पंढरपूर – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलैला होत असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळा, तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासमवेत मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेतच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्तांनी पालखी मार्ग, तळांची पहाणी केल्यावर या सूचना केल्या.
विभागीय आयुक्त पुढे म्हणाले, ‘‘पालखी मार्गावरून पालखी तळांकडे जाणार्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरुस्ती करावी. पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात. भंडीशेगांव पालखी तळावर पाणी साचणार याची दक्षता घ्यावी. वारी कालावधीत वैद्यकीय सुविधेसमवेत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. ६५ एकर येथे प्रशासनाकडून दिड्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येते. ती जागा अपुरी पडत असेल, तर खासगी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.’’
या प्रसंगी सद्गुरु राणा महाराज वास्कर म्हणाले, ‘‘श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत विसावा मंदिर येथे श्री नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याकडून करण्यात येते. या स्वागत सोहळ्याला जागा उपलब्ध करून द्यावी.’’ या प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, वारकरी संप्रदाय पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.