दौंड (पुणे) येथील यांत्रिक पशूवधगृहाची अनुमती रहित !

  • ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी भव्य मोर्चा काढण्याची दिली होती चेतावणी

  • हिंदूंच्या एकजुटीचा विजय  

ह.भ.प. बंडातात्या कराडकर

केडगाव (जिल्हा पुणे) – दौंड येथील पशूवधगृहाला देण्यात आलेली अनुमती रहित करण्यासाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी २० जून या दिवशी भव्य मोर्चा काढून निषेध नोंदवण्याची चेतावणी दिली होती. ‘या पशूवधगृहामुळे भीमा आणि इंद्रायणी नदी अपवित्र होईल. या पशूवधगृहातील रक्तमिश्रित पाणी नदीपात्रांमध्ये सोडले जाऊन नदीच्या प्रदूषणात वाढ होईल, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल’, असे निवेदन राज्यशासनाला दिले होते. वारकर्‍यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने या पशूवधगृहाला दिलेली अनुमती रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.

१. सर्व हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेली भीमा नदी, चंद्रभागा नदी आणि श्री क्षेत्र सिद्धटेक गणपति मंदिराच्या जवळ सर्वांत मोठ्या शासकीय यांत्रिक पशूवधगृहाला सरकारने संमती दिली होती.

२. त्याला हिंदू, जैन, शीख, बौद्ध आणि वारकरी संप्रदाय यांचा तीव्र विरोध होता. हे पशूवधगृह संमत करतांना दौंड शहर आणि आजूबाजूला रहाणार्‍या नागरिकांचे मत लक्षात घेतले नव्हते.

३. या पशूवधगृहास सर्व स्तरांतून होणारा तीव्र विरोध पहाता शासनाकडून या पशूवधगृहाची अनमुती रहित केली. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत हिंदु समाज आणि संघटना यांनी केले आहे.