पुणे महानगरपालिकेकडून ‘निर्मल वारी’ स्वच्छता मोहीम !

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २ दिवस मुक्काम करून पंढरपूरकडे रवाना झाल्या. त्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचार्‍यांनी अवघ्या काही घंट्यांमध्ये शाळा, मंदिरे, धर्मशाळा, रस्ते, उद्यानामध्ये स्वच्छता मोहीम चालू केली. या मोहिमेतून २५६ टन कचर्‍याचे संकलन करण्यात आले.

दोन्ही पालख्या नाना पेठ आणि भवानी पेठेत मुक्कामी असतात. वारकर्‍यांचा मुक्काम पेठांमध्ये असल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयासह, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, हडपसर, मुंढवा, रामटेकडी वानवडी या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, खाद्यपदार्थ यांसह अन्य प्रकारचा कचरा झाडून संकलित करण्यात आला. या मोहिमेत २४ घंटे ७०० कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.

‘समता दिंडी’चा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभाग !

राज्यघटना या वारकरी परंपरेतून, या वारकरी दिंडीतून सर्वांपर्यंत पोचली पाहिजे, या उद्देशाने ‘संविधान समता दिंडी’ महाराष्ट्रभर काढली जाते. ही दिंडी प्रत्येक वर्षी वारीमध्ये सामील होते. यात विविध संस्था, संघटना, तसेच वारकरी यांचा सहभाग असतो. ही दिंडी ‘समता भूमी’ म्हणजे पुण्यातील फुलेवाडा येथून चालू होते.