संयुक्त राष्ट्रांतील रशियाचे स्थायी प्रतिनिधी नेबेंझ्या यांचे मत
मॉस्को – भारत हा रशियाचा जुना मित्र आहे. रशियाचे भारताशी विशेष धोरणात्मक भागीदारीचे संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौर्यामुळे या दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध आणखी सुधारतील, असा विश्वास संयुक्त राष्ट्रांतील रशियाचे स्थायी प्रतिनिधी नेबेंझ्या यांनी व्यक्त केला. रशियाने जुलै महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्याच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांतील रशियाचे स्थायी प्रतिनिधी नेबेंझ्या यांनी नुकतेच पत्रकार परिषदेला संबोधित केले.
नेबेंझ्या म्हणाले, ‘‘आम्ही अनेक क्षेत्रात सहकार्य करत आहोत आणि मला वाटते या भेटीत त्या सर्व सूत्रांवर ठोस चर्चा होईल. या भेटीतून रशिया-भारत संबंध आणखी सुधारतील.’’ पंतप्रधान मोदी यांची ५ वर्षांतील ही पहिली रशिया भेट असेल. वर्ष २०१९ मध्ये त्यांनी रशियाला शेवटची भेट दिली होती.