Minority Appeasement : राजकीय पक्षांकडून अल्पसंख्यांकांच्या केल्या जाणार्‍या लांगूलचालनाविषयीची माहिती आता धड्याच्या स्वरूपात !

  • राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या ११ वीच्या राज्यशास्त्राचे नवे पुस्तक

  • ‘व्होट बँकेचे राजकारण’ नावाचा धडा समाविष्ट करणार

नवी देहली – ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) ११ वीच्या सुधारित अभ्यासक्रमातील राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात ‘भारतातील ‘व्होट बँके’चे (मतपेढीचे) राजकारण, हे अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाशी संबंधित आहे. याद्वारे ‘सर्व राजकीय पक्ष नागरिकांच्या समानतेकडे दुर्लक्ष करत केवळ अल्पसंख्याकांच्या हिताला प्राधान्य देतात’, असे सांगण्यात आले आहे. ‘व्होट बँकेचे राजकारण’ या धड्यात हा मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे.

व्होट बँकेच्या राजकारणामुळे निवडणुकांचे राजकारण विकृत बनते !

पाठ्यपुस्तकाच्या नव्या आवृत्तीत म्हटले आहे की, व्होट बँकेच्या राजकारणात काही चुकीचे असू शकत नाही; परंतु या व्होट बँकेच्या राजकारणामुळे एखाद्या गटाला किंवा समाजाला निवडणुकीच्या काळात विशिष्ट उमेदवार दिला जात असेल किंवा एखादा समाज किंवा गट एका राजकीय पक्षासाठी एकत्र केला जात असेल, तेव्हा निवडणुकीचे राजकारण विकृत बनते. तुम्ही अशा उदाहरणांचा विचार करू शकता का ? अशा प्रकारच्या राजकारणात मतदानाच्या वेळी एक संपूर्ण गट एकत्र येऊन काम करतो. त्यांच्यात विविधता असली, तरी ते ठराविक व्यक्ती अथवा पक्ष यांना मतदान करतात. त्या वेळी व्होट बँकेचे राजकारण करणारे पक्ष किंवा नेते त्या एका गटाचाच विचार करतात. किंवा ‘आम्ही त्या एका गटासाठी काम करण्याचा प्रयत्न करू’, असा विश्‍वास त्या गटामधील लोकांमध्ये निर्माण करतात.

राजकीय पक्ष अल्पसंख्यांकांच्या गटाला आणि त्यांच्या हिताला प्राधान्य देतात !

या धड्यात पुढे म्हटले आहे की, भारतात राजकीय पक्षांनी बर्‍याचदा महत्त्वाच्या सूत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी निवडणुकीतील लाभांसाठी भावनिक सूत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. असे करत असतांना त्यांनी समाजाला भेडसावणार्‍या खर्‍या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. याचाच अर्थ राजकीय पक्ष नागरिकांच्या समानतेच्या तत्त्वांचा अवमान करतात आणि अल्पसंख्यांकांच्या गटाला आणि त्यांच्या हिताला प्राधान्य देतात; मात्र असे करत असतांना अल्पसंख्यकांचा गट अलिप्त रहातो. तसेच अल्पसंख्यांक गटातील विविधतेकडे दुर्लक्ष होते, त्यांच्या समाजिक सुधारणांचे सूत्र मागे रहाते.