शिवरायांची वाघनखेही लवकर आणणार असल्याचे प्रतिपादन
मुंबई, २ जुलै (वार्ता.) – ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार आहे. त्यासाठी काम चालू आहे, तसेच शिवरायांची वाघनखेही लवकरच आणली जाणार आहेत’, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ जुलै या दिवशी विधानसभेत केली, तसेच या वेळी त्यांनी महायुती सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा देत विरोधकांनाही सुनावले. ‘उघडा डोळे, बघा नीट आणि वागा नीट. सरकार पाडण्यासाठी अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले; मात्र सरकार पडले नाही’, असेही त्यांनी सांगितले. ते राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते. या वेळी शिंदे यांनी सभागृहात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या खटाखट विधानाचा उल्लेख केला. त्या वेळी विरोधकांनी यावर आक्षेप घेऊन गदारोळ केला.
मुख्यमंत्री म्हणाले की,…
१. ३० जून या दिवशी सरकारला २ वर्षे पूर्ण झाल्यामुळे विरोधकांचेही चेहरे पांढरे पडले आहेत. ‘फेक नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) सिद्ध करून एकदाच फसवणूक केली जाते. आम्ही उठाव केला आणि जनतेच्या मनातील महायुतीचे सरकार आम्ही आणले.
२. महायुती सरकारने शेतकर्यांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद आणणे हाच आमच्या सरकारचा ध्यास आहे. २ वर्षांत आम्ही अल्प पडलो नाही. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत आम्ही अहोरात्र काम केले.
३. कार्यकर्ता घरात नव्हे, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. आम्ही घरी बसून नव्हे, तर जनतमध्ये जाऊन काम केले. विरोधकांना आपल्या दायित्वाचे भान आहे कि नाही, ते ठाऊक नाही. सभागृहाबाहेर विरोधक आमच्यावर आरोप करतात; मात्र आता सभागृहातही शिवीगाळ केली जाणे दुर्दैवी आहे. असे कधीही घडले नव्हते; मात्र संयम राखून विरोधकांमध्ये काम करण्याची सवय ठेवावी.
४. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थी महिलांच्या वयाची अट ६० वरून ६५ वर्षे करण्यात आली आहे, तसेच भूमीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे.