सनातनच्या साधकांचे सुयश !

पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !

पुणे, २७ मे (वार्ता.) – येथील ६१ टक्‍के आध्यात्मिक पातळीची सनातनची साधिका कु. प्राजक्ता प्रवीण नाईक हिला इयत्ता १० वीच्‍या परीक्षेत १०० टक्‍के गुण मिळाले आहेत. १०० टक्‍के गुण मिळवून तिने माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे या शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्‍त केला आहे. कु. प्राजक्ता ही येथील सनातनचे साधक श्री. प्रवीण नाईक यांची मुलगी आहे. संस्‍कृत विषयात तिला १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहेत.

कु. प्राजक्ता नाईक

कु. प्राजक्ता हिने सांगितले की, मी वर्षभर नियोजन करून सातत्याने अभ्यास केला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे अभ्यास एकाग्रतेने आणि मनापासून करता आला. अभ्यासाला बसण्याआधी आणि अभ्यास झाल्यानंतर प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करणे, दोषांच्या निर्मूलनासाठी स्वयंसूचना घेणे हे प्रयत्न वर्षभर केले गेले. ताण घेणे, भीती वाटणे या स्वभावदोषांवर मात करून सहजतेने आणि आनंदाने दहावीची परीक्षा देता आली. एरव्ही प्रत्येक परीक्षेचा ताण येऊन त्याचा परीक्षेवर परिणाम होत असे; परंतु या वेळी तसे झाले नाही. हे यश गुरुमाऊलींच्याच कृपेमुळे मिळाले आहे.

सासवड (पुणे) येथील कु. स्वरोम आगवणे याला दहावीत ८८.२० टक्‍के गुण !

कु. स्वरोम आगवणे

सासवड (जिल्हा पुणे) – येथील सनातनचा साधक कु. स्वरोम दीपक आगवणे याने इयत्ता दहावीच्‍या परीक्षेत ८८.२० टक्‍के गुण प्राप्‍त केले आहेत. त्याचा गुरुमाऊलींप्रती पुष्कळ भाव‌ आहे. तो त्याच्या मित्रांना साधनेविषयी सांगतो. साधक आणि धर्मप्रेमी यांना साहित्य पोचवणे, सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, भित्तीपत्रके लावणे, हस्तपत्रके वाटप करणे, ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गात सेवा करणे या सेवा तो तळमळीने करतो. ‘हे यश मिळवणे गुरुदेवांच्‍या (सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या) कृपेमुळे हे शक्‍य झाले, तसेच मोठा होऊन ईश्वरी राज्याचे कार्य करायचे आहे’, असे त्याने सांगितले.

पुणे येथील कु. पार्थ मुकेश देशपांडे याला दहावीत ८२.८० टक्‍के गुण !

कु. पार्थ देशपांडे

पुणे – येथील सनातनचा साधक कु.पार्थ मुकेश देशपांडे याने इयत्ता दहावीच्‍या परीक्षेत ८२.८० टक्‍के गुण प्राप्‍त केले आहेत. कु. पार्थ हा कोथरूड येथील सनातनच्या  साधिका गीता देशपांडे यांचा मुलगा आहे. माधव सदाशिव गोळवलकर या शाळेचा तो विद्यार्थी आहे. परीक्षा चालू असतांना त्याला कधीच ताण आला नाही. ‘हे गुण गुरुकृपेने मिळाले’, असा त्याचा भाव आहे.

कर्णावती (अहमदाबाद) येथील कु. लक्ष्मी शैलेंद्र धारप हिने इयत्ता दहावीत मिळवले ८८.२६ टक्के गुण !

कु. लक्ष्मी धारप

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. कृष्णकुमार जामदार आणि सौ. संध्या कृष्णकुमार जामदार यांची नात (मुलीची मुलगी) कु. लक्ष्मी शैलेंद्र धारप हिने गुजरात माध्यमिक आणि उच्चतर माध्यमिक शिक्षण बोर्ड, गांधीनगर, गुजरात येथून दिलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८८.२६ टक्के गुण प्राप्त केले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक