अहिल्यानगरमधील २ महिलांसह तिघांवर गुन्हा नोंद !
अहिल्यानगर – बीडचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. ही घटना जानेवारी ते २६ जून या काळात हॉटेल रॉयल येथे घडली. या प्रकरणी अहिल्यानगरमधील गायकवाड आणि बांगर या २ महिलांसह इस्माईल दर्यानी उपाख्य भैया बॉक्सर नामक एका यू ट्यूब पत्रकाराच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माजी आमदार धोंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रस्तुत आरोपींनी संगनमत करून ‘आमच्याकडे तुमची अश्लील ‘व्हिडिओ क्लिप’ आहे. ती सामाजिक माध्यमावर प्रसारित करून तुमची अपकीर्ती करू, तसेच तुमच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हाही नोंद करून तुमची राजकीय कारकीर्द संपवून टाकू’, अशी धमकी देत १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. यातील २५ सहस्र रुपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय साहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्याने स्वीकारले आहेत.