तीर्थक्षेत्र हामुगड (जिल्हा बेळगाव) येथे २६ आणि २७ मे या दिवशी गोर बंजारा महासंमेलन !

बेळगाव (कर्नाटक) – गोर बंजारांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र हामुगड (अथनी, जिल्हा बेळगाव) येथे २६ आणि २७ मे या दिवशी गोर बंजारा महासंमेलन भरणार आहे. या महासंमेलनात बंजारा समाजाचे धर्मगुरु, संत-महंत-पुजारी, मंदिर संस्थान प्रमुख, साहित्यिक, लेखक, लोककलाकार, भाविक सहभागी होणार आहेत. या वेळी गोर बंजारा समाजाला नवी दिशा देण्याकरिता भव्य साहित्य आणि धर्म परिषदही होणार आहे. दोन दिवस श्री श्री हामुलाल महाराज दर्शन आणि महाप्रसाद असणार आहे. तरी या संमेलनासाठी सर्व समाजबांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘श्री तीर्थक्षेत्र हामुलाल महाराज मंदिर संस्थान’च्या वतीने करण्यात येत आहे.

धर्म परिषदेत धर्मगुरु गोर बंजारा धर्मपिठाधीश्वर बाबुसिंह महाराज, हामुगड गादीश्वर राजमाता रत्नायाडी, धर्मगुरु जितेंद्र महाराज, धर्मगुरु कबीरदास महाराज, धर्मगुरु यशवंत महाराज, धर्मगुरु जगनू महाराज, महंत लक्ष्मण महाराज यांसह अनेक साधू-संत उपस्थित रहाणार आहेत. या महोत्सवात भगवंत सेवक किसनभाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री श्री हामुलाल महाराज मंदिर गाभार्‍याचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून ३०० किलोहून अधिक चांदी, २ किलोहून अधिक सोने यांचे नक्षीकाम, सोने-चांदी-हिरे-माणिक यांनी मढवलेला भगवान श्री हामुलाल महाराजांचा फेटा राजमाता प.पू. रत्नायाडी यांच्या पूज्य हस्ते अर्पण करण्यात येणार आहे.

या २ दिवसीय महासंमेलनात राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विलासभाऊ राठोड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत.