सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी नाशिक येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. श्री. प्रशांत कुलकर्णी

१ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ एकरूप झाले आहेत’, असे वाटणे आणि मन निर्विचार होणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी व्यासपिठावर सूत्रसंचालक श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची ओळख करून दिली. तेव्हा मला सद्गुरु काकांच्या ठिकाणी पांढरा तेजस्वी गोळा दिसला. त्यानंतर ‘त्यांच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत’, असे मला जाणवले. नंतर तिथे मला पुन्हा सद्गुरु काका दिसले. तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु गाडगीळकाका एकरूप झाले आहेत’, असे मला वाटले. माझे मन निर्विचार झाले आणि मला आतून आनंद झाला.’

२. सौ. सविता भगुरे

२ अ. आश्रमात सेवेनिमित्त जाण्याचा विचार आल्यावर दुसर्‍या दिवशी सत्संगात ‘ब्रह्मोत्सवासाठी साधक जाऊ शकतात’, असे समजणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मनाची स्थिती कळत असल्याची जाणीव होणे : ‘ब्रह्मोत्सवाला जाण्याचा निरोप मिळण्यापूर्वी मी यजमानांना सांगितले होते, ‘‘आपण सुटीत मुलींना घेऊन एक आठवडा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेला जाऊया.’’ दुसर्‍या दिवशी सत्संगात ‘ब्रह्मोत्सवासाठी साधक जाऊ शकतात’, असे सांगितले. तेव्हा ‘गुरुदेवांना आपल्या मनाची स्थिती कळते’, याची मला जाणीव झाली आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२ आ. नाशिकहून गोवा येथे बसने जातांना प्रवासात आलेल्या अनुभूती

१. ‘आम्ही ब्रह्मोत्सवासाठी नाशिक येथून बसने निघाल्यावर प्रवास आणि ब्रह्मोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी ‘शून्य’ हा नामजप करत होतो. तेव्हा आरंभी ‘माझ्यावरील त्रासदायक आवरण निघून जात आहे’, असे मला वाटले.

२. त्यानंतर मला ध्यानात दिसले, ‘ब्रह्मोत्सवासाठी एक भव्य व्यासपीठ झेंडूच्या माळांनी सजवले आहे. झेंडूच्या माळांनी एक मोठी शिवपिंड आणि यज्ञकुंड सजवले आहे. ब्रह्मोत्सव चालू आहे. साधक बसले आहेत. ब्रह्मोत्सव होत असलेल्या मैदानाभोवती दोन मोठे गरुड घिरट्या घालत आहेत. ते पाहून माझी भावजागृती झाली.’

३. आम्ही कोल्हापूर येथे पोचल्यावर मला तेथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नाही. ज्या साधकांना महालक्ष्मीदेवीचे दर्शन झाले नव्हते, ते सर्व जण सकाळी लवकर उठून दर्शनाला गेले होते; मात्र मला ते सुचले नाही.

त्या वेळी सहसाधिकेने तिला महालक्ष्मीच्या मंदिरात मिळालेल्या दोन वेण्यांतील एक वेणी मला ब्रह्मोत्सवाच्या वेळी घालण्यासाठी दिली. तेव्हा माझी भावजागृती होऊन मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली. मी सूक्ष्मातून देवाला सांगितले, ‘देवा, तू मला पुष्कळ सुंदर स्थितीत तुझ्याकडे बोलावत आहेस.’

४. आम्ही गोवा राज्यात प्रवेश केल्यावर मला सूक्ष्मातून दिसले, ‘आमच्या बसच्या वरील बाजूस सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सिंहासनावर आरुढ झाले आहेत अन् ते आम्हाला ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी घेऊन जात आहेत.’

२ इ. माझा ‘अखंड नामजप व्हावा’, यासाठी मी बोटमाळ (बोटात घालायची जपमाळ) घेऊन सतत नामजप करत होते. ‘या माळेला चंदनाचा सुगंध येत आहे’, असे मला जाणवत होते.

२ ई. ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी पहिल्या कमानीतून प्रवेश करतांना मला गोड चव जाणवली, तसेच मला चंदनाचा सुगंध येत होता.’

३. सौ. निशा रवींद्र बिरारी

३ अ. ब्रह्मोत्सवाला जाण्याच्या संदर्भातील निरोप मिळाल्यावर कसलाही विचार न करता गोव्याला जाण्याचे ठरवणे आणि नंतर शारीरिक त्रास अन् घरातील विरोधही उणावणे : ‘मला शारीरिक त्रास असल्यामुळे आणि घरातून अनुमती मिळण्यास कठीण असल्यामुळे ‘ब्रह्मोत्सवासाठी गोवा येथे जाता येईल कि नाही ?’, असे मला वाटत होते. ‘मी ब्रह्मोत्सवासाठी जाऊ शकते’, असे मला समजल्यावर मी कसलाही विचार न करता गोवा येथे जायचे ठरवले. माझ्या मनात गुरुदेवांना भेटण्याचा एकच ध्यास होता. मला ब्रह्मोत्सवासाठी जातांना अडचणी आल्या; परंतु नंतर शारीरिक त्रास आणि घरातील विरोधही उणावला.’

४. सौ. भारती खरपुडे

४ अ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी स्वप्नात दिसलेले दृश्य -‘श्री. विनायक शानबाग गुरुदेवांना घरी घेऊन आले आहेत आणि गुरुदेवांनी ‘हे घर म्हणजे आश्रम आहे’, असे सांगणे : ‘मला ब्रह्मोत्सव सोहळ्याला जाण्याची इच्छा असतांनाही काही अडचणींमुळे मी जाऊ शकले नाही. ११.५.२०२३ या दिवशी पहाटे मला स्वप्नात दिसले, ‘श्री. विनायक शानबाग गुरुदेवांना ( सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) घरी घेऊन आले. मी गुरुदेवांना म्हणाले, ‘माझी साधीभोळी भक्ती, तरीही तुम्ही माझ्यासाठी आलात.’ तेव्हा गुरुदेवांनी सांगितले, ‘हे घर म्हणजे आश्रमच आहे.’ तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

४ आ. ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी मला गुरुदेवांच्या मुखावर सूर्यासारखे तेज जाणवत होते.

४ इ. ‘हिंदु राष्ट्राची पताका झळकणार आहे’, असे मला वाटले.’

५. श्रीमती शामला देशमुख (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६१ वर्षे) आणि सौ. प्राची कुलकर्णी

अ. ‘ब्रह्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांचे रथातून आगमन झाल्यावर त्यांना पहात असतांना ‘प्रत्यक्ष भगवान विष्णूचे दर्शन होत असून आम्ही वैकुंठात आलो आहोत’, असे आम्हाला वाटले. आमची भावजागृती होऊन आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

आ. विष्णुस्तुती होत असतांना सूर्यनारायण शांतपणे विष्णूची स्तुती ऐकत होता. तेव्हा सूर्याची प्रखरता जाणवत नव्हती.

इ. सोहळा चालू असतांना एका ढगाचा आकार गरुडासारखा दिसत होता. तेव्हा ‘विष्णुवाहन गरुडाचेही तेथे आगमन झाले आहे’, असे आम्हाला जाणवले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १७.६.२०२३)

  •  येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.