शेतकर्‍यांचा पीकविम्याचा अर्ज भरतांना ई-सेवाकेंद्रांकडून अधिक रुपयांची मागणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – राज्य सरकारने खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकर्‍यांना १ रुपयात ‘पंतप्रधान पीकविमा’ योजनेचा लाभ घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे; परंतु अर्ज भरण्यासाठी ‘ई-सेवाकेंद्र’, ‘सामूहिक सेवाकेंद्र चालक’ १०० ते २५० रुपयांपर्यंत मागणी करत आहेत, अशी तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. पीकविमा अर्ज भरण्याचे प्रतिअर्ज ४० रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले आहे. ते पीकविमा आस्थापने संबंधित ई-सेवाकेंद्रांना देणार आहेत. त्यामुळे सेवाकेंद्र चालकांनी शेतकर्‍यांकडून अर्ज भरण्याचे पैसे घेणे अपेक्षित नाही. तरी शेतकर्‍यांकडून पैसे घेतले जात असल्याची तक्रार ‘स्वतंत्र भारत पक्षा’चे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे. याची गंभीर नोंद कृषी विभागाने घेऊन संबंधित सेवाकेंद्रांवर कारवाईची चेतावणी दिली आहे.

विस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे म्हणाले की, शेतकर्‍यांनी अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. अतिरिक्त पैशांची मागणी होत असेल आणि अर्ज भरतांना अडचणी येत असतील, तर संबंधित पीकविमा आस्थापनाचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाचे स्थानिक कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.

संपादकीय भूमिका

असे प्रकार घडतातच कसे ? प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक !