पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र सिद्ध केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी एका महिलेसमवेत सहदेव निंभोरे, नीलेश राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. (पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याने गुन्हेगार सर्रास गुन्हे करतात. पोलीस त्यांची व्यवस्था केव्हा सुधारणार ? – संपादक) परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवली. प्रमाणपत्रावर बनावट शिक्का, तसेच राठोड यांनी बनावट स्वाक्षरी केली असल्याचे आढळून आल्याने संबंधित महिलेला चौकशीसाठी बोलावले. त्या वेळी महिलेने आरोपी सहदेव निंभोरे आणि नीलेश राठोड यांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचे मान्य केले. आरोपींनी बनावट प्रमाणपत्र का सिद्ध केले ? प्रमाणपत्राचा उपयोग शिक्षक भरतीमध्ये करण्यात येणार होता का ? या दृष्टीने अन्वेषण चालू आहे.