५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. ईश्वरी ओंकार बोडस (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! ईश्वरी ओंकार बोडस ही या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१५ मध्ये ‘चि. ईश्वरी ओंकार बोडस उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१  टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील  भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (५.६.२०२४)  ॐ

कु. ईश्वरी बोडस
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. ईश्वरी ओंकार बोडस (वय ९ वर्षे) रामनाथी आश्रमात प्रथमच रहायला आली आहे. तिची मावशी सौ. उमा उज्ज्वल कापडिया आणि मावशीचे यजमान आधुनिक वैद्य उज्ज्वल प्रताप कापडिया यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. उमा उज्ज्वल कापडिया (कु. ईश्वरीची मावशी)

सौ. उमा उज्ज्वल कापडिया

१ अ. सात्त्विकता आणि साधना यांची ओढ : ‘माझी भाची कु. ईश्वरी प्रथमच रामनाथी आश्रमात १५ दिवसांसाठी आली होती. आश्रमातील वातावरण अनुभवल्यावर तिने तिच्या आईला विचारले, ‘‘मला आश्रमात रहायला पुष्कळ आवडले. माझी सुटी संपेपर्यंत मी इथेच राहू का ?’’ तिच्या आई-बाबांनी तिला सुटी संपेपर्यंत, म्हणजे अजून एक मास आश्रमात रहायची अनुमती दिल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला. ती आश्रमात जो भेटेल, त्याला आनंदाने हे सांगत होती. ‘आता अजून काही दिवस आश्रमात राहून साधना शिकता येईल’, अशी तिची विचारप्रक्रिया होती. माझ्याशी बोलतांना ती मला अनेक वेळा विचारते, ‘‘साधनेचे कसे प्रयत्न केल्यावर मी लवकर संत होईन ?’’ यातून तिची साधनेची तळमळ लक्षात आली.

१ आ. जवळीक साधणे : ईश्वरी आश्रमातील सर्वांशी सहजतेने बोलते. तिने अल्प कालावधीत आश्रमातील सर्वांशी जवळीक केली.

१ इ. आवड-नावड नसणे : ती आश्रमातील जेवण आनंदाने जेवते. त्यात तिची आवड-नावड नाही.

१ ई. संतांप्रती भाव

१. एकदा आम्ही आश्रमातील मार्गिकेतून जात असतांना तिथून एक संत जात होते. तिला ‘ते संत आहेत’, असे सांगितल्यावर तिने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला.

२. एका संतांनी तिला तिच्या आवडीच्या खाऊचे एक पाकीट दिले. सहसा तिच्या वयाची मुले आवडीचा खाऊ एकाच वेळी खाऊन संपवतात; पण ‘हा केवळ खाऊ नसून संतांचा प्रसाद आहे’, असा ईश्वरीचा भाव होता. ती प्रतिदिन प्रसाद म्हणून खाऊचा केवळ एक तुकडा खाते.

२. आधुनिक वैद्य उज्ज्वल प्रताप कापडिया, फोंडा, गोवा.

आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया

२ अ. प्रेमभाव : ‘एके दिवशी माझ्या आईला बरे नसल्याने ती खोलीत झोपली होती. ‘आजीला बरे नाही’, हे ईश्वरीला कळल्यावर ती लगेच आजीच्या खोलीत गेली आणि तिचे पाय चेपायला लागली. त्यानंतर ती आजीला म्हणाली, ‘‘आजी, तुम्हाला मी औषध आणून देऊ का?’’

२ आ. प्रत्येक कृती भावपूर्ण, परिपूर्ण आणि नीटनेटकी करणे

१. ईश्वरीला मी एकदा मोठ्या रिकाम्या खोक्यात लहान खोकी भरून ठेवायला सांगितली. तिने ती खोकी कशीही न भरता मोठ्या खोक्यात नीट लावली. ती प्रत्येक कृती करण्यापूर्वी प्रार्थना करते आणि कृती झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करते. ती प्रत्येक कृती परिपूर्ण करायचा प्रयत्न करते.

२. माझ्याकडे पूजेसाठी लागवडीतून फुले आणायची सेवा आहे. एकदा मी तिला ध्यानमंदिरातील पूजेच्या फुलांचे ताट ध्यानमंदिरात देऊन यायला सांगितले. तेव्हा तिने त्या फुलांची छान रचना करून ताट ध्यानमंदिरात नेऊन दिले.

३. सौ. उमा उज्ज्वल कापडिया आणि आधुनिक वैद्य उज्ज्वल प्रताप कापडिया, फोंडा, गोवा.

