सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विद्यार्थीदशेतील कार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी शालेय शिक्षण मुंबईतील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत, तर नंतरचे शिक्षण मुंबईतील विल्सन महाविद्यालयात आणि वैद्यकीय शिक्षण ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये घेतले. शालेय जीवनापासून ते वैद्यकीय पदवी (एम्.बी.बी.एस्.) प्राप्त करून इंग्लंडमध्ये जाईपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध संस्थांमध्ये दायित्व घेऊन कार्य केले. या कार्याची संक्षिप्त सूची येथे दिली आहे. या कार्याच्या अनुभवांचा त्यांना भविष्यात लाभ झाला.

डॉ. जयंत आठवले (वय १८ वर्षे )

१. विद्यार्थीदशेत विविध संस्थांमध्ये सांभाळलेल्या कार्यभाराची संक्षिप्त सूची

२. विद्यार्थीदशेत केलेल्या कार्याचा पुढील आयुष्यात झालेला लाभ

परात्पर गुरु डॉक्टरांनी विद्यार्थीदशेत विविध संघटनांमध्ये केलेल्या कार्याच्या अनुभवांचा त्यांना भविष्यातील अध्यात्मप्रसाराच्या कार्याचे दायित्व सांभाळणे; आध्यात्मिक ग्रंथांचे संकलन करणे; ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संपादन करणे, तसेच हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांचे संघटन करणे, या कार्यासाठी लाभ झाला.


परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेले निबंध

श्रीमन्ननारायणाचा अंश असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ते विद्यार्थीदशेत असतांना लिहिलेले निबंध हे ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, या वचनाप्रमाणे त्यांच्यातील देवत्वाची प्रचीती देणारे आहेत. त्यांच्या लिखाणातील प्रगल्भता, शब्दांची निवड, विषयाचा अभ्यास, अलंकारीक शब्दप्रयोग आणि कालातीतता या गोष्टी यातून ध्यानात येते.

कु. जयंत आठवले (वय १४ वर्षे १९५६)

विपत्ती दे ती हि हवी विकासा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ताक्षरातील निबंध

दि. २.८.५७
जयंत आठवले

‘असार अशा या लोकांत, असार वस्तूंतूनच ‘असारात् सारमाहरेत् ।’

म्हणजे ‘सार नसलेल्या गोष्टींमधून काहीतरी सार घ्यावे’ या न्यायाने सार काढणे, हेच खरे कलात्मक जीवन आहे. त्याच पद्धतीने विपत्ती ही तर कसली असारच नव्हे, तर अनिष्ट आहे. ‘याही गोष्टीचा उन्नतीसाठी कसा उपयोग करावा ? कशा दृष्टीने संकटांकडे पहावे ?’, हे सांगण्यासाठी विपत्तीची अशी मागणी थोर लोक करतांना दिसतात.

आपण ‘निसर्गात रात्रीच्या काळोखातूनच उषःकालाच्या प्रभेची निर्मिती होते’, हे प्रतिदिन (दररोज) पहातोच; पण त्याच्याकडे जरी ‘अतिपरिचयात् अवज्ञा ।’ म्हणजे ‘अतिपरिचयाने अवज्ञा, अर्थात् महत्त्व अल्प होते’ या न्यायाने दुर्लक्ष केले, तरी व्यवहारातील उदाहरणे, दगडाचा देव बनवतांना त्याला सहन कराव्या लागणार्‍या यातना आपणांस हेच दर्शवीत आहेत की, विकासाची इमारत संकटांच्या पायावरच उभी आहे आणि मानवी स्वभावच असा आहे की, त्याच्या हृदयात न आवडणार्‍या गोष्टींविरुद्ध प्रतिक्रियेची एक जबरदस्त भावना विद्यमान असते.

