ऋचिक ऋषि आणि सत्यवती यांचा प्रासादिक पुत्र म्हणून ‘जमदग्नि’ यांचा जन्म झाला. जमदग्नि हे जन्मत: अग्नीसमान अत्यंत तेजस्वी होते. त्यांना जन्मतःच विद्या प्राप्त झाल्या होत्या. ते धनुर्वेदात निपुण होते. त्यांनी अविश्रांत आणि अपार कष्ट घेतले. त्यामुळे त्यांची कीर्ती चारही दिशांत पसरली.
महर्षी जमदग्नि ऋषींचा विवाह रेणुका हिच्याशी झाला. रेणुकेपासून ऋषि जमदग्नि यांना वसुमान इत्यादी ५ पुत्र झाले. त्यातील सर्वांत लहान परशुराम होता. त्यांनी या पृथ्वीला २१ वेळा क्षत्रियहीन केले. त्या काळी क्षत्रिय राजे उन्मत्त झाले होते; म्हणून त्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरवण्याचे कार्य भगवान परशुरामांनी केले. परशुराम म्हणजे साक्षात् श्रीविष्णूंचे अवतार ! साक्षात् भगवंताने महान अवतारी कार्य करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतरित होण्यासाठी ज्यांना माध्यम म्हणून निवडले, ज्या घरात प्रगट होणे भगवंताला श्रेयस्कर वाटले, ते आहेत महान महर्षि जमदग्नि आणि माता रेणुका !
रेणुकेचा वध आणि तिला पुन्हा जिवंत करणे !
एक दिवस रेणुका पूजेसाठी पाणी आणण्यासाठी सरोवराकाठी गेली. तिथे गंधर्वराजाची अप्सरांसह जलक्रीडा पहातांना तिला महर्षि जमदग्नि यांच्या पूजेच्या वेळेचाही विसर पडला. धैर्य एकवटून चुकीविषयी महर्षींची क्षमायाचना करू लागली.
महर्षि जमदग्नि क्रोधित झाले. महर्षि जमदग्नि यांनी पुत्रांना मातेचा वध करण्याची आज्ञा केली. तिने महर्षींना पुष्कळ विनवणी केली; परंतु महर्षि जमदग्नि क्रोधायमान झाले होते; परंतु ४ पुत्रांपैकी मातेचा वध करण्यास कुणीही पुढे येईना. यानंतर महर्षि जमदग्नि यांनी परशुरामाला भावांसह मातेचा वध करण्याची आज्ञा केली. ‘त्यांचे कोणतेही बोलणे सामान्य नसून त्यामागे कोणतातरी अर्थ नक्कीच असणार आणि तो उचितच असणार, सर्वार्थांनी योग्यच असणार’, याची परशुरामांना निश्चिती होती. त्या श्रद्धेने आणि पितृनिष्ठेनेच त्यांनी हे कृत्य नि:शंकपणे केले. भगवान परशुरामांच्या या आज्ञाधारी कृत्यामुळे महर्षि जमदग्नि प्रसन्न होऊन परशुरामांना म्हणाले, ‘‘परशुरामा ! तू माझा खरा पुत्र आहेस. आज्ञाधारकपणाचे मूर्तीमंत उदाहरण आहेस तू. मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. तुझी इच्छा असेल, तो वर माग.’’ ते पित्याला म्हणाले, ‘‘तात ! माझी आई आणि सर्व बंधू जिवंत होवोत. तसेच मी त्यांना मारले होते, याची त्यांना आठवण न राहो.’’ हे ऐकून महर्षि जमदग्नि प्रसन्न झाले. त्यांनी कमंडलूतील पाणी त्यांच्या ओंजळीत घेतले. नंतर मंत्र म्हणून ते पाणी त्यांनी भारित केले. रेणुका आणि आपल्या चारही पुत्रांवर ते शिंपडले. आपल्या तप:सामर्थ्याने त्यांना पुन्हा जिवंत केले. त्याच क्षणी झोपेतून उठावे, त्याप्रमाणे सगळे सहजासहजी सुखरूप उठून बसले. भगवान परशुरामांना, म्हणजे साक्षात् भगवंताला निश्चिती होती. त्यामुळे या कृत्यामुळे आपल्याला मातृवधाचे पातक लागेल, असा कोणताही विचार त्यांच्या मनात आला नाही. एवढे महान होते महर्षि जमदग्नि ! या प्रसंगानंतर महर्षि जमदग्नि यांनी त्यांच्या क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि स्वतःमध्ये मोठे परिवर्तन केले.
