धर्मामध्ये असलेले कर्मकांड आजच्या व्यस्त जीवन पद्धतीत टिकवण्यासाठी काय व्यवस्था असावी ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

‘कर्मकांड हे केवळ धर्मातच असते, असे काही समजण्याचे कारण नाही. काही शिस्तबद्ध आग्रहांना, विशेषतः ज्याचा आपल्याला जाच वाटतो, त्याला आपण कर्मकांड म्हणतो. अन्यथा आज फॅशनच्या नावाखाली अनेक प्रकारची कर्मकांडे आपण स्वीकारतच असतो; पण त्याला कर्मकांड म्हणत नाही इतकेच !

१. प्रत्येकाने स्वतःचे ‘विहित कर्म’ योग्य पद्धतीने करणे हाच धर्म !

मुळात ज्याला आपण (धार्मिक) कर्मकांड असे म्हणतो, ते धर्माचे सर्वस्व नव्हे. बहुतेक करून ते पूजापद्धत किंवा उपासनेचा एक अंश आहे आणि त्याचे काही महत्त्वही आहे. उपासनेचे काही फळ सांगितलेले असते. आता जर त्या प्रकारचे फळ पाहिजे असेल, तर त्याचे सांगितलेले कर्म किंवा कर्मकांड केले पाहिजे. हे करायचे नसेल किंवा जमत नसेल, तर त्या फळाची अपेक्षा ठेवू नये. आज आपली मानसिकता अशी चमत्कारिक झाली आहे की, आम्हाला फळाची अपेक्षा आहे; पण त्यासाठी जे सांगितले ते करायला नको. सामान्य व्यवहारातही असे चालत नाही. धर्मशास्त्र सांगते, ‘प्रत्येकाने आपले ‘विहित कर्म’ योग्य पद्धतीने स्वरूपात करावे, हाच त्याचा धर्म आहे.’

२. विहित कर्मच जाचक वाटत असेल, तर स्वतःची मानसिकता पडताळणे आवश्यक !

तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागीं ।।

– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी ९१७

अर्थ : हे विरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांची पूजा केली असता, ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते.

आता आपले विहित कर्मच जर जाचक आणि कर्मकांड आहे, असे वाटले, तर आपण स्वतःची मानसिकता पडताळून घेतली पाहिजे. प्रत्येकाचे विहित कर्म देश-काल-परिस्थिती, अधिकार आणि क्षमता याप्रमाणे विभिन्न असते. ते संतवाङ्मयाच्या अभ्यासातून निश्चित करावे. जाणकार किंवा सद्गुरु यांच्याकडून समजावून घ्यावे.

३. धर्माने आताच्या धावपळीच्या जीवनातही कर्मकांडाविषयी साधे-सोपे नियम केलेले असणे

आपल्या व्यस्त जीवनाचाही आपण वाजवीपेक्षा अधिकच बाऊ करून ठेवला आहे. वास्तविक माणसाने स्वतःचे जीवन व्यस्त ठेवलेच पाहिजे. रिकामटेकडेपणा प्रशस्त नाही. आजची धावपळ बहुधा अगतिकपणे केली जाते. तेही एक कर्मकांडच म्हटले पाहिजे. आपल्या गरजा थोड्याशा न्यून केल्या आणि आचरणामध्ये थोड्या संयमाची सवय लावली की, धावपळ थोडी न्यून करता येते.

अर्थात् ज्याचा दिनक्रम खरोखर (प्रामाणिकपणे) अत्यंत व्यस्त आहे, त्याचीही सोय धर्मशास्त्राने केलेली आहे. धर्मातील कोणत्याही कर्माचा विचार केला, तरी त्या कर्माचे आचार, कर्मकांड सांगितलेले असते, तसे अत्यंत सोपे आणि सुटसुटीत किमान काय करावे, तेही सांगितले आहे. विशेष म्हणजे अडचणीच्या वेळचा आपद्धर्मही सांगितलेला आहे. काळजी घ्यायची ती म्हणजे आपत्ती नसतांना आपद्धर्म वापरू नये.’

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)

(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)