परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवात सहभागी झाल्यावर सौ. अदिती अनिल सामंत यांना आलेल्या अनुभूती

सौ. आदिती सामंत

१.  रथोत्सवाच्या वेळी निघालेल्या दिंडीत ‘श्रीमन्नारायण नारायण, हरि हरि’ हे भजन म्हणतांना ‘श्रीराम आले आहेत’, असे वाटून चैतन्य जाणवणे आणि प्रत्यक्षात त्या वेळी परात्पर गुरुदेव रथारूढ असल्याचे ठाऊक नसणे : ‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला. सर्वत्र मंगलमय वातावरण होते. रथोत्सव चालू झाल्यावर शंखनाद झाला आणि माझ्यावर आलेले आवरण निघून गेले. त्यानंतर प्रार्थना झाल्यावर मला उत्साह जाणवला. मी दिंडीत ध्वजपथकात सहभागी झाले होते. आमची दिंडी जेव्हा नागेशीच्या मार्गावरील पुलावर पोचली, तेव्हा ‘पुष्कळ चैतन्य’ जाणवत होते. पुष्कळ वेळा ‘श्रीमन्नारायण नारायण, हरि हरि’ हे भजन म्हणतांना ‘श्रीराम आले आहेत’, असे वाटून मला चैतन्य जाणवत होते