भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, तिच्याशी निगडित घटक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेतून ‘हिंदु’ कोण ? आणि सुसंस्कृत समाजातील श्रेष्ठ गुण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

 या पूर्वीचा लेख आपण येथे वाचू शकता : https://sanatanprabhat.org/marathi/807676.html

(लेखांक १३)

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

९ उ. युवतींचे केस घोड्यांच्या शेपट्यांना बांधून त्यांना चाबकाचे फटके देत बगदादमध्ये पळवणे आणि शेवटी युवतींनी हौतात्म्य स्वीकारणे : संतापलेल्या खलिफाने त्या दोघींचे केस घोड्यांच्या शेपट्यांना बांधले आणि घोड्यांना चाबकाचे फटके मारून बगदादमध्ये पळवले. घोड्यांच्या लाथा बसतच होत्या. शरीरे भूमीवर सोलपटत होती. केस खेचले जात होते. डोकी घोड्यांच्या गुडघ्यांनी बडवली जात होती. केवळ रक्तबंबाळ मुंडक्यांव्यतिरिक्त दोन्ही शरिरे झिजून झिजून, तुटून तुटून आणि तुकड्या-तुकड्यांनी रस्त्यांत विखरून पडली होती; पण राष्ट्राच्या अपमानाचा सूड घेतल्याच्या समाधानाने डोळ्यांत अश्रूही न आणता त्या युवतींनी हौतात्म्य स्वीकारले. राष्ट्रतेजाच्या अस्मितेचा सूर्यही तेव्हा पश्चिमेकडेच उगवला. (भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा सिंधच्या सीमेजवळ यांचे पुतळे उभारायला हवे होते.)

९ ऊ. सिंध प्रांतात सत्तेत झालेले पालट ! : यानंतर म्लेंच्छ यवनांच्या स्वार्‍यांवर स्वार्‍या होऊ लागल्या. काही काळ अरबांच्या आधिपत्याखाली राहिलेला सिंध प्रांत कालांतराने राठोड वंशीय राजपुतांनी जिंकून घेतला आणि पुन्हा तेथे हिंदुसत्ता आली. महंमद कासीमनंतर सुमारे ३०० वर्षांनी गांधार देशावर (वायव्य प्रांत) सबक्तगीन या गझनीच्या सुलतानाने स्वारी केली.

९ ए. महंमद गझनीने केलेला विध्वंस ! : राजा जयपालाने युद्धाला जोरदार तोंड दिले; पण वेळोवेळी झालेल्या आक्रमणांत जयपालाचा पराभव झाला. निराशेने जयपालाने अग्निकाष्ठ भक्षण केले. त्याच्यानंतर त्याचा पुत्र अनंगपाल यानेही महंमद गझनीच्या आक्रमणांना तोंड दिले; पण तो मारला गेला. महंमदाने पुढे सोमनाथाचे मंदिर फोडले. तेथील शिवलिंग फोडले. त्याला प्रतिकार करतांना ५० सहस्र हिंदूंनी प्राणांची बाजी लावली. कोणतेही नेतृत्व नसतांना आपले देवस्थान रक्षिण्यासाठी आत्मबलीदान करणार्‍या या असंघटित हिंदु धर्मवीरांचा इतिहासकारांनी मात्र उपहास केला. त्यांना भोळसट आणि भाबडे ठरवून, प्रत्यक्ष शिवलिंग फोडले, तरी कुठे आला तुमचा देव धावून ? असली कुचेष्टाही केली. मुसलमानी तवारिखकारांनी (इतिहासकारांनी) आमच्या देवांची कुचेष्टा केली आहे; पण त्यांना उलट प्रश्न विचारणारा कुणी का भेटत नाही ? कुणी विचारत का नाही की, तुमच्या खलिफाच्या राजधानीत शिरून चेंगीझखानाने जेव्हा खलिफालाच कापून काढले आणि असंख्य मशिदी फोडल्या, तेव्हा तुमचा तरी अल्ला कुठे धावला ? झाल्या गोष्टींचे पारिपत्य करण्यासाठी माळव्याचा राजा आपला प्रचंड सैन्यसंभार घेऊन निघाला, हे वृत्त कळताच मिळालेली लूट पदरात पाडून घेऊन सिंधच्या मार्गे महंमद गझनी परत निघाला. वाटेत त्याची अनेक प्रकारे हानी झाली; पण शेवटी गझनी त्याच्या स्थानात पोचल्यावर २-३ वर्षांतच तो मरण पावला (स.न. १०३०)

(क्रमश:)

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/809931.html