मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

  • विमान वाहतूकही थांबवली
  • शाळा, महाविद्यालये यांना सुटी
रस्त्यांवर साठलेल्या पाण्यातून मार्ग काढताना मुंबईतील रहिवासी व वाहने

मुंबई – मुंबईत मध्यरात्री १ वाजल्यापासून ते ८ जुलैला सकाळी ७ वाजेपर्यंत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. काही सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचले. यामुळे उपनगरीय रेल्वेसेवाही विस्कळीत झाली.

अतीवृष्टीमुळे मंत्रालयासह मुंबईतील शासकीय कर्मचार्‍यांना कार्यालये सोडण्याचे निर्देश !

मुंबई – भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगर भागात अतीवृष्टी होण्याचे अनुमान वर्तवले आहे. ८ जुलै या दिवशी सकाळपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र शासनाने मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालये दुपारी ३ वाजता बंद करण्याचा आदेश दिला. विधीमंडळाशी संबंधित काम करणारे, स्वत:च्या वाहनाने प्रवास करणारे आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी संबंधित शासकीय अधिकारी अन् कर्मचारी वगळता अन्य अधिकारी, तसेच कर्मचारी यांना कार्यालये सोडण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी यांनी दुपारीच कार्यालये सोडली.

१. मुंबईत हिंदमाता परिसर, दादर, माटुंगा, भांडुप, अंधेरी, कुर्ला आणि सांताक्रूझ या परिसरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि चुनाभट्टी रेल्वेस्थानकात पाणी साचले. त्यामुळे लोकलगाड्या संथ गतीने जात होत्या.

२. मुसळधार पावसामुळे विमान वाहतूकही काही वेळ थांबवण्यात आली होती. परिणामी विधिमंडळाच्या कामकाजाला विदर्भातून मुंबईकडे जाणारे अनेक आमदार आणि मंत्री नागपूर विमानतळावर अडकून पडले. रेल्वे बंद असल्याने काही मंत्र्यांना रुळांवरून चालत यावे लागले.

३. ठाणे, पनवेल, नवी मुंबई, कल्याण या परिसरातही पावसाचा जोर वाढला. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले, तर काही ठिकाणी वाहने वाहून गेली.

४. पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला.

५. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये; म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी शाळा, तसेच महाविद्यालये यांना सुटी घोषित करण्यात आली होती.

६. नालेस्वच्छता झाल्याने आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होणार असल्याचे पालिका यंत्रणांनी म्हटले होते; पण दुर्दैवाने सर्वच ठिकाणी पाणी साचले. हिंदमाता, मिलन सबवे, शीव येथील गांधी मंडई, अंधेरी सबवे पाण्याखाली गेले. भूमीगत टाकी बांधलेली असतांनाही हिंदमाता परिसरात पाणी भरले.

७. कल्याण येथे ७२ वर्षांची महिला घरातील निर्माल्य टाकण्यासाठी नदीवर गेली होती. तिचा तोल जाऊन ती नदीत पडली आणि वाहून जाऊ लागली. तेथे जवळच असणार्‍या वाहतूक पोलिसांनी नदीत उडी मारून तिला वाचवले.

८. ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे असलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समुद्रापासून दूर केले आहे.  समुद्राच्या बाजूने दोरखंड बांधून पर्यटकांना समुद्रा जवळ येण्यापासून थांबवले जात आहे. ध्वनीक्षेपकांवरून समुद्रापासून दूर जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

रेल्वे रुळांवर साठलेले पावसाचे पाणी

९. कोल्हापूरहून ७ जुलैच्या रात्री निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस ८ जुलै या दिवशी पहाटे मुंबईच्या पावसात अडकली. नियोजित वेळेपेक्षा ६ घंट्यांनंतर गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचली. सकाळी ६ ते १० या वेळेत गाडी एकाच जागी उभी होती.

१०. लोकल कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, टिटवाळा रेल्वेस्थानकांमध्ये आल्यावर विलंबाने धावत असल्याचे समजले, तसेच काही लोकल प्रवाशांनी पूर्णपणे भरलेल्या होत्या. त्यामुळे काही प्रवासी कार्यालयाच्या ठिकाणी न जाता घरीच परतले.

११. कळंबोली (नवी मुंबई) येथे २७ मोटारपंप लावूनही तेथील रस्त्यांवर दोन फूट पाणी दिसत होते. कुर्ला येथील रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने पनवेलहून मुंबईकडे जाणार्‍या लोकल बंद होत्या. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंतची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

१२. नागरिकांना साहाय्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ घंटे सतर्क रहाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


अतीवृष्टीमुळे विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – ७ जुलैच्या रात्रीपासून मुंबईसह महानगर प्रदेशात चालू असलेल्या अतीवृष्टीसदृश पावसामुळे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ८ जुलै या दिवशी या संदर्भात घोषणा केली.

अतीवृष्टीसंदर्भात विधानसभेत माहिती देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

१. रात्रीपासून राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७४ जणांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले. रायगड जिल्ह्यात ९५.६ मि.मी. पाऊस पडला. मुंबई येथे कुलाबा वेधशाळेत ८३.८ मि.मी., तर सांताक्रूझमध्ये २६७.९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

२. मुंबई उपनगरातील सखल भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. शीव ते कुर्ला मार्गावरील रेल्वेरूळ काही काळ पाण्याखाली होते.

३. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुन्हा जोरदार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे. काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ (धोक्याची सूचना) देण्यात आला आहे.

४. दुपारी १ वाजून २७ मिनिटांनी समुद्राला भरती आहे आणि ‘ऑरेंज अलर्ट’ दिल्याप्रमाणे पाऊस पडला, तर अडचणीची स्थिती निर्माण होऊ शकते. मुंबई येथे अतीवृष्टी आणि भरती एकत्रित येतात, तेव्हा पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे एकंदरीत स्थिती पहाता विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य आहे.

अधिवेशनाचा कालावधी वाढवा !

‘८ जुलै या दिवशी विधानसभा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल्यामुळे कामकाजाचा १ दिवस वाया गेला. १२ जुलै या दिवशी विधान परिषदेची निवडणूक असल्यामुळे कामकाज पूर्ण क्षमतेने होऊ शकणार नाही. अद्याप बरेच कामकाज प्रलंबित असल्यामुळे अधिवेशनाचा कालावधी एका दिवसाने वाढवावा’, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर ‘ही मागणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून सकारात्मक निर्णय घेऊ’, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.