विपत्तींचे उगमस्थान जे पोट, ते नसतेच तर भुकेची विपत्ती आपल्या पाठीस लागली नसती. मग अर्थातच् काही विशेष कार्यच न राहिल्याने आपण आळशी बनलो असतो आणि ‘विकास म्हणजे काय ?’, याची कल्पनासुद्धा आपल्याला शिवली नसती. म्हणजेच विपत्तींमुळेच, मग ती कोणत्याही प्रकारची असो, आपला उत्कर्ष होतो. कुन्तीने सुद्धा परमेश्वराजवळ  ‘विपदः सन्तु नः शश्वत् ।’ (श्रीमद्भागवत, स्कन्ध १, अध्याय ८, श्लोक २५) म्हणजे ‘जीवनात पावलापावलागणिक आमच्यावर संकटे येत राहोत’, अशीच प्रार्थना केली होती. का ?, तर मानवाचा स्वाभिमान, शौर्य, तेज, बुद्धी, भक्तीभाव इत्यादी सर्व गोष्टी विपत्तीबरोबर उफाळून येऊन मानवाचा, म्हणजेच पर्यायाने राष्ट्राचा विकास होतो. तेजस्वी रत्न इच्छिणार्‍यास, विकासाची हाव बाळगणार्‍यास महाभयंकर विषारी सर्पाबरोबर दोन हात केल्याशिवाय, विपत्तींतून गेल्याशिवाय ते साध्य होत नाही. तसेच सन्मित्राची पारख करण्याचा तो एक निकषच आहे.

परिस्थितीची यथार्थ जाणीव करून देऊन आपल्या सुप्त शक्तींना धार चढवून पुढे पाऊल टाकावयास लावणार्‍या, विकास करायवयास लावणार्‍या, विपत्तींकडे पाहून एक हिंदी कवि म्हणतात,

‘विपत्ती ही के रूपमें, विकासका ही बीज रे ।
बिना विपत्ती विकास ही, हो सकता ही कैसा है ?’

अर्थ : संकट (प्रतिकूलता) ही विकासाच्या बीजाची भूमिका बजावते. संघर्ष किंवा अडचणींशिवाय कोणतीही प्रगती किंवा उदय शक्य नाही.

आणि म्हणूनच ‘विपत्ती दे ती हि हवी विकासा ।’ अशी साने गुरुजींनी परमेश्वराकडे खरोखर किती योग्य मागणी केली आहे !’


ग्रामोद्धार

दि. १२.७.५७
जयंत आठवले

१. सर्व खेडी स्वयंपूर्ण म्हणून भारतोत्कर्ष !

‘इतिहासात भारतवर्ष जो गौरवाच्या शिखरावर आरूढ होता, तो प्रामुख्याने त्यातील गावांच्या उत्कर्षानेच. पूर्वी वाहतुकीची साधने विशेष नसल्याने मालाची वाहतूक करणे दुरापास्त होते. त्यामुळे एका गावांहून दुसर्‍या गावांस माल निर्यात-आयात करण्याची पद्धतच नव्हती. प्रत्येक गावांस स्वतःची गरज स्वतःच पूर्ण करावी लागे; म्हणून गावांत सुतार, लोहार, चांभार, सोनार, शेतकरी, वैदिक ब्राह्मण, महार इत्यादी सर्व वर्गांचे, जातींचे अन् धंद्यांचे लोक एकत्र रहात असत. अशा रितीने प्रत्येक गाव स्वयंपूर्ण बनले होते आणि अशा रितीने स्वयंपूर्ण बनलेल्या गावांनीच भारतोत्कर्ष झाला होता.

२. यांत्रिक युगाने शेती इत्यादी धंदे खुंटणे

परंतु पुढे ‘यांत्रिक युग’ आले. यंत्राने बनविलेल्या स्वस्त अन् तलम मालापुढे हाती (हाताने बनवलेला) माल मागे पडू लागला. कारागिरांवर उपासमारीची पाळी आल्याने ते तो धंदा सोडून देऊ लागले आणि वंशपरंपरेने अंगात आलेली कला त्यांना सोडून देणे भाग पडले. मोठमोठी औद्योगिक शहरे वसली. व्यापार, कारखाने आणि उद्योगधंदे यांमुळे लोक शहरांकडे आकर्षित होऊ लागले. त्यामुळे शहरांची आणि त्याचप्रमाणे शहरवासियांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. पुष्कळसे लोक शेतीसारखा अत्यंत आवश्यक असा धंदा सोडून शहरांकडे वळले.

३. पुन्हा उन्नती

ब्रिटीशांनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले; पण इ.स. १९४७ साली स्वराज्य मिळाले. हिंदीतील एक कवि श्री शिवनारायणदास यांनी म्हटले,

‘अगर हम चाहते भारत, सदा ही के लिए गुजत (टीप)  ।
कैसे हासील करेंगे वैभव, बिना इस ग्रामसेवासे ?’

टीप – गुजत, म्हणजे सतत चालू रहाणे म्हणजे आपल्याला भारताचा विकास, भारताची प्रगती सतत होत राहावी, असे वाटत असेल, तर ती प्रगती ग्रामसेवेशिवाय कशी शक्य आहे ?, असे कवीला म्हणायचे आहे.