सहस्रार्जुनाचा वध आणि कामधेनूची सुटका !
त्या काळी हैहय वंशातील राजा सहस्रार्जुन याने दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून अपराजित रहाण्याचे आणि १ सहस्र बाहूंचे वरदान मिळवले होते. एके दिवशी त्याने महर्षि जमदग्नि यांच्या आश्रमात प्रवेश केला. त्यांनी आश्रमातील कामधेनूच्या प्रतापाने सहस्रार्जुनाचे आणि त्याच्या मंत्र्यांसहित सार्या सेनेचे आदरातिथ्य केले. कामधेनूमुळे महर्षि जमदग्नि यांचे ऐश्वर्य आपल्यापेक्षाही मोठे आहे, हे पाहून सहस्रार्जुनाने ती कामधेनूच बळजोरीने नेण्याची त्याच्या सेवकांना उर्मटपणे आज्ञा केली. सहस्रार्जुनाचे सेवक हंबरणार्या कामधेनूला बळजोरीने माहिष्मतीपुरीला घेऊन जाऊ लागले. परशुराम आश्रमात पोचल्यावर त्यांना सहस्रार्जुनाने कामधेनूला पळवून नेल्याचे समजले तेव्हा क्रोधित सहस्रार्जुनाच्या सेनेपाठोपाठ धावू लागले. सहस्रार्जुनाने परशुरामाशी युद्ध करण्यासाठी त्याची १७ अक्षौहिणी सेना पाठवली. भगवान परशुरामांनी एकट्यानेच सर्व सेना नष्ट केली. सहस्रार्जुनाने एकाच वेळी सहस्र हातांनी ५०० धनुष्यांना बाण लावले आणि ते परशुरामांवर सोडले. परशुरामाने एका धनुष्याने सोडलेल्या बाणानेच ते सर्व बाण एकदम तोडून टाकले. त्यानंतर परशुरामाने तीक्ष्ण धारेच्या परशूने अत्यंत वेगाने त्या सहस्रार्जुनाचे सहस्र हात तोडून टाकले. मस्तकही धडापासून वेगळे केले. सहस्रार्जुन मारला गेल्याचे पहाताच त्याचे १० सहस्र पुत्र भिऊन पळून गेले. परशुरामाने आश्रमातील कामधेनू पुन्हा प्राप्त करून आश्रमात आणून महर्षि जमदग्नि यांच्याकडे सोपवले.
महर्षि जमदग्नि यांचा वध !
महर्षि जमदग्नि यांनी परशुरामाला या पापाचे प्रायश्चित्त म्हणून तीर्थयात्रेला पाठवले. ही संधी साधून सूड उगवण्यासाठी सहस्रार्जुनाच्या पुत्रांनी महर्षि जमदग्नि यांचा वध केला. परशुरामाने पित्याचा देह आपल्या भावांकडे सोपवला आणि स्वतः हातात परशू घेऊन क्षत्रियांचा संहार करण्याचा निश्चय केला. माहिष्मतीनगरीत जाऊन सहस्रार्जुनाच्या पुत्रांचा वध केला. त्यांच्या छाटलेल्या मस्तकांनी नगरीच्या मधोमध एक मोठा पर्वतच उभा केला. त्यांच्या रक्ताची एक मोठी नदी तेथे वाहू लागली.
पिता-पुत्रांची कीर्ती सर्वदूर पसरली !
‘क्षत्रिय अत्याचारी झाले आहेत’, हे भगवान परशुरामांनी जाणले आणि त्यांनी आपल्या पित्याच्या वधाचे निमित्त करून २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. पृथ्वीवरील राजांकडून माजलेला अनाचार संपवला. या कार्यामुळे संपूर्ण विश्वात ‘जमदग्निपुत्र परशुराम’ म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. साक्षात् भगवंताच्या अवतारी रूपाचे पिता म्हणून महर्षि जमदग्नि यांची कीर्तीही सर्वत्र पसरली !
परशुरामांनी पित्याचे मस्तक आणून ते त्यांच्या धडाला जोडले. यज्ञ केला. यज्ञाचे शेवटचे स्नान करून ते सर्व पापांतून मुक्त झाले. जमदग्नि ऋषींना त्यांच्या तपोबलामुळे आणि उच्चतम आध्यात्मिक सामर्थ्यामुळे साक्षात् सप्तर्षी मंडलात स्थान प्राप्त झाले !
(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)