेले व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करतो, तो समष्टी भक्त होतो. समष्टी भक्ताचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ‘भक्त प्रल्हाद.’ भक्त प्रल्हाद श्रीविष्णुभक्तीचा प्रसार करायचा; म्हणून त्याचे वडील असलेल्या राक्षस हिरण्यकश्यपूने त्याला जिवे मारण्याचे अनेक प्रयत्न केले. असे असूनही प्रल्हाद निरंतर हरिनामस्मरणात गुंग असायचा. त्याला ‘देवाने माझे रक्षण करावे’, अशी अपेक्षाही नव्हती. अशा प्रकारे निरपेक्ष व्यष्टी साधना (नामजप) आणि समष्टी साधना (अध्यात्मप्रसार) यांमुळे प्रल्हाद ‘समष्टी भक्त’ झाला. त्याच्यात धर्मराज्य चालवण्याची क्षमता निर्माण झाली, तसेच तो ईश्वरेच्छेशीही एकरूप झाला. त्यामुळे ज्या वेळी हिरण्यकश्यपूच्या पापांचा घडा भरला, त्या वेळी प्रल्हादच भगवंताला आवाहन करण्याचे माध्यम झाला आणि त्याच्या भक्तीमुळे स्वतः श्रीविष्णुच उग्र नृसिंह रूप धारण करून प्रल्हादाने सांगितलेल्या खांबातून प्रगट झाला. भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाला राज्यकारभार दिला, म्हणजे धर्मसंस्थापना केली आणि तो अंतर्धान पावला.

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.