हे वचन सरकारला पटून सरकारने लगेच या गंभीर प्रश्नाचा विचार करावयास सुरुवात केली. गावात काम नाही आणि शेतीवर भागत नाही, म्हणून ‘चला शहराकडे’ अशी अवस्था नाहीशी करण्यासाठी लोकांना काही उद्योग-धंदे देणे आवश्यक होते; म्हणून सरकारने गावच्या परिस्थितीनुसार तेथे कोणता ग्रामोद्योग करता येईल ?, हे पाहण्यासाठी नवीन खाते उघडले. त्यानुसार प्रत्येक शेतकर्‍यास भाग घेता येईल, असे १० – १५ रुपयांचा शेअर (भाग) असलेले अल्पभांडवली धंदे ‘सहकारी’ पद्धतीवर सुरु करण्यात आले आहेत. २ – ४ सहकारी संस्थांच्या मिळून सोसायट्या बनल्या आणि त्यांच्यामार्फतच (त्यांद्वारेच) दलालाशिवाय ग्रामोद्योगात तयार झालेला माल विकला जाऊ लागला. त्यामुळे तो ग्राहकांस स्वस्त पडून कारागिरांसही अधिक मजुरी मिळू लागली. लोकांसही काम मिळाले. मालाची वाहतुक त्वरित व्हावी, यासाठी रस्त्यांची बांधणीसुद्धा करण्यास सुरुवात झाली आहे.

४. मोफत शिक्षण हवे आणि दुष्ट रुढी नष्ट केल्या पाहिजेत

नुसत्या ग्रामोद्योगांनी ग्रामोत्कर्षाच्या आड येणार्‍या आपत्ती टाळता येत नाहीत. त्यासाठी प्रत्येक गावांत पंचायतीची स्थापना करून तिच्या मार्फत सर्व कारभार चालविला पाहिजे. सर्व आपत्तींचे मूळ जे अज्ञान ते घालविण्यासाठी सक्तीचे, मोफत प्राथमिक शिक्षण, तसेच प्रौढ शिक्षण देण्यासाठी गावागावांतून शाळा उभारल्या पाहिजेत. गावांत ग्रंथालये (लायब्ररी), रेडिओ सेट ठेवला पाहिजे. आपल्याकडे ‘पडदा-पद्धति’ वगैरे आरोग्यास अत्यंत विघातक अशा पद्धती आहेत, त्या दूर करण्यासाठी अाणि लोकांस आरोग्यकारक सवयी लागण्यासाठी, त्याचप्रमाणे आरोग्य न बिघडविणार्‍या विहीरी, घरे, संडास इत्यादी (वगैरे) कसे बांधावे ?, यांसंबंधी माहिती देण्यासाठी जीवन सुखावह करणारे आरोग्यशास्त्र शिकविले पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक गावांत दवाखाना आणि हॉस्पिटल असणेही आवश्यक आहे. वृद्ध-विवाह, अस्पृश्यता वगैरे चालीरीती किती त्याज्य आहेत, हेही लोकांच्या मनावर बिंबवले पाहिजे.

५. शेतीची साधने, पाणी, बी मुबलक (विपुल प्रमाणात) हवे

आपला भारत शेतीप्रधान देश असल्याने शेतीसाठी पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पाटबंधारे बांधले पाहिजेत. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांस ‘उत्कृष्ट बी-बियाणे, खते कोणती ?’, यांचे ज्ञान करून दिले पाहिजे. ‘सहकारी पद्धतीवर शेती केल्याने आणि ‘जपानी’ पद्धतीने भातशेती केल्याने काय फायदा होतो ?’, हे त्यांना पटवून दिले पाहिजे. शेतकर्‍याची संपत्ती ही गाई-बैल यांच्या उत्कृष्ट निपजीसाठी, तसेच वाढीसाठी गावकुरण गावांत ठेवले पाहिजे.

बाहेरच्या जगाशी सतत संबंध रहावा, यासाठी पोस्टखाते, टेलिफोन, रेल्वे इत्यादी सोयी केल्या पाहिजेत, तसेच सर्वत्र विजेचा पुरवठा केला पाहिजे.

वर लिहिलेल्या गोष्टींनी परिपूर्ण असलेल्या गावाचा लवकरच उत्कर्ष होईल आणि ग्रामोत्कर्षानेच भारतोत्कर्ष होईल. मी आशा करतो की, तो सुदिन लवकरच येईल की, ज्या दिवशी ग्रामोत्कर्ष, म्हणजे भारतोत्कर्ष झालेला असेल !’