SC Warns NTA : जर कुणाची ०.०१ टक्के चूक आढळली, तर आम्ही कठोरपणे कारवाई करू ! – सर्वोच्च न्यायालय

‘नीट’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एन्.टी.ए.ला दिली चेतावणी !

(‘नीट’ म्हणजे ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटरन्स टेस्ट’ – राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा)
(एन्.टी.ए. म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्स – राष्ट्रीय चाचणी यंत्रणा)

नवी देहली – ‘कुणाची ०.०१ टक्का जरी चूक आढळली, तरी आम्ही कठोरपणे कारवाई करू, अशी चेतावणी सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षेच्या संबंधित प्रकरणावर सुनावणी करतांना ‘एन्.टी.ए.’ला दिली. ‘हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा प्रश्‍न आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची कशी सिद्धता केली असेल ?, याची आम्हाला जाणीव आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. परीक्षेत खरोखरच काही चूक झाली असेल, तर ती मान्य करून दुरुस्त करावी. विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाऊ दिली जाणार नाही’, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. ‘नीट’ परीक्षेशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने ‘एन्.टी.ए.’ला नोटीस बजावली आहे. ८ जुलै या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

१. सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, फसवणुकीतून कुणी डॉक्टर झाला, तरी तो समाज आणि व्यवस्था यांना किती मोठा धोका आहे, याची कल्पना येऊ शकते. एखाद्या यंत्रणेने निःपक्षपाती असणे अपेक्षित आहेे.

२. दुसरीकडे ‘नीट’ची प्रश्‍नपत्रिका फोडण्याचा (लीक करण्याचा) मुख्य सूत्रधार संजीव मुखिया याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर पाटणा दिवाणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.