China Recognises Taliban : तालिबानला मान्यता देणारा चीन ठरला पहिला देश !

पाकचा विरोध डावलून चीनने तालिबानशी केली हातमिळवणी : भूराजकीय संबंध ढवळून निघणार

बीजिंग (चीन) – वर्ष २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून चीनसमवेतचे संबंध सुधारले आहेत. मानवतावादी साहाय्य देणारा, मोठ्या गुंतवणुकीच्या करारांवर स्वाक्षरी करणारा, तसेच काबुलमध्ये राजदूत नियुक्त करणारा आणि तालिबानचा राजदूत स्वीकारणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे. या भागात स्वतःचा प्रभाव वाढवण्याची चीन या कृती करीत आहे, असे सांगण्यात आले आहे. चीनचा पाकसमवेत असलेला महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्प चालू असलेल्या प्रदेशाच्या मध्यभागीही अफगाणिस्तानच आहे; परंतु गंमत अशी की, तालिबानसमर्थित आतंकवादी कारवायांमुळे पाकशी असलेले तालिबानचे संबंध ताणले गेले आहेत. अशात पाकला डावलून चीनने स्वत:चा प्रकल्प पुढे नेण्यासाठी तालिबानशी हातमिळवणी केली आहे.

१. चीन आणि पाक त्यांच्या स्वत:च्या धोरणांचा पाठपुरावा करतील, परंतु या त्रिपक्षीय संबंधांमधील चढ-उतारांचा परिणाम अफगाणिस्तानचे भविष्य आणि प्रादेशिक स्थैर्य यांच्यावर होणार आहे.

२. जगातील अनेक देश चीनला तालिबानवर निर्बंध लादण्याचे आवाहन करीत आहेत.  जानेवारी २०२४ मध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले होते की, तालिबान राजवटीने गैर-तालिबान आणि गैर-पश्तून गटांसह सर्वसमावेशक प्रशासन सिद्ध केले पाहिजे.

संपादकीय भूमिका

येनकेन प्रकारेण स्वत:चे इप्सित साध्य करण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो. या स्वार्थांध धोरणाचे नवे पैलू तालिबानशी केलेल्या जवळीकतेतून समोर येत आहेत. अर्थात् काळाची पावले ओळखून चीन अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांनाही धुळीस मिळवण्यात मागे-पुढे पहाणार नाही, हेच खरे !