सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनसेवा !

५ जून २०२४ या दिवशीच्या लेखात आपण धर्माचरण न केल्यामुळे हिंदूंची झालेली आणि होत असलेली हानी पाहिली. आता या भागात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी कीर्तनाच्या माध्यामातून जाणून घेणार आहोत.

(भाग ३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/800823.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

८. आख्यान

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अलौकिक कार्याचा जीवनपट !

८ अ. काळानुरूप परिस्थिती ओळखून स्वधर्मानुसार आचरण करून सच्चिदानंद परब्रह्म या पदाला गाठणारे एक महान संत ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ ! : ‘काळानुरूप परिस्थिती ओळखून स्वधर्मानुसार आचरण करून ‘सच्चिदानंद परब्रह्म’ पदी विराजमान झालेले एक महान संत आजच्या या घोर कलियुगात सर्वांना साधनेचा सरळ, सोपा आणि विहंगम मार्ग दाखवण्यासाठी जन्माला आले आहेत.

जन्मला एक भारतात समष्टी संत ।
बाळाजी-नलिनीचा हा सूत ।।
मानस विद्या पूर्णची अवगत ।
आंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त, नाव ‘जयंत’ ।। १ ।।

८ आ. जन्म, शिक्षण, व्यवसाय : या संतांच्या भारतभूमीत वैशाख कृष्ण सप्तमी या तिथीला ‘नागोठणे’ या गावात आठवले कुळात एक दिव्य बालक जन्माला आला. ही एकूण ५ भावंडे ! त्यांपैकी तिसर्‍या क्रमांकाचे हे चिरंजीव ! ही सगळीच भावंडे उच्च विद्याविभूषित झाली. त्यापैकी ‘जयंत’ हे संमोहन उपचार शास्त्रात पारंगत झाले. त्यांनी वर्ष १९७१ ते वर्ष १९७८ या काळात इंग्लंडमध्ये संमोहनशास्त्राचा अभ्यास केला आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ म्हणून ख्याती मिळवली. भारतात परत आल्यावर मुंबईत त्यांनी चिकित्सालय चालू केले.

श्रीमती लीला घोले

८ इ. संमोहन उपचाराद्वारे उपचार करतांना काही बरे न झालेले रुग्ण साधना किंवा काही विधी करून बरे होतांना पाहून डॉ. आठवले यांनी साधना करणे : ‘जे रुग्ण औषधोपचार करूनही बरे झाले नाहीत, ते रुग्ण संतांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून किंवा काही विधी करून पूर्णपणे ठणठणीत बरे झाले’, हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि ‘अध्यात्म हे विज्ञानाच्या पुढचे शास्त्र आहे’, हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी संतांच्या मार्गदर्शनानुसार स्वतः साधना करायला आरंभ केला.

८ ई. अनेक संतांकडे जाऊन साधना करायला आरंभ करणे

मानस विद्या अपूर्ण कळली । अध्यात्माची महत्ता गवसली ।
शिकण्यासाठी ओढ लागली । संतांचा शोध घेती ।। २।।

संतांचा शोध चालू केल्यावर त्यांना अनेक संत भेटले. ‘प.पू. अण्णा करंदीकर, प.पू. जोशीबाबा, प.पू. बेजन देसाई, प.पू. काणे महाराज, प.पू. भाऊ मसूरकर’, अशा अनेक संतांकडून त्यांनी अध्यात्माचे ज्ञान घेतले. वर्ष १९८७ मध्ये त्यांची इंदूरनिवासी संत प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी भेट झाली. प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना अनुग्रह दिला. तिथून त्यांची खर्‍या अर्थाने साधना चालू झाली.

संत समागम अनेक केले । साधनेत मग उन्नत झाले ।
परमगुरु भक्तराज भेटले । शिष्य गुणवंत ।। ३ ।।

सौ. श्रेया साने

८ उ. व्यष्टी साधना ३ – ४ वर्षांत पूर्ण झाल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्य डॉ. आठवले यांना समष्टी साधना करायला सांगणे : वर्ष १९८७ मध्ये गुरुभेट झाल्यावर डॉ. आठवले यांनी गुरुसेवेला वाहून घेतले. ३ – ४ वर्षांतच त्यांची व्यष्टी साधना पूर्ण झाली. त्यानंतर प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्य डॉ. आठवले यांना समष्टी साधना करायला सांगितली.

८ उ १. व्यष्टी आणि समष्टी साधना

८ उ १ अ. व्यष्टी साधना : आपल्याला प्रश्न पडला असेल, ‘व्यष्टी आणि समष्टी साधना म्हणजे काय ?’ त्याचे उत्तर असे, ‘स्वतःच्या वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी केल्या जाणार्‍या साधनेला ‘व्यष्टी साधना’ म्हणतात. आजच्या कलियुगात व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व आहे.

ओवी

स्वत:ची प्रगती व्हावी म्हणून जपतप केले तळमळीने ।
ही व्यष्टी साधना करून । झाला नराचा नारायण ।।

८ उ १ आ. समष्टी साधना : सर्व जिवांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले कार्य, म्हणजे ‘समष्टी साधना’ ! आजच्या कलियुगात समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे.

