Pakistan Blasphemy Law : पाकमध्ये ईशनिंदा केल्याच्या प्रकरणी न्यायालयाकडून ख्रिस्त्याला मृत्यूदंड !

इस्लामाबाद – पाकमधील आतंकवादविरोधी प्रकरणांचे विशेष न्यायमूर्ती जैनुल्लाह खान यांनी अहसान राजा मसीह या ख्रिस्त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्याने ईशनिंदा केल्याचा, म्हणजे इस्लामविरोधी कृती केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.  मृत्यूदंडाच्या शिक्षेसह त्याला १० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. मसीह याने ‘टिकटॉक’वर कथित ईशनिंदा करणारी पोस्ट प्रसारित केली होती. त्याच्या पोस्टमुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकार्‍याने केलेल्या तक्रारीच्या आधारावर मसीह याच्या विरोधात पाकिस्तानमधील आतंकवादविरोधी कायदा आणि ‘इलेक्ट्रॉनिक गुन्हे प्रतिबंध अधिनियम’ यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ईशनिंदेच्या पोस्टमुळे ख्रिस्त्यांची घरे आणि चर्च यांना लावली होती आग !

मसीह याच्या पोस्टमुळे पंजाब प्रांतात ‘ख्रिस्त्यांनी कुराणाची विटंबना केली’, अशी अफवा पसरली होती. राजधानी लाहोरपासून १३० किलोमीटर दूरवर असलेल्या फैसलाबाद जिल्ह्यातील जरनवाला तालुक्यात मुसलमानांनी २४ चर्चना आग लावली, तसेच चर्च आणि आजूबाजूच्या परिसराची नासधूस केली. यासह ख्रिस्त्यांची ८० घरे पेटवली. या घटनेनंतर पोलिसांनी २०० मुसलमानांना कह्यात घेतले होते; मात्र त्यांच्यापैकी कुणावरही कारवाई झाली नाही. या २०० जणांपैकी १८८ जणांना न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष ठरवत मुक्त केले, तर उर्वरित १२ जण जामिनावर कारागृहाबाहेर आले आहेत.

संपादकीय भूमिका

पाकमध्ये ईशनिंदा कायद्याचा वापर तेथील अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणार्‍यासाठी होत आहे. त्याचा फटका तेथील हिंदूंनाही बसत आहेे, हेही तितकेच खरे !