थोर शिवभक्त कश्यपऋषि ।

वैशाख कृष्ण पंचमी (२८.५.२०२४) या दिवशी कश्यपऋषींची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी ही काव्यपुष्पांजली समर्पित करत आहोत.

कश्यपऋषी

कश्यपऋषींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

गोत्रप्रवर्तक (टीप १) महान ऋषि,
सप्तर्षींपैकी (टीप २) एक ऋषि ।। १ ।।

सुश्री (कु.) मधुरा भोसले

कश्यपऋषि होते थोर शिवभक्त,
त्यांची वृत्ती होती अनासक्त ।। २ ।।

ते मोहमायेपासून होते विरक्त,
संसारी राहून होते जीवनमुक्त ।। ३ ।।

कश्यपऋषींची होती ख्याती,
ते होते दिती अन् अदिती यांचे पती ।। ४ ।।

कश्यप अन् अदिती होते चारित्र्यसंपन्न,
देवताही करती त्यांना वंदन ।। ५ ।।

कश्यप अन् अदिती यांचे शुद्ध आचरण,
अखंड करत होते प्रभूंचे स्मरण ।। ६ ।।

उभयतांचे भक्तीमय झाले मन,
भगवंत झाले तयांवर प्रसन्न ।। ७ ।।

अदितीचा भाव उत्कट,
तिच्या पोटी आला महोत्कट (टीप ३) ।। ८ ।।

नारायण वसे अदितीच्या मनी,
म्हणूनी ती झाली अवतारांची (टीप ४) जननी ।। ९ ।।

श्रीविष्णूने केला उभयतांचा स्वीकार,
त्यांच्या पोटी झाला वामन अवतार (टीप ५) ।। १० ।।

अदितीचे पुत्र होते बारा आदित्य (टीप ६),
दितीचे पुत्र होते सारे दैत्य ।। ११ ।।

अदितीपासून निर्मिले सूरगण,
दितीपासून निपजले असुरगण ।। १२ ।।

दनूपासून (टीप ७) झाले दानव,
त्यामुळे भयग्रस्त झाला मानव ।। १३ ।।

कद्रूपासून (टीप ८) झाली नवनागांची (टीप ९) निर्मिती,
विनतेपासून (टीप १०) झाली गरुडाची उत्पत्ती ।। १४ ।।

कश्यप होते मरुद्गणांचे (टीप ११) पिता,
ते होते आयुर्वेदाचे ज्ञाता ।। १५ ।।

परशुरामाने अश्वमेध यज्ञ केला,
कश्यपांना अध्वर्यूचा (टीप १२) मानदिला ।। १६ ।।

परशुरामाने कश्यपांना पृथ्वीचे दान दिले,
आणि क्षत्रियांच्या वधाचे प्रायश्चित्तघेतले ।। १७ ।।

कश्यपांनी केले काश्मीरचे नंदनवन,
कश्यपक्षेत्र (टीप १३) झाले पावन ।। १८ ।।

कश्यपांनी केली निस्सीम शिवभक्ती,
काय वर्णावी त्यांची महती ।। १९ ।।

टीप १ – गोत्रप्रवर्तक : गोत्रांची निर्मिती ज्यांच्यापासून झाली, ते ऋषी

टीप २ – सप्तर्षी : कश्यप, गौतम, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, जमदग्नी आणि वसिष्ठ. (विविध मतांनुसार सप्तर्षींच्या नावांमध्ये भिन्नता आहे.)

टीप ३ – महोत्कट : गणपतीने सत्ययुगात महोत्कटाच्या रूपाने पहिला अवतार घेतला.

टीप ४ – श्रीविष्णूचे दशावतार : मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि.

टीप ५ – वामन अवतार : सत्ययुगातील श्रीविष्णूचा पाचवा अवतार.

टीप ६ – बारा आदित्य : धाता, मित्र, अर्यमा, शुक्र, वरुण, अंशु, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णु. (संदर्भ : भक्तीकोष)

टीप ७ – दनू : कश्यपऋषींची पत्नी

टीप ८ – कद्रू : कश्यपऋषींची पत्नी

टीप ९ – नवनाग : अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक, कालिया. (संदर्भ : भक्तीकोष)

टीप १० – विनता : कश्यपऋषींची पत्नी

टीप ११ – मरुद्गण : ४९ (वायूंचे प्रकार)

टीप १२ – अध्वर्यू : प्रमुख

टीप १३ – कश्यपक्षेत्र : ज्या क्षेत्रात कश्यपऋषींचे वास्तव्य होते, त्याला कश्यपक्षेत्र म्हणतात. हे क्षेत्र म्हणजे सध्याचे काश्मीर आहे. काश्मीर हे नाव कश्यपऋषींवरून आले आहे.

प्रार्थना आणि कृतज्ञता

सृष्टीच्या निर्मितीमध्ये ब्रह्मदेवाला साहाय्य करणारे कश्यपऋषि आणि त्यांच्या पत्नी यांच्या चरणी कोटी कोटी नमन ! ‘त्यांच्याप्रमाणे आम्हा साधकांमध्येही समष्टी भाव निर्माण होऊन आमच्याकडून श्री गुरुदेवांना अपेक्षित अशी समष्टी साधना होवो’, अशी कश्यपऋषींच्या चरणी समर्पित भावाने प्रार्थना आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे,), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक