‘ॐ’कार साधना !

‘ॐ’काराने वात-पित्त-कफ यांचे संतुलन झाल्याने रोगमुक्त रहाता येणे !


‘ॐ’काराच्या उच्चाराने वात, पित्त, कफ संतुलित रहाते. ‘अ’चा उच्चार पोटातून, जिथे पित्त असते, ‘उ’चा उच्चार छातीतून, जिथे वात असतो आणि ‘म’चा उच्चार गळ्यातून होतो, जिथे कफ असतो. ‘अ’, ‘उ’ आणि ‘म’ म्हणतांना हे तीनही, म्हणजे वात, पित्त, कफ यांची मूलस्थाने संतुलित रहाण्यास साहाय्य होते. त्यामुळे व्यक्ती रोगमुक्त होण्यास साहाय्य होते.
(संदर्भ :‘प्रशांतजे योगा’ ध्वनीचित्रफीत)

१. ‘ॐ’ : ध्वनीचे मूळ स्वरूप !

ब्रह्मांडातील पहिला ध्वनी हा ‘ॐ’चा असल्याचे हिंदु धर्मशास्त्र सांगते. प्राचीन ग्रंथांत ‘ॐकार साधनेचा उल्लेख आहे. ‘पातंजली योगसूत्र’ या पतंजलीऋषींच्या ग्रंथात म्हटले आहे, ‘तस्य वाचकः प्रणवः’ म्हणजे ‘ॐकार सर्वाेच्च ईश्वराचा प्रतिनिधी किंवा दूत आहे.’ ‘ॐ’ हे ध्वनीचे मूळ स्वरूप आहे. – डॉ. सई खर्डीकर, होमिओपॅथी तज्ञ आणि योगशिक्षिका (‘जस्ट फॉर हार्ट्स’ ध्वनीचित्रफीत)

२. सूर्याचा ध्वनी !

‘अ’, ‘उ’ हे दोन स्वर आणि ‘म’ हे व्यंजन मिळून ‘ॐ’ या ध्वनीचे उच्चारण होते. ‘नासा’ने (अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेने) काही वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनात सूर्याभोवती ध्वनीची कंपने जाणवतात आणि हा ध्वनी ‘ॐ’सारखा आहे, हे अनेक वर्षांपूर्वी केलेले संशोधन आता बाहेर येत आहे. एका तज्ञांच्या मतानुसार ‘ॐ’काराचे १५० वेगवेगळ्या प्रकारे उच्चारण करता येते.

– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

३. ‘ॐ’ या बीजमंत्रात त्रिदेवांचा वास !

‘ॐ’ या बीजमंत्रात ब्रह्मा, विष्णु, महेश या त्रिदेवांचा वास आहे’, असे धर्मग्रंथांत सांगितले आहे. काही जण ‘ॐ’ या उच्चारणाचा जप करतात. जप केल्याने आध्यात्मिक उन्नती होते. ‘ॐ’चा जप मोठ्याने केला, तर वास्तूदोषही न्यून होतात. ‘ॐ’ या बीजमंत्राचा जप आणि ‘ॐ’काराचे उच्चारण यांत भेद आहे. जप मनातल्या मनातही करू शकतो. – सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

४. ‘ॐ’ हा वैश्विक ध्वनी म्हणजे साक्षात् परमेश्वराचे रूप !

‘ॐ’ हा वैश्विक ध्वनी आहे. या ध्वनीपासून अन्य ध्वनी निर्माण झाले. हा शब्द नाही, तर ध्वनी आहे. शब्दाला मर्यादा आहेत, ध्वनीला नाही. ‘ॐ’काराचे उच्चारण करतांना जिभेचा वापर केला जात नाही. जिभेचा वापर होतो, तो शब्द असतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतो, ‘प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पुरुषः ।’ म्हणजे ‘सर्व ध्वनींमध्ये ‘ॐ’ चा ध्वनी ‘मी’ आहे.’ त्यामुळे ‘ॐ’चे उच्चारण हे सृष्टीनिर्मात्याचे उच्चारण आहे. (संदर्भ -‘प्रशांतजे योगा’ ध्वनीचित्रफीत)

५. ‘ॐ’कार साधना कधी करावी ?

५ अ. ‘सकाळी लवकर उठून ‘ॐ’कार म्हणावा’, असे सांगितले जाते. सकाळची वेळ उत्तम म्हणजे सात्त्विक असते. दुपारची राजसिक आणि रात्रीची वेळ तमोगुणी असते. ‘ॐ’काराचे उच्चारण कुठल्याही वेळेत करू शकतो; मात्र सकाळच्या वेळी केल्याने सात्त्विक वातावरणामुळे त्याचा सर्वाधिक लाभ होतो.

५ आ. रात्रीही ॐकार करून झोपले, तर ‘ॐ’काराच्या ऊर्जेने विचार नष्ट होतात (जळतात). शांत झोप लागते. आपल्या भोवतीची प्राणिक ऊर्जा वाढते. २१ वेळा ‘ॐ’कार करून २१ रात्री झोपले, तर ऊर्जा निर्माण होण्यास साहाय्य होते. पूर्ण सकारात्मक, उत्साही वाटून कार्यक्षमता आणि निर्मितीक्षमता वाढते.

– (संदर्भ : ‘प्रशांतजे योगा’ ध्वनीचित्रफीत)

६. ‘ॐ’कार करतांना बैठक कशी असावी ?

६ अ. ‘ॐ’कार साधना करतांना पद्मासनात बसावे. पद्मासन शक्य नसेल, तर अर्धपद्मासनात बसावे. तेही शक्य नसेल, तर मांडी घालावी. ते शक्य नसेल, तर वज्रासन घालावे.

