प्रत्येक लहान सहान गोष्टीतून ‘स्पंदने आणि भाव’ यांचे महत्त्व पटवून देणारे अन् त्याद्वारे जीवनाचे अध्यात्मीकरण करायला शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘१८.२.२०२२ या दिवशी प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने मी छायाचित्रांशी संबंधित एक सेवा (छायाचित्रांना संकेतांक घालणे) करत होते. एकच सूचना लिहिलेल्या २ लहान आकाराच्या पाट्यांची छायाचित्रे काढली होती. एका पाटीवर संगणकीय अक्षरांत सूचना लिहिली होती आणि दुसर्‍या पाटीवर एका साधकाच्या हस्ताक्षरात तीच सूचना लिहिलेली होती. मी ती छायाचित्रे उत्सुकतेने पाहिल्यावर मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीमती अलका वाघमारे

१. ‘संगणकीय अक्षरांत सजीवता अल्प आहे आणि त्यात केवळ ‘प.पू.’ या अक्षरांमुळे सजीवता आहे’, असे जाणवणे

दोन्ही पाट्यांवर ‘प.पू. (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) विश्रांती घेत आहेत’, असे लिहिलेले होते. संगणकीय अक्षरे नीटनेटकी, सुंदर आणि समान आकाराची होती; परंतु ‘त्या अक्षरांमध्ये सजीवता अल्प आहे. पाटीवरील अक्षरांमध्ये जी काही सजीवता आली आहे, ती ‘प.पू.’ या अक्षरांमुळे !’, असे मला जाणवले.

साधकाच्या हस्ताक्षरातील सूचना
संगणकीय अक्षरांत सिद्ध केलेल्या सूचना

२. ‘हाताने लिहिलेल्या पाटीवर असलेली ‘प.पू.’ ही अक्षरे आणि साधकाने अक्षरे भावपूर्ण लिहिणे’ यांमुळे त्या पाटीत अधिक सजीवता आणि भाव जाणवतो’, असे लक्षात येणे

साधकाच्या हस्ताक्षरातील सूचना
संगणकीय अक्षरांत सिद्ध केलेल्या सूचना

हाताने लिहिलेली अक्षरे वळणदार, सुंदर, नीटनेटकी आणि समान आकाराची होती. मला त्या अक्षरांमध्ये सजीवता अधिक प्रमाणात जाणवली आणि माझा भाव जागृत झाला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘या पाटीत सजीवता अधिक आहे; कारण त्यावर ‘प.पू.’ ही अक्षरे तर आहेतच आणि साधकाने ती अक्षरे भावपूर्ण लिहिली आहेत. त्यामुळे त्यात अधिक सजीवता आणि भाव जाणवत आहे.’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना भावाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना जीवनाचे अध्यात्मीकरण करायला शिकवले असणे

ती छायाचित्रे पाहून झाल्यावर त्यासंबंधी पुढची सेवा करतांना परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) त्या पाट्यांच्या संदर्भात लिहिलेले एक टिपण मला एका धारिकेत वाचायला मिळाले, ‘हाताने लिहिलेल्या अक्षरांमध्ये भाव जाणवतो.’ – प.पू. डॉक्टर.

ते टिपण वाचल्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘प्रत्येक लहानसहान गोष्टीतूनही भावाचे महत्त्व पटवून देणारे आणि त्याद्वारे जीवनाचे अध्यात्मीकरण करायला शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत !’

कृतज्ञता

छायाचित्रांशी संबंधित सेवेच्या माध्यमातून परात्पर गुरुमाऊलीने माझ्याकडून माझ्याही नकळत अभ्यास करून घेतला आणि भावाचे महत्त्व लक्षात आणून दिले. अशा एकमेवाद्वितीय श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती अलका वाघमारे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक