मुंबई – खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रात केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘एच्.टी.बी.टी.’ या कापूस बियाण्याची विक्री होत असल्याचा प्रकार आढळून आला आहे. या प्रकरणी राज्यात एप्रिल आणि मे या २ महिन्यांमध्ये २६ ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकार्यांनी दिली.
राज्यात आढळलेले ‘एच्.टी.बी.टी.’ कापूस बियाणे सरकारने कह्यात घेतले आहे. बोगस बियाण्याची विक्री रोखण्यासाठी शासनाकडून ३९६ भरारी पथके सिद्ध करण्यात आली आहेत. आतापर्यंत खरीपपूर्व हंगामात १ सहस्र १३१ बियाणे विक्री केंद्रांची पडताळणी करण्यात आली आहे. यावर्षी राज्याला १८ लाख क्विंंटल इतक्या बियाण्याची आवश्यकता होती; मात्र सध्या राज्यात त्याहून अधिक २४ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. यामध्ये कापूस, भात, मका आणि सोयाबीन यांचा समावेश आहे. यावर्षी खरीप हंगामात राज्यातील १४२ लाख ३४ सहस्र हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे कृषी विभागाचे ध्येय आहे, अशी माहिती कृषी अधिकार्यांनी दिली.