योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी ‘नागसिद्धी’द्वारे नागयोनीतील अनेक पुण्यात्म्यांकडून दैवी कार्य करून घेणे

१. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन प्रत्येक शनिवारी ठाणे येथील ‘सुयश’ नावाच्या वास्तूत येऊन लोकांना भेटत असणे आणि त्यांना अडचणींवर उपाययोजना सांगत असणे

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन प्रत्येक शनिवारी ठाणे येथील ‘सुयश’ नावाच्या वास्तूत येत असत. त्या ठिकाणी अनेक जण त्यांच्या अडचणी योगतज्ञ दादाजींना सांगत असत. प.पू. दादाजी दुपारी २ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत त्यांच्याकडे येणार्‍या लोकांना भेटत असत. माझ्या कार्यालयाला शनिवार आणि रविवार सुटी असल्याने मी या दिवशी सकाळी ९ वाजता ‘सुयश’मध्ये जात असे. मी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत तेथे उपासना आणि तेथील काही सेवा करत असे.

सौ. विजया भूपेन पांचाळ

२. योगतज्ञ दादाजींना ‘नागसिद्धी’ प्राप्त असणे आणि ‘पद्मनाभजी’ नागराज ‘सुयश’ या वास्तूत येणे 

योगतज्ञ दादाजींना प्राप्त असलेल्या अष्टसिद्धींपैकी ‘नागसिद्धी’ ही एक सिद्धी होती. योगतज्ञ दादाजींकडे नागयोनीतील अनेक पुण्यात्म्ये येत असत. योगतज्ञ दादाजी नागयोनीतील पुण्यात्म्यांकडूनही दैवी कार्य करून घेत असत. वर्ष १९८४ च्या सुमारास प.पू. दादाजींकडे आलेल्या नागराजांचे नाव ‘पद्मनाभजी’ असे होते. त्यांचे वास्तव्य ७ – ८ दिवस ‘सुयश’ या वास्तूत होते.

३. योगतज्ञ दादाजींनी सांगितल्यानुसार साधिकेने नागराजासमोर बसून नामजप करणे; पण काही वेळाने तिला सुटकेसमध्ये नागराज न दिसणे 

एकदा मी ‘सुयश’ येथे असतांना योगतज्ञ दादाजी मला म्हणाले, ‘‘मी १ – २ घंटे बाहेर जाऊन येतो. तुम्ही या नागराजांसमोर (‘पद्मनाभजी’समोर) बसून नामजप करा.’’ तेथे एका उघड्या सुटकेसमध्ये नागराज बसले होते. मी त्या नागराजांच्या समोर बसून योगतज्ञ दादाजींनी सांगितल्याप्रमाणे डोळे मिटून नामजप करत होते. योगतज्ञ दादाजी बाहेरून आल्यानंतर मला म्हणाले, ‘‘जप चालू आहे ना ? डोळे उघडून पहा.’’ मी डोळे उघडून पाहिले, तर सुटकेसमध्ये नागराज नव्हते.

४. ‘नागराजांना मोकळ्या जागेत रहायचे होते; म्हणून ते लहान रूप धारण करून सुटकेसमधून बाहेर आले’, असे योगतज्ञ दादाजींनी सांगणे

मी योगतज्ञ दादाजींना विचारले, ‘‘नागराज बाहेर गेले का ?’’ त्यावर योगतज्ञ दादाजी म्हणाले, ‘‘नाही. येथेच आहेत. शोधा.’’ मी स्वयंपाकघर आणि बैठककक्ष या ठिकाणी पाहिले, तर मला ते कुठेच दिसले नाहीत. मधल्या लहान मार्गिकेत एक कपाट होते. मला त्याच्याखाली काहीतरी हालतांना दिसले. मी योगतज्ञ दादाजींना म्हणाले, ‘‘येथे लहानसे काहीतरी आहे.’’ तेव्हा प.पू. दादाजी हसले. त्यांनी कपाटाखाली हात घालून नागराजांना बाहेर काढले. त्यांचा आकार जेमतेम १ फूट होता. तेव्हा योगतज्ञ दादाजी म्हणाले, ‘‘नागराजांना मोकळ्या ठिकाणी रहायचे होते, म्हणून ते लहान आकार धारण करून सुटकेसमधून बाहेर आले.’’ योगतज्ञ दादाजींनी त्यांना परत सुटकेसमध्ये ठेवले. तेव्हा त्यांनी मला डोळे बंद करायला सांगितले. त्यांनी मला २ मिनिटांनी डोळे उघडायला सांगितले. मी डोळे उघडून पाहिले, तर नागराजांचा आकार पुन्हा पूर्वीप्रमाणे ७ – ८ फुटांचा झाला होता. माझे परम भाग्य म्हणूनच मी हे पाहू शकले.’

– सौ. विजया भूपेन पांचाळ (वय ७४ वर्षे), बोरिवली, मुंबई. (२०.४.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक