पावसाळ्यात धबधबा पहाण्यास जाणार्‍यांसाठी अल्प धोका असलेल्या धबधब्यांच्या स्थळांची सूची घोषित

पणजी, ५ जुलै (वार्ता.) – गोवा सरकारने पावसाळ्यात धबधबा पहाण्यास जाणार्‍या लोकांसाठी अल्प धोका असलेल्या धबधब्यांच्या स्थळांची सूची घोषित केली आहे. याविषयी वनमंत्री विश्वजित राणे म्हणाले, ‘‘पावसाळ्यात पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वन खात्याने धबधब्यांकडे जाण्याविषयी सुरक्षिततेविषयीचे कडक नियम लागू केले आहेत. धबधबा पहायला जाणार्‍यांनी हवामान खात्यांकडून दिलेल्या सूचना पाळाव्यात आणि या धबधब्यांच्या ठिकाणी पोहायला जाऊ नये.’’

सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या अल्प धोका असलेल्या धबधब्यांच्या सूचीतील स्थळे पुढीलप्रमाणे आहेत. म्हादई वन्यजीव अभयारण्यातील पाली, हिवरे, चरवणे, गोळावली, गुंगुल्डे, चिदंबरम्, नानक्ली, उकैची खाडी, कुमठल, मडीयानी आणि गुळुले येथील खाडी ही सत्तरी तालुक्यातील ठिकाणे आणि बांधावयलो वझार, वतराची राय, मैदा आणि कुळें ही स्थळे आहेत. मोले येथील भगवान महावीर अभयारण्यातील दूधसागर मंदिराजवळ, महामार्गावरील व्ह्यू पाईंट, महावीर फाटक, तळदे, बामणगुडो, पिक्केवाडी, तांबडी सुर्ल आणि दूधसागर ही ठिकाणे आहेत. नेत्रावळी अभयारण्यातील सावरी, कुस्के आणि भाटी ही स्थळे आहेत.