हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा हिंदु धर्मकार्यातील योगदानासाठी सत्कार !

राजगडावर भगवेमय वातावरणात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा !

डावीकडून श्री. रवींद्र पडवळ, श्री. कुणाल मालुसरे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

भोर (जिल्हा पुणे) – ‘समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने राजगडावर तिथीनुसार २० जून या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. १९ आणि २० जून असा २ दिवस हा कार्यक्रम होता. ‘हा केवळ सोहळा नसून हिंदूंनी कायम हिंदुत्वाच्या धगधगत्या मशालीकडे पाहून पुढे चालण्यासाठी असलेला एक ऊर्जास्रोत आहे, असे समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्था मानते’; म्हणून या सोहळ्याचे मागील ५ वर्षांपासून तिथीनुसार दुर्ग राजगडवर आयोजन केले जाते, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवींद्र पडवळ यांनी दिली. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा हिंदु धर्म कार्यातील योगदानाविषयी सत्कार करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलेले निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आली. यामध्ये अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचे मोठे योगदान असून त्यांनी हिंदुत्वाला खरा न्याय मिळवून दिला. या कार्यासाठी या वेळी त्यांचा समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र पडवळ आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्य राज्याभिषेक सोहळ्यात पारंपरिक विधी करतांना वेदमहर्षि मकरंद जोशी आणि इतर

या सोहळ्याला सरदार हिरोजी इंदुलकर यांचे वंशज श्री. समीरराजे इंदुलकर, सरनोबत सरदार पिलाजीराव गोळे यांचे वंशज श्री. देविदासजी गोळे, तसेच राज्यभरातून शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी आणि अनुमाने ३ सहस्र ५०० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. स्वाती मोहोळ आणि इतर सहकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

कर्तृत्ववान हिंदुत्वनिष्ठांचा पुरस्कार देऊन सन्मान !

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही धर्मकार्यात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान हिंदूंचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात ‘गोरक्षण’ पुरस्कार हा श्री. आकाश धोत्रे, तसेच श्री. रवी मुसळे यांना प्रदान करण्यात आला. ‘हिंदुत्व शिलेदार’ पुरस्कार श्री. दिगंबर पडवळ यांना, तर शिवकार्यातील पुरस्कार हा धर्मरक्षक दल, श्री. शिवशंभू सेवा ट्रस्ट आणि शिवकार्य प्रतिष्ठान यांना देण्यात आला.

दुर्ग राजगड आपल्या स्वामींच्या सोहळ्यासाठी नटला !

ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला गडपूजन, गडावरील देवतांची अभिषेक मूर्तीसह भेट, पालखी सोहळा, मर्दानी खेळ, तसेच गडावरील देवी पद्मावतीचा पारंपरिक गोंधळ, या वेळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सवही जल्लोषात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला सकाळी मुख्य राज्याभिषेक सोहळ्याचे पारंपरिक विधी वेदमहर्षि मकरंद जोशी आणि त्यांचे सहकारी यांच्या मंत्रोच्चाराने चालू झाले. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक, तसेच प्रवेशद्वारावर मावळ्यांचा इतिहास सांगणारे फलक आणि फुले यांची आकर्षक सजावट केली होती.