३ अ. समंजसपणा : ‘कु. ईश्वरी वयाने लहान असूनही ती पुष्कळ समंजस आहे. ‘कुठल्या परिस्थितीत कसे वागायला हवे ?’, याची तिला चांगली समज आहे.

३ आ. व्यष्टी साधनेची सूत्रे समजून घेणे आणि नियमितपणे साधनेला आरंभ करणे : ‘ईश्वरी इथे आल्यावर तिला व्यष्टी साधनेची सूत्रे समजावून सांगितली. तिने लगेच ती कृतीत आणायलाही आरंभ केला.

३ आ १. नियमित नामजपादी उपाय करणे : ती आश्रमात आल्यापासून प्रतिदिन १ घंटा बसून नामजप करते आणि वहीत २ पाने नामजप लिहिते. ती झोपण्यापूर्वी नामजप करूनच झोपते.

३ आ २. प्रतिदिन आवरण काढणे : आम्ही तिला ‘स्वतःवर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण कसे काढायचे ?’, ते एकदाच शिकवले आहे. आता ती प्रतिदिन स्वतः भोवतीचे त्रासदायक आवरण काढते.

३ आ ३. प्रतिदिन स्वभावदोष निर्मूलनासाठी चुकांची सारणी लिहिणे : आश्रमात आल्यावर पहिल्या दिवशी तिने आश्रमातील चुकांचा फलक बघितला. तिला स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘मीही प्रतिदिन माझ्या चुका िलहून स्वभावदोष निर्मूलन करीन.’’ आता ती प्रतिदिन स्वभावदोष निर्मूलनासाठी सारणी (टीप) लिहिते. सारणी लिहितांना आरंभी १० – १२ दिवस मी तिला ‘कुठल्या स्वभावदोषामुळे चूक झाली’ आणि ‘त्यावर योग्य दृष्टीकोन कुठला ?’, हे समजावून सांगत होते. आता तिच्या ते लक्षात येते.

(टीप – दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्यापुढे त्या कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या, ते लिहिणे आणि त्या पुढे योग्य कृती किंवा दृष्टीकोन लिहिणे)

३ आ ४. चूक लगेच स्वीकारून प्रायश्चित्त घेणे : ईश्वरीकडून झालेली चूक तिला सांगितल्यावर ती अंतर्मुख होऊन विचार करते आणि चूक लगेच स्वीकारते. ‘समष्टीत चूक सांगणे’, ‘कान पकडून क्षमा मागणे’, ‘आश्रमातील फलकावर चूक लिहिणे’, असे सर्व प्रयत्न ती आता नियमित करते. तिच्याकडून एखादी गंभीर चूक झाली, तर ती त्यावर लगेच प्रायश्चित्तही घेते.

३ आ ५. स्वीकारण्याची वृत्ती : आम्हाला सेवेसाठी पहाटेच आश्रमात जावे लागते. ‘ईश्वरी घरी आली आहे, तर पहाटेच्या सेवेचे कसे करूया ?’, असा आम्हाला प्रश्न होता; परंतु तिला त्याविषयी सांगितल्यावर ती पहाटे ५ वाजता उठून आमच्या समवेत आश्रमात यायला सिद्ध झाली. एवढ्या लहान वयात आणि सुटी असतांनाही तिने प्रतिदिन पहाटे उठून आवरून आश्रमात यायचे लगेच स्वीकारले. ती पहाटे उठून सर्व आवरून आमच्या समवेतच आश्रमात येते.

३ आ ६. तारतम्याने भक्तीगीतावर बसवलेले नृत्य करून दाखवणे : तिला नृत्याची पुष्कळ आवड असून ती भरतनाट्यम् शिकते. आश्रमातील साधकांना तिने भक्तीगीतावर बसवलेले नृत्य करून दाखवले. नंतर ती आमच्याकडे येऊन म्हणाली, ‘‘मी एका हिंदी चित्रपटातील गाण्यावरही नृत्य शिकले आहे; पण आश्रमात चित्रपटातील गाण्यावरचे नृत्य करणे योग्य नाही, म्हणून मी ते नृत्य केले नाही.’’

४. स्वभावदोष 

१. ‘मला सर्व कळते’ किंवा ‘मला सर्व माहिती आहे’, असे वाटणे

२. ‘स्वतःला महत्त्व मिळावे’, असे वाटणे

३. प्रतिमा जपणे’

(सर्व सूत्रांचा दिनांक २६.५.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.