सोहळ्याचे ३३९ वे वर्ष !
पुणे – आषाढी वारीसाठी २८ जून या दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. या निमित्ताने देऊळवाड्यातील भजनी मंडपामध्ये प्रस्थान सोहळ्याची सिद्धता करण्यात येत आहे. वारकरी, भाविक यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. पालखी सोहळ्यासाठी छत्री सिद्ध करण्यात आली असून त्याची निर्मिती चेन्नई येथे करण्यात आली आहे. सोहळ्यातील महत्त्वाची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी दिली. या वेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि विश्वस्त उपस्थित होते.
माणिक महाराज मोरे म्हणाले की, यंदा ४५० दिंड्यांशी पत्रव्यवहार केला आहे. पालखी प्रस्थानाच्या २ दिवस आधी दिंड्या येतील. काही दिंड्या सरकारी गायरान जागेत, तर काही ठराविक ठिकाणी मुक्कामी असतील. देऊळवाडा येथे रंगरंगोटी केली आहे. स्वच्छतेसाठी कर्मचार्यांची नियुक्ती, भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान लोहगाव येथील खांदवे यांच्या ‘हिरा-राजा’ आणि नांदेड येथील कोरडे यांच्या ‘गुलाब-मल्हार’ बैलजोडीला मिळाला आहे.
पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीमध्ये पालट !संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डी येथे २९ जूनला येणार असून ३० जून या दिवशी प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळा पिंपरी-चिंचवडमधून पुणे शहराकडे मार्गस्थ होणार आहे. या वेळी भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, तसेच वाहतूककोंडी टाळण्यासाठी शहरातील वाहतुकीमध्ये पालट करण्यात आला आहे. प्रस्थान सोहळ्यात भाविकांच्या वाहनांसाठी देहू, आळंदी येथे ‘वाहनतळा’ची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. |