ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या चंडीयागाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वर्ष २०२३ मधील ब्रह्मोत्सवानिमित्त चंडी होम १४ आणि १५.५.२०२३ हे २ दिवस करण्यात आला. त्या वेळी डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे

१. चंडीयागाच्या वेळी पुष्कळ आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे

‘सच्चिदानंद प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला चंडीयागाच्या वेळचे क्षण अनुभवायला मिळाले. १४.५.२०२३ या दिवशी याग चालू होण्यापूर्वीच माझ्यावर पुष्कळ आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत होते. संपूर्ण यागाच्या कालावधीतही माझ्यावर पुष्कळ उपाय होऊन मला हलकेपणा जाणवत होता. यागाच्या कालावधीत सर्वत्र शक्तीचे प्रक्षेपण होत होते.

२. यागाचे चलचित्र पहातांना ‘श्रीयंत्र आणि त्यावरील फुले प्रसरण पावत असून त्यांतून देवीची शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे

यागाचे चित्रीकरण ‘ऑनलाईन’ दाखवत असतांना श्रीयंत्राचे दर्शन झाले. त्या वेळी ‘त्यावरील फुले जिवंत आहेत’, असे मला वाटत होते. काही वेळ मला त्यांची हालचाल जाणवत होती. ‘श्रीयंत्र आणि त्यावरील फुले प्रसरण पावत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी असे वाटले, ‘श्रीयंत्राच्या माध्यमातून देवीची शक्ती प्रक्षेपित होत आहे.’

३. पहिल्या दिवशी याग संपल्यानंतर काही वेळाने मला अनावर गुंगी येत होती आणि नंतर मला थकवा आला.

४. दुसर्‍या दिवशी ‘याग स्वतःच्या देहामध्येच चालू आहे’ असा भाव ठेवल्यावर त्यामध्ये ‘स्वतःमधील अहंरूपी दैत्यांचा नाश होत आहे’, असे जाणवणे आणि संपूर्ण देहात विजेप्रमाणे शक्ती पसरणे

१५.५.२०२३ या दिवशी याग चालू असतांना मला ‘याग माझ्या देहामध्येच चालू आहे’, असा भाव गुरुदेवांच्या कृपेमुळे ठेवता आला. प्रत्येक अध्यायाच्या वेळी पुरोहित साधक ‘देवीने कोणत्या दैत्याचा वध केला ?’, ते सांगत होते. त्या वेळी मी ‘हे दैत्य, म्हणजे माझ्यामध्ये असलेले अहंचे एकेक पैलूच आहेत आणि त्या अहंरूपी दैत्यांचाच नाश देवीमाता करत आहे’, असा भाव ठेवला. त्या वेळी काही मिनिटे मला यागाशी संपूर्ण एकरूपता अनुभवता आली. त्या वेळी मला सभोवतालचे कशाचेच भान नव्हते. नंतर अकस्मात् संपूर्ण देहाला जसा विजेचा झटका (इलेक्ट्रिक शॉक) लागतो, तसे झाले आणि एकदम खाली पडल्यासारखे होऊन मी भानावर आले. त्या वेळी ‘माझ्या संपूर्ण देहात शक्ती पसरली आहे’, असे मला वाटले.

५. पूर्णाहुती चालू असतांना स्वतःच्या सर्वस्वाची आहुती देण्यासाठी गुरुदेवांना प्रार्थना होणे

यागाच्या शेवटी पूर्णाहुती चालू झाली. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘पूर्णाहुती, म्हणजे संपूर्ण समर्पण ! सर्वस्वाची आहुती !’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘आपणच संपूर्ण समर्पणाची अनुभूती द्या आणि माझ्या सर्वस्वाचे समर्पण करून घ्या. सर्व बंधने, माया आणि कर्तेपणा या सर्वांची आहुती यागात पडून या सर्वांतून मला मुक्त करा.’

६. देहामध्ये पोकळी जाणवणे आणि पोकळीच्या शेवटी प.पू. गुरुदेव दिसणे

नंतर काही वेळाने मला देहामधे पोकळी जाणवायला लागली. ‘माझ्या देहात दुसरे काहीच नसून, संपूर्ण देहात पोकळी आहे’, असे मला वाटू लागले. त्यानंतर ही पोकळी मोठी होऊ लागली आणि त्या पोकळीच्या शेवटी प.पू. गुरुदेव दिसले आणि ‘त्यांच्यामध्येच ती पोकळी संपली’, असे मला जाणवले. पुरोहित त्या वेळी मंत्रोच्चार करत होते. त्याचा नाद या पोकळीमधे ऐकू येत होता आणि काही वेळाने सर्व काही शांत झाले. (स्थुलातून त्या वेळी मंत्रोच्चार चालू होते; पण आतून शांती जाणवत होती.)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याच कृपेने मला हे अनुभवता आले, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– डॉ. (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (१५.५.२०२३)

 येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक