China Mosque Demolition : भारत किंवा अन्य देशांत झाले असते, तर आकाश-पाताळ एक करण्यात आले असते !

चीनमध्ये मशिदींचे घुमट आणि मिनार हटवण्यावरून पाकिस्तानी नागरिकांचा संताप आणि पाक सरकारवर केली टीका  

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अरबी शैलीत बांधलेली एकही मशीद आता चीनमध्ये उरलेली नाही. चीनच्या शेवटच्या मोठ्या मशिदीच्या इमारतीमध्ये अनेक पालट करतांना घुमट आणि मिनार काढण्यात आले आहेत. मशिदीच्या इमारतीचे रूपांतर अरबी शैलीतून चिनी वास्तूकलेमध्ये करण्यात आले आहे. देशातील मशिदींचे चिनीकरण  करण्याच्या सरकारी मोहिमेचा भाग म्हणून चीनमध्ये हे पालट केले जात आहेत. मिनार नसलेल्या मशिदींची छायाचित्रे समोर आल्यानंतर पाकिस्तानी यू ट्यूबर (यू ट्यूब चॅनल चालवणारी) सना अमजद यांनी तेथील सामान्य लोकांशी संवाद साधला. या वेळी  पाकिस्तानी नागरिकांनी चीनच्या या कृत्याविषयी संताप व्यक्त केला. भारत किंवा अन्य देशांत असे झाले असते, तर आकाश-पाताळ एक करण्यात आले असते, अशी टीका त्यांनी केली.

चीनमध्ये मशिदींचा कायापालट होत असल्याच्या प्रश्‍नावर पाकिस्तानी नागरिक गझनफर म्हणाले की, हे चीनमध्ये घडले आहे; परंतु बातम्यांमध्ये ते कुठेही दाखवले गेले नसल्यामुळे मला त्याविषयी नीट माहिती नाही. हे भारतात किंवा जगाच्या इतर कोणत्याही भागात घडले असते, तर पाकिस्तानी लोकांनी आकाश-पाताळ एक केले असते.  विशेषतः धर्माचे ठेकेदारी करणार्‍यांनी मौलवींनी आकांडतांडव केला असता. ही घटना चीनशी संबंधित असल्याने त्यावर मौन बाळगण्याचे एक कारण म्हणजे पाकिस्तानचे चीनशी असलेले संबंध अतिशय विशेष आहेत. कदाचित् आता जगातील चीन असा एकमेव देश आहे, ज्याच्यावर पाकिस्तानचा थोडाफार विश्‍वास उरला आहे. चीनचा पाकिस्तानला मोठा आधार आहे, त्यामुळे ‘जे काही होत आहे, ते होऊ द्या’, असे कदाचित् पाकिस्तानींना आणि सरकारला वाटत असेल.

चीन सरकार काहीही उघड होऊ देत नाही !

अभियंता असलेले ओसामा म्हणाले की, चीनच्या लोकांसाठी ही नवीन गोष्ट नाही, ते तिथे सर्वांना समान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाने सारखाच विचार करावा आणि मशीद असो किंवा इतर काहीही असो, सर्व वास्तू सारख्याच दिसाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे. चीन सरकारचे धोरण असे आहे की, ते बातम्या बाहेर येऊ देत नाहीत.

भारताकडून नाही, तर चीनकडून पाकिस्तानला धोका !

पाकच्या पंजाब विद्यापिठातून शिक्षण घेत असलेले सरदार अहमद म्हणाले की, चीनकडून आर्थिक साहाय्य घेत असलेली पाकिस्तानी प्रसारमाध्यमे ही बातमी कशी दाखवणार ?, ते गप्पच बसणार आहे. चीन हा असा देश आहे, ज्याला आपण पाकिस्तानचा खरा शत्रू म्हणू शकतो. चीनचे लोक पाकिस्तानच्या संसाधनांमधून पैसे कमवत आहेत. भारत हा पाकिस्तानचा शत्रू नाही. भारताकडून पाकिस्तानला कोणताही धोका नाही. उलट पाकिस्तानला खरा धोका चीनकडून आहे.

चीन त्याच्या देशातील मुसलमानांचा नाही, तर अन्य मुसलमानांचाही नाही !

रशीद म्हणाले की, देशात भारताविरुद्ध द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात असून त्यातून काय लाभ होणार आहे ? भारतासमवेतच्या आपल्या संबंधांचा आपल्याला लाभ होतो; पण आपल्याला चीनशी जवळीक साधायची आहे. चीनचा इतिहास असा आहे की, त्यांच्यावर विश्‍वास ठेवता येत नाही. तो ना स्वतःच्या देशातील मुसलमानांचा आहे, ना शेजारच्या कोणत्याही देशाचा.

संपादकीय भूमिका

  • पाकच्या नागरिकांना जसा संताप येतो, तसा पाकच्या शासनकर्त्यांना का येत नाही ? एरव्ही इस्लामवरून भारतावर टीका करणारे पाकचे राज्यकर्ते आता गप्प का आहेत ?
  • भारतातील मुसलमान चीनच्या या कृत्याविषयी गप्प का आहेत ? त्यांचे चीनशी असे कोणते सख्य आहे ?
  • चीन आर्थिक आणि सैनिकी बळामध्ये वरचढ असल्याने जगातील एकही इस्लामी देश त्याच्या दादागिरीविरुद्ध तोंड उघडत नाही; मात्र त्याच वेळी भारतातवर मुसलमानांच्या सुरक्षेवरून आरोप करतात !