‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या छायाचित्रांमध्ये तेजोवलय असावे’, असे साधकांना वाटणे आणि २ वर्षांनंतर त्यांच्या छायाचित्रात तेजोवलय येणे

१. ‘देवतांच्या चित्रांप्रमाणे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या छायाचित्रामध्येही तेजोवलय असावे’, असे साधकांना वाटणे

श्री. भूपेन पांचाळ

‘देवतांच्या छायाचित्रामध्ये जसे तेजोवलय असते, त्याप्रमाणे आपले गुरुवर्य प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या छायाचित्रामधेही तेजोवलय असावे’, असे मला आणि माझे यजमान श्री. भूपेन पांचाळ (वय ७८ वर्षे) यांना नेहमी वाटत असे. याविषयी आम्ही प.पू. दादाजींना सांगितल्यावर त्यांनी केवळ स्मितहास्य केले. वर्ष १९८४ मध्ये प.पू. दादाजी उग्र साधना करण्यासाठी दक्षिण भारतातील एका तीर्थक्षेत्री गेले होते. तेथून परत आल्यानंतर प.पू. दादाजींनी आम्हाला त्यांचे त्या ठिकाणी साधना करत असतांनाचे छायाचित्र दाखवले. आम्ही प.पू. दादाजींना म्हणालो, ‘‘दादाजी, यात नक्कीच तेजोवलय असणार !’’ तेव्हा ते नेहमीप्रमाणे हसले. आम्ही ते छायाचित्र पाहिले. त्यामध्ये तेजोवलय नव्हते.

२. प.पू. दादाजींनी स्वतःची २ छायाचित्रे साधकांना देऊन ती पाकिटात बंद करून प्रतिदिन त्यावर हात ठेवून मंत्र म्हणण्यास सांगणे

सौ. विजया भूपेन पांचाळ

प.पू. दादाजींनी आम्हाला त्यांची २ छायाचित्रे दिली आणि म्हणाले, ‘‘एक पाकीट घ्या आणि या २ छायाचित्रांतील चेहरे एकमेकांसमोर येतील, अशा पद्धतीने पाकिटामध्ये ठेवा. पाकिटावर छायाचित्रामधील चेहरा ज्या ठिकाणी येईल, त्या ठिकाणी एक वर्तुळ काढा. तुम्ही प्रतिदिन सकाळी कार्यालयात जाण्यापूर्वी वर्तुळावर हात फिरवून मी सांगतो, तो मंत्र अर्धा ते पाऊण घंटा म्हणा. मी सांगेन तेव्हाच हे पाकीट उघडायचे.’’ प.पू. दादाजींनी सांगितल्यानुसार आम्ही त्या पाकिटावर हात फिरवत नियमित मंत्र म्हणत होतो.

३. प.पू. दादाजींनी स्वतःच्या छायाचित्राच्या १० प्रती पाकिटात ठेवून साधकांना मंत्रजप करण्यास सांगणे, प.पू. दादाजींनी देवतांना आवाहन करणे आणि पाकिटातील १० छायाचित्रांमध्ये तेजोवलय दिसणे

प.पू. दादाजींनी काही मासांनंतर श्री. भूपेन यांना स्वतःचे एक छायाचित्र दिले आणि त्याच्या १० प्रती काढून आणायला सांगितल्या. त्यानंतर प.पू. दादाजींनी अक्षय्य तृतीया शके १९०८, १२.५.१९८६ या दिवशी ८ ते १० साधकांना ठाणे येथील ‘सुयश’ या वास्तूत मंत्रजप करण्यासाठी बोलावले. प.पू. दादाजींच्या छायाचित्राच्या १० प्रती पाकिटात घालून देवतांच्या चित्रांसमोर ठेवण्यात आल्या. साधकांनी त्यापुढे बसून दुपारी १ वाजता मंत्रजप करायला आरंभ केला. अनुमाने २ घंटे मंत्रजप झाल्यानंतर प.पू. दादाजी मंत्रजपाच्या ठिकाणी येऊन बसले आणि त्यांनी जोरजोरात घंटानाद करण्यास आरंभ केला. (ते देवतांना आवाहन करण्यासाठी घंटानाद करत असत.) थोड्या वेळाने प.पू. दादाजींनी देवतांच्या चित्रासमोर ठेवलेली पाकिटे उघडायला सांगितली. प.पू. दादाजींची छायाचित्रे पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे विस्फारले गेले.

प.पू. दादाजींच्या त्या सर्व छायाचित्रांमध्ये डोक्याभोवती तेजोवलय आले होते. प.पू. दादाजींनी उपस्थित साधकांना त्या छायाचित्राची प्रत्येकी एक प्रत दिली.

४. दोन वर्षांपूर्वी साधकांना पाकिटांमध्ये ठेवायला दिलेल्या प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या छायाचित्रांमध्येही तेजोवलय येणे

त्यानंतर प.पू. दादाजी आम्हा उभयतांना म्हणाले, ‘‘तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्याकडे ठेवायला दिलेले छायाचित्रे ठेवलेले पाकीट उघडून पहा.’’ आम्ही घरी गेल्यानंतर पाय धुवून लगेच देवघरात गेलो आणि पाकीट उघडून पाहिले, तर प.पू. दादाजींनी आम्हाला २ वर्षांपूर्वी दिलेल्या छायाचित्रांमध्येही तेजोवलय आले होते. आमच्या दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.’

– सौ. विजया पांचाळ (वय ७४ वर्षे), बोरिवली, मुंबई. (११.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक