अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात देवाने सुचवलेले विचार !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिरात श्रीरामलल्लाच्या (श्रीरामाच्या बालरूपातील मूर्तीच्या) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्ताच्या वेळी मी घरी नामजप करत होते. तेव्हा नामजप करतांना मला सूक्ष्मातून एक वटवृक्ष दिसला. मला वाटले, ‘तो हिंदु राष्ट्राचा वटवृक्ष आहे.’ त्या वेळी देवाने मला सुचवलेले विचार येथे दिले आहेत.

अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

१. ‘अयोध्या नगरीत श्रीरामलल्ला विराजमान होणे’, हा हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीचा दिवस असणे

२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या नगरीत सृष्टीचे पालनकर्ता श्रीविष्णु रामलल्लाच्या स्वरूपात विराजमान झाले. हा हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीचा दिवस आहे. आज ब्रह्मांडातील यक्ष, गंधर्व, किन्नर, ऋषिमुनी आणि इंद्रादी देवता आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. ‘वर्ष २०१९ मध्ये श्रीराममंदिराच्या संदर्भातील निर्णय होऊन भव्य मंदिर बांधून होणे’, ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची लहान मुळे आहेत.

२. वर्ष २०२४ ते २०३० या कालावधीत देवाची सृष्टीची शुद्धी करण्याची माध्यमे

वर्ष २०२४ ते २०३० या कालावधीत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या अनुषंगाने अनिष्ट शक्तींच्या स्थुलातील विनाशाच्या दृष्टीने तीव्र प्राकृतिक आपत्काळ आणि तिसरे महाविनाशकारी महायुद्ध यांच्या माध्यमातून देव सार्‍या सृष्टीची शुद्धी करणार आहे.

३. वर्ष २०२५ ते २०३० या कालावधीत पाश्चात्त्य संस्कृतीही नष्ट होऊन लोकांचे आर्य सनातन वैदिक संस्कृतीनुसार आचरण चालू होणार असणे

वर्ष २०२५ ते २०३० या कालावधीत सृष्टीच्या शुद्धीच्या प्रक्रियेनंतर जे जीव अस्तित्वात असतील, ते हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष घडवणारे पायाभूत घटक असतील. तेव्हा प्रत्येक जिवाची आध्यात्मिक पातळी न्यूनतम ५५ टक्के असेल. त्या वेळी समाज व्यवस्थेत कृतीच्या स्तरावर परिवर्तन होईल, उदा. ‘भ्रष्टाचार करणे पाप आहे, नारीशक्तीचा सन्मान करणे’, यांसारख्या तत्त्वांची समाजमनात जागृती करणे, घराघरांतून कृतीच्या स्तरावर धर्माचरण घडणे, हे कार्य होईल. थोडक्यात पाश्चात्त्य संस्कृती नष्ट होऊन लोकांचे आर्य सनातन वैदिक संस्कृतीनुसार आचरण चालू होईल.

४. वर्ष २०३० ते २०४० या कालावधीत ‘ईश्वरप्राप्ती’ हे मनुष्यजन्माचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने जागृतीचे कार्य होणे

वर्ष २०३० ते २०४० या कालावधीत समाजमनाचे मानसिक स्तरावर परिवर्तन होईल. ‘मनुष्य जन्माचे ध्येय ईश्वरप्राप्ती असून आपली सर्व कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मे त्या दृष्टीने योग्य क्रियमाणासहित असायला हवीत’, या दृष्टीने जागृतीचे कार्य होणार आहे.

५. वर्ष २०४० ते २०७४ या कालावधीत हिंदु राष्ट्रासाठी पोषक असा समाज निर्माण होणे आणि पूर्ण सृष्टीच सनातन संस्थामय होणे

वर्ष २०४० ते २०७४ या कालावधीत समाजमनाचे आध्यात्मिक स्तरावर परिवर्तन होईल. यासाठी अधिक काळ लागणार आहे; कारण स्थूल आणि मानसिक या स्तरांवर पालट होण्यासाठी लागणार्‍या काळापेक्षा सूक्ष्म स्तरावर परिवर्तन होण्यास व्यक्तीतील स्वभावदोष, अहं आणि प्रारब्ध यांमुळे बाधा येते. त्यावर मात करत हिंदु राष्ट्रासाठी पोषक असा समाज निर्माण होईल.

त्यानंतर या वर्षीच्या शेवटी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद समाजमनात विलीन होतील. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्देश पूर्ण झालेला असेल, म्हणजे पूर्ण सृष्टीच सनातन संस्था असेल. त्यामुळे तिचे वेगळे अस्तित्व नसेल.

६. वर्ष २०७५ मध्ये खर्‍या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना होणे

वर्ष २०७५ मध्ये खर्‍या अर्थाने हिंदु राष्ट्र येईल, म्हणजे जिवाचे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक कर्म हे साधना म्हणून असेल. भगवंताच्या इच्छेनुसार सृष्टीचे नियमन आणि संचालन असेल. अशा प्रकारे पुढील ५० वर्षांत सृष्टीचे ३ प्रकारे (शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर) शुद्धीकरण होऊन हिंदु राष्ट्र स्थापन होईल.’

– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (१.२.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक