Democratic Polity : संसद आणि विधीमंंडळे या लोकशाहीच्‍या मंदिरांचे पावित्र्यभंग होत आहे ! – जगदीप धनखड, उपराष्‍ट्रपती  

उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड

मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – सध्‍या आपली संसद आणि विधीमंडळे यांचे कामकाज सुरळीत होत नाही, हे उघड आहे. या सर्व ठिकाणी चाललेल्‍या कामकाजात रणनीती आखून व्‍यत्‍यय आणणे आणि तेथे अशांतता पसरवून एकप्रकारे लोकशाहीच्‍या मंदिरांचे पावित्र्यभंग केले जात आहे. पक्षांमधील संवाद संपला आहे. भाषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे, हे अयोग्‍य आहे. भारत वर्ष २०४७ पर्यंत विकसित राष्‍ट्र बनण्‍याच्‍या मार्गावर आहे. या प्रवासात राज्‍य विधीमंडळांचे सदस्‍य (आमदार) आणि संसदेतील सदस्‍य (खासदार) हे सर्वांत महत्त्वाचे चालक आहेत. खासदारांनी चांगले उदाहरण देऊन नेतृत्‍व केले पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड यांनी येथे केले.

उपराष्‍ट्रपतींनी ११ जुलै या दिवशी महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळाला सदिच्‍छा भेट दिली. विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. या वेळी महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल रमेश बैस, विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेे अंबादास दानवे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड म्‍हणाले की,

१. राष्‍ट्र तेव्‍हाच प्रगती करते, जेव्‍हा त्‍याच्‍या विधीमंडळ, न्‍यायपालिका आणि कार्यपालिका या ३ शाखा आपापल्‍या क्षेत्रात कार्य करतात. एका संस्‍थेने दुसर्‍याच्‍या कार्यक्षेत्रात घुसखोरी केल्‍याने गोष्‍टी बिघडण्‍याची शक्‍यता असते. विधीमंडळाने हा नाजूक समतोल राखला पाहिजे.

२. विधीमंडळांमध्‍ये लोकशाही मूल्‍ये, तसेच संसदीय परंपरांचे कठोर पालन करणे आवश्‍यक आहे. आपल्‍या विधीमंडळाच्‍या कामकाजात लक्षणीय नैतिक घसरण झाली आहे.

३. सभागृहाचे अध्‍यक्ष अथवा प्रमुख यांच्‍यावर सोयीस्‍कररीत्‍या शाब्‍द़िक आक्रमणे करत रहाण्‍याची पद्धत चिंताजनक आहे. आपल्‍या संसदीय संस्‍थेला चुकवावी लागणारी ही मोठी किंमत आहे.

४. सभागृहात सदस्‍यांमध्‍ये मैत्री आणि सलोखा नसणे हा चिंतेचा विषय आहे. विनोदबुद्धी, उपहास आणि व्‍यंग हे एकेकाळी विधीमंडळातील कामकाजात अमृतासारखा गोडवा आणत. यापासून आपण आता दुरावत आहोत.

५. सर्व राजकीय पक्षांनी आत्‍मपरीक्षण करावे आणि आपापसांत गांभीर्याने विचारविनिमय करावा. संसदीय कामकाजाचा दर्जा सुधारावा.

६. एकमत आणि सहकार्य हे आपल्‍या विधीमंडळाच्‍या कामकाजाचे प्रमुख अंग असले पाहिजे. प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्‍व आणण्‍यासाठी विधीमंडळाचे प्रभावी कामकाज हा सर्वांत खात्रीशीर मार्ग आहे.

७. योग्‍य वर्तन आणि शिस्‍त हे लोकशाहीचे हृदय अन् आत्‍मा आहे. संवाद, वादविवाद, चर्चा आणि विचारविनिमय यातून समृद्ध होणारी ही प्रणाली आहे.

८. सभागृहातील वादविवाद, संवाद, विचारविनीमय आणि चर्चा यांना दिलेले प्राधान्‍य कामकाजात व्‍यत्‍यय अन् अडथळा आणण्‍यात रूपांतरीत झाले आहे. भारतीय राजकीय व्‍यवस्‍थेला हे अनुसरून नाही.