Bhagavadgita Studies In IGNOU : ‘इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापिठा’मध्‍ये भगवद़्‍गीतेवर नवीन पदवी अभ्‍यासक्रम !

विद्यापिठाचा स्‍तुत्‍य उपक्रम !

नवी देहली – इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापिठाने (‘इग्‍नू’ने) भगवद़्‍गीतेवर नवीन पदवी अभ्‍यासक्रम चालू केला आहे. विद्यार्थी वर्ष २०२४-२०२५ या शैक्षणिक सत्रासाठी ‘इग्‍नू’मधून भगवद़्‍गीता अभ्‍यासातील पदव्‍युत्तर पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतात. हा अभ्‍यासक्रम जुलै २०२४ च्‍या सत्रापासून ‘ओपन अँड डिस्‍टन्‍स लर्निंग’ प्रणालीखाली चालू होईल. ‘इग्‍नू’च्‍या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर अधिसूचना प्रसिद्ध करून याविषयीची माहिती दिली आहे.

इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापिठाने भगवद़्‍गीतेतील एम्.ए. हा पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रम चालू केला आहे. या कार्यक्रमाचे पूर्ण नाव ‘एम्.ए. भगवद़्‍गीता स्‍टडीज’ असे आहे. प्रा. देवेश कुमार मिश्रा यांनी अनेक विद्यापिठांचे कुलगुरु आणि शिक्षक यांच्‍या  मार्गदर्शनाखाली या अभ्‍यासक्रमाची रचना आणि विकास केला आहे. या अभ्‍यासक्रमाचा  कालावधी २ वर्षांचा असेल. सध्‍या हा अभ्‍यासक्रम हिंदी माध्‍यमात उपलब्‍ध आहे; मात्र येत्‍या काही वर्षांत तो इंग्रजी माध्‍यमातही शिकवला जाऊ शकतो.