ओवी

जगाची सात्त्विक उन्नती होण्या, केली भक्ताने जी कृती ।
त्याला ‘समष्टी साधना’ म्हणती, जी जगाते उद्धरी ।।

८ ऊ. वर्ष १९९० मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या आज्ञेने समष्टी साधनेसाठी ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’ची स्थापना होणे : वर्ष १९९० मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या आज्ञेने समष्टी साधनेसाठी ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’ची स्थापना झाली आणि धर्मशिक्षण अन् जाहीर सभा घ्यायला आरंभ झाला.

व्यष्टी साधनेचे बल पूर्ण । गुरु आज्ञेने समष्टी साधन ।।
म्हणूनी ‘सनातन संस्था’ स्थापून । होई यशवंत ।। ४ ।।

८ ए. ‘गुरुकृपायोग’ : पुढे प.पू. डॉ. आठवले यांनी साधकांची विहंगम मार्गाने उन्नती व्हावी; म्हणून ‘गुरुकृपायोग’ सांगितला. आपल्याला ४ च योग ठाऊक आहेत. कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग; पण ‘गुरुकृपायोग’ म्हणजे काय ?

साकी (ओवी, साकी आणि दिंडी ही सर्व वृत्ते आहेत. – सौ. साने)

ज्या योगे ही साधका शिष्यत्वाला सहज नेते ।
भक्ती, ज्ञान, ध्यान, कर्मयोगाचा, संगमही घडविते ।
विहंगम मार्गची हा साधनेचा, गुरुकृपायोगाचा ।।

कुठल्याही योगानुसार साधना केली, तरी शेवटी गुरुकृपेविना साधकाला पुढच्या टप्प्याला जाता येत नाही. त्यामुळे ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना ही प्रत्येक योगाला पूरक साधना आहे.

८ ए १. गुरुकृपायोगांतर्गत अष्टांग साधना : गुरुकृपायोगात साधनेची आठ अंगे सांगितली आहेत; म्हणून गुरुकृपायोगानुसार साधना करण्यासाठी अष्टांग साधना करायला हवी. प्रपंच करतांनाच आपण या ८ ही अंगांनी साधना करू शकतो. या ८ अंगांनी एकाच वेळी साधना करून शीघ्र गतीने साधनेत प्रगती करता येते.

अष्टांग साधना (आर्या)

नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती नी भावजागृती ।
दोष, अहम् निर्मूलन करूनी साधक भवसागरा तरती ।।

८ ए २. पहिल्या टप्प्यात स्वतःचे स्वभावदोष आणि अहं ओळखून त्यांच्या निर्मूलनासाठी सतत प्रयत्नशील रहाणे : स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं न्यून केल्यावर अंतर्मनातील स्वभावदोषांची जळमटे आणि अंधकार दूर होऊन मन निर्मळ होते. त्यामुळे नंतर प्रत्येक कृतीतून आपल्याला आनंदप्राप्ती होऊ लागते.

८ ए ३. दुसर्‍या टप्प्याला प्रत्येक परिस्थितीचे आध्यात्मिकीकरण करणे

८ ए ३ अ. नोकरी करणार्‍या व्यक्तींनी रिकामा वेळ मिळेल, तेव्हा स्वतःला नामाची आठवण करून देणे : आजकाल स्त्रियाही नोकरीला जातात. मग ‘घर-संसार-नोकरी या तारेवरच्या कसरतीत त्यांनी साधना कधी करावी ?’ नोकरी करणार्‍या व्यक्तींनी कार्यालयात जाता-येता जो वेळ मिळतो, त्या वेळेत नामजप करण्याची स्वतःला सवय लावावी. ‘स्वतःचे नाम चालू आहे ना ?’, याकडे लक्ष द्यावे; कारण ‘नाम’ हाच चैतन्य देणारा मोठा सत्संग आहे. नामामुळे ती देवता सतत आपल्याजवळ रहाते.

८ ए ३ आ. नोकरी करणार्‍या व्यक्तींनी नोकरीलाच सत्सेवेचे स्वरूप द्यावे : नोकरी करणार्‍या व्यक्तींनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे आणि चोखपणे करावे. नोकरीतील काम ‘गुरुसेवा’ या भावाने करून नोकरीलाच सत्सेवेचे स्वरूप द्यावे. स्वतःचे स्वभावदोष आणि अहं यांवर मात करून सेवास्वरूपात नोकरी करावी.

नोकरी करतांना तन आणि मन यांचा त्याग होतो. त्यामुळे नोकरी करणार्‍या व्यक्तीही सहज गुरुकृपायोगानुसार साधना करू शकतात.

८ ए ३ इ. प्रीती : आपल्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीविषयी सद्विवेकबुद्धी ठेवून निरपेक्षपणे कृती करून प्रीतीचा टप्पा गाठता येऊ शकतो.

८ ए ३ ई. भावजागृती : ‘प्रत्येक कृती मी माझ्या इष्टदेवतेसाठीच करत असून प्रत्येक कृतीतून मला त्या देवतेचा आशीर्वाद मिळत आहे’, असा भाव ठेवल्यावर ‘भावजागृती’ हा टप्पाही पूर्ण होतो.

याप्रमाणे प्रत्येक कृतीचे आध्यात्मिकीकरण करून साधना करणे प्रत्येकाला सहज शक्य होईल आणि उत्तम शिष्य बनून गुरुकृपा संपादन करणे प्रत्येकाला सोपे होईल.’ (क्रमशः)

– ह.भ.प. श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८१ वर्षे) आणि सौ. श्रेया साने, पुणे. (जून २०२३)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/801517.html