परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सूक्ष्म-जगताच्या संदर्भात साधकाला शिकायला मिळालेले विविध पैलू !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या प्रश्नांची सूक्ष्मातून उत्तरे देणे’, या सेवेतून सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होण्याचा एक पैलू मला समजला; परंतु ‘त्याला अनेक पैलू असतात’, हे पुढील प्रसंगांतून माझ्या लक्षात आले.

श्री. राम होनप

१. वर्ष २०२३ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचा ब्रह्मोत्सव सोहळा पार पाडला. त्यात कु. सुप्रिया टोणपे यांना टाळ घेऊन नृत्य करण्याची सेवा मिळाली होती. ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी त्यांचा त्याविषयीचा सराव चालू होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘तुमचा सराव कसा चालू आहे ?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘छान !’’ तेव्हा मी त्यांना सहज म्हणालो, ‘‘रात्री झोपेतही तुमचा सराव चालू असतो ना ?’’ तेव्हा त्या हसून म्हणाल्या, ‘‘हो. तसेच आहे. तुम्हाला सर्व समजते.’’

२. मी रहात असलेल्या खोलीत डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथून आलेले साधक श्री. प्रकाश शिंदे रहातात. एकदा शिंदेकाका मला त्यांच्या डोंबिवली येथील घराविषयी काही सूत्रे सांगत होते. त्या वेळी ‘त्यांच्या घरातील देवघर स्वयंपाकघरात आहे’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले; म्हणून मी काकांना विचारले, ‘‘तुमचे देवघर स्वयंपाकघरात आहे का ?’’ तेव्हा काका ‘हो’, असे म्हणाले. त्यानंतर काकांनी पुढे बोलणे चालू केले. तेव्हा ‘काकांच्या देवघरातील काही मूर्ती चांदीच्या आहेत’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले; म्हणून मी काकांना विचारले, ‘‘तुमच्या देवघरातील काही मूर्ती चांदीच्या आहेत का ?’’ तेव्हा काकांनी ‘हो’, असे उत्तर दिले. प्रत्यक्षात मी काकांच्या घरी डोंबिवलीला कधीही गेलो नाही.

३. एकदा मी नामजप करतांना माझ्या मनात विचार आला, ‘एका साधकाला दुचाकी चालवतांना रस्ता धूसर दिसण्याचा त्रास होत आहे. त्यांनी उपनेत्राचा वापर करायला हवा.’ थोड्या वेळाने तो साधक मी रहात असलेल्या खोलीत आला. तेव्हा मी त्याला विचारले, ‘‘तुला दुचाकी चालवतांना धूसर दिसण्याचा त्रास होतो का ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘गेल्या ८ दिवसांपासून मला हा त्रास होत आहे. मला चष्मा नाही. मी लगेच नेत्रतपासणी करून घेतो.’’ काही दिवसांनी तो साधक मला म्हणाला, ‘‘मला चष्मा लागला आहे.’’

४. ५.१०.२०२३ या दिवशी मी नाशिक येथील साधक श्री. कौस्तुभ क्षत्रिय यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क केला. त्यांच्याशी बोलतांना माझ्या मनात विचार आला, ‘आता कौस्तुभ यांनी बंद गळ्याचा टी-शर्ट घातला आहे.’ हा विचार माझ्या मनात २ – ३ वेळा आल्याने मी कौस्तुभ यांना विचारले, ‘‘तुम्ही आता बंद गळ्याचा टी-शर्ट घातला आहे का ?’’ त्यांनी ‘हो’, असे उत्तर दिले.

५. एकदा मी माझ्या मित्राच्या घरी काही दिवस मुक्कामासाठी गेलो होतो. ‘मला विविध विषयांवर सूक्ष्मातून ज्ञान मिळते’, हे त्याला पटत नाही. एकदा रात्री मी अर्धवट झोपेत होतो. जसे पूर्वीच्या काळी राजवाड्याबाहेर हातात भाला घेऊन पहारेकरी उभे असायचे, तसे दोन रक्षक मला सूक्ष्मातून त्याच्या घरात दिसले. सकाळी उठल्यावर मी हा प्रसंग मित्राला सांगितला. तेव्हा त्याला आश्चर्य वाटले; कारण त्याने विशिष्ट साधना करून स्वतःच्या रक्षणासाठी सूक्ष्मातून दोन रक्षक प्राप्त केले होते. मला रात्री सूक्ष्मातून ते दोन रक्षक दिसले होते. हा विषय गुप्त ठेवायचा असल्याने त्याने तो कुणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर तो मित्र मला म्हणाला, ‘‘तुला सूक्ष्मातून समजते’, हे मला आता पटले.’’

‘श्री गुरूंच्या कृपेमुळे मला अनेक प्रसंगांतून सूक्ष्म-जगताविषयी विविध पैलू शिकायला मिळाले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१०.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक