मुंबई येथे आदिवासींच्या भूमी हडप करणारी यंत्रणा कार्यरत ! – प्रवीण दरेकर यांचा गंभीर आरोप

चौकशी समिती नेमून कारवाईची मागणी

प्रवीण दरेकर

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – मुंबई येथे आदिवासींच्या भूमी हडप करण्याचे रॅकेट विकासक (बिल्डर) चालवत आहेत. अधिकारी आणि भूमाफिया यांच्या संगनमताने आदिवासींच्या भूमी हडप करून तेथे टोलेजंग इमारती उभे करण्याचे यांचे डाव आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी ९ जुलै या दिवशी विधान परिषदेत केला. ‘या संदर्भात चौकशी समिती नेमून कठोर कारवाई करावी’, अशी मागणी त्यांनी केली. आमदार आमशा पाडवी यांनी आदिवासींच्या भूमीसंदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी ते बोलत होते.’

आदिवासी व्यक्तीची भूमी हडप केल्याप्रकरणीचौकशी करू ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

मुंबईत आदिवासींच्या भूमी खोटे दस्तावेज करून, दडपशाहीने, आदिवासी बांधवांची फसवणूक करून, अधिकार्‍यांना हाताशी धरून बळकवण्याचा प्रयत्न झालेला असल्यास कोकण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १ समिती गठीत करण्यात येईल. एका महिन्याच्या आत पडताळणी करून शासन स्तरावर कारवाई केली जाईल. ‘नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मौजे नवापाडा येथील आदिवासी व्यक्तीची भूमी बिगर आदिवासी व्यक्तींच्या नावे केली आहे कि नाही, याचीही एक मासात विभागीय आयुक्तांद्वारे चौकशी केली जाईल. चौकशी अहवाल आल्यानंतर यामध्ये अधिकारी दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.