जळगाव – जीवनात कोणताही प्रसंग आधी सांगून येत नाही. युवती, महिला यांना तर अनेक प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा वेळी युवती प्रशिक्षित असल्यासच ती प्रतिकूल प्रसंगाचा सामना करू शकेल, याच भावनेने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरात विनामूल्य शौर्यजागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प.न. लुंकड कन्या शाळेत ८ जून या दिवशी चालू झालेल्या शिबिराची १७ जूनला सांगता झाली. या शिबिराचा लाभ शहरातील युवतींनी घेतला. यात कराटे, लाठी-काठी, दंड साखळी यांचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण देण्यात आले. सांगता प्रसंगी संपूर्ण शिबिर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवतींना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिबिराच्या समारोप प्रसंगी शिबिरार्थी युवतींचे पालकही आले होते. या वेळी युवतींनी त्यांना शिबिराचा कसा लाभ झाला ?, याविषयी सांगितले. पालकांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी सांगितले, ‘‘यापुढे शहरात अन्य काही ठिकाणी असे विनामूल्य शिबिर घेऊन अधिकाधिक युवतींना स्वसंरक्षण करण्याचे धडे देण्यात येतील.’’ समितीच्या वतीने केमिकल इंजिनियरिंग केलेल्या कु. सायली पाटील यांनी प्रशिक्षक म्हणून तर त्यांच्या सोबत कु. वैष्णवी बारी, कु. निकिता सोनार, कु. कोमल सोनार यांनीही सहप्रशिक्षक म्हणून सेवा केली.