पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन : १०० जणांचा मृत्यू

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता !

पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी) – प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलिया देशाच्या जवळ बेटांचा देश असणार्‍या पापुआ न्यू गिनी येथील काओकलाम गावात झालेल्या भूस्खलनामध्ये १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून अनुमाने ६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांताच्या गावात स्थानिक वेळेनुसार पहाटे ३ वाजता ही घटना घडली. या घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. घटना घडली तेव्हा संपूर्ण गाव झोपले होते. त्यामुळे अनेक लोक भूमीखाली गाडले गेले आहेत. भूस्खलनामुळे काओकलाम गावातून शहराकडे जाणारा रस्ताही बंद झाला आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय संस्थांना साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.

भूस्खलनाच्या आदल्या दिवशी, म्हणजे २३ मे या दिवशी पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. याची तीव्रता रिक्टर स्केलवर ५.३ इतकी नोंदवली गेली.