६ आ. भूमीवर आसन घालून बसावे. ते शक्य नसल्यास आसंदी किंवा पलंग यांवर बसावे.

६ इ. ‘ॐ’कार साधना करतांना पाठीचा कणा ताठ हवा.

६ ई. शक्यतो ध्यानमुद्रेत बसावे. हात ज्ञानमुद्रेत मांडीवर ठेवू शकतो. ज्ञानमुद्रा म्हणजे पहिले बोट अंगठ्याला टेकवून अन्य ३ बोटे उघडी ठेवावीत किंवा हात मांडीवर सैल ठेवले तरी चालतात.

६ उ. मान सरळ ठेवावी आणि डोळे अलगद मिटावेत.

६ ऊ. ‘ॐ’कार शक्यतो जिथे गडबड, गोंधळ नाही, अशा शांत ठिकाणी करावा. ती जागा स्वच्छ असावी.

६ ए. ‘ॐ’कार म्हणतांना मन स्थिर करा. मनात कुठलेही विचार आणू नका. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा किंवा उपास्यदेवतेचे स्मरण करा.

– डॉ. सई खर्डीकर, होमिओपॅथी तज्ञ आणि योगशिक्षिका (‘जस्ट फॉर हार्ट्स’ ध्वनीचित्रफीत)

७. ‘ॐ’कार करतांना ताठ का बसावे ?

‘ॐ’कार करतांना ताठ बसल्याने तुमची सर्व षट्चक्रे सरळ रेषेत येतात. ‘ॐ’कार उच्चारण करतांना प्राणिक ऊर्जा मूलाधार चक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत जात असते. मणिपूर म्हणजे पोटाचे स्थान हे ‘साठवणुकी’चे असते, तर गळ्याचे म्हणजे विशुद्धचक्राचे स्थान हे शरिराच्या ‘शुद्धीकरणा’चे असते. ते अधिक काळ होण्यासाठी ‘म’चा उच्चार मोठा करायचा असतो. हा उच्चार मोठा केल्याने भुवयांच्या मध्यभागी असलेले आज्ञाचक्र हे ‘प्राणा’चे प्रसरण करणारी जागा असते. त्यामुळे वाढवलेला उच्चार जेव्हा विशुद्धचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत पोचतो, तेव्हा त्याचे प्रसरण झाल्याने त्याचा लाभ पूर्ण देहाला होतो. त्यामुळे संपूर्ण शरिराची शुद्धी होते.

(संदर्भ :‘प्रशांतजे योगा’ ध्वनीचित्रफीत)

८. ‘ॐ’काराचे उच्चारण कसे करावे ?

८ अ. प्रथम तोंड उघडे ठेवून ‘अ’चे उच्चारण चालू करावे. नंतर हळूहळू ‘उ’चे उच्चारण करावे. थेट ‘ओ’चे उच्चारण करून ‘ॐ’काराचे उच्चारण चालू करू नये.

८ आ. ‘अ’चा उच्चार करतांना ओठ विलग ठेवावेत. हा उच्चार २ सेकंद करावा. ओठ मिटतांना ‘उ’चे उच्चारण साधारण ३ सेकंद आणि ‘म’चे उच्चारण ओठ बंद करून ५ सेकंद करा.

८ इ.उच्चारणाचा कालावधी या प्रमाणात वाढवू शकतो. ‘ॐ’कार करतांना मणिपूरचक्राशी, म्हणजे नाभीपाशी कंपने जाणवतात. ‘उ’चा उच्चार करतांना विशुद्धचक्रापाशी, म्हणजे गळ्यापाशी कंपने जाणवतात. ‘म’चा ध्वनी काढत असतांना सहस्रारचक्रापाशी, म्हणजे डोक्याच्या वर कंपने जाणवतात.

– डॉ. सई खर्डीकर, होमिओपॅथी तज्ञ आणि योगशिक्षिका (‘जस्ट फॉर हार्ट्स’ ध्वनीचित्रफीत)

८ ई. ‘अ’चा उच्चार पोटातून, ‘उ’चा उच्चार छातीतून आणि ‘म’चा उच्चार गळ्यातून करायचा आहे. त्या वेळी त्या त्या भागावर लक्ष केंद्रित करू शकतो.

(संदर्भ :‘प्रशांतजे योगा’ ध्वनीचित्रफीत)

९. ‘ॐ’काराचे उच्चारण करतांना श्वासाची क्रिया कशी हवी ?

प्रथम श्वास सोडून दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास घेतांना ‘अ’ चे उच्चारण चालू करावे. श्वास सोडतांना ‘उ’चे उच्चारण करावे. ‘म’चे उच्चारण करतांना ‘बाह्य कुंभक’ (श्वासोच्छ्वास पूर्ण झाल्यावर काही सेकंदांसाठी श्वास रोखणे) होते. ‘म’चे उच्चारण करतांना भ्रमर जसा गुंजारव करतो, तसा ध्वनी काढावा.

१०. ‘ॐ’काराचे उच्चारण करण्याची संपूर्ण कृती

योगसाधना करतांना प्रारंभीच्या शुद्धीक्रिया आणि कपालभाती या क्रिया झाल्यावर ‘ॐ’कार साधना करतात. ‘ॐ’काराचे उच्चारण करण्यापूर्वी प्रथम गायत्रीमंत्र ११ वेळा म्हणावा. नंतर ३ वेळा ‘ॐ’कार करावा. त्यानंतर २ मिनिटे आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करावे किंवा उपास्यदेवतेचे ध्यान करावे. त्यानंतर परत २ वेळा ‘ॐ’कार करावा. शेवटी तळहात एकमेकांवर घासून डोळे आणि चेहरा यांवर फिरवावेत.                   (संदर्भ : अंबिका योग कुटीर, ठाणे यांची ध्वनीचित्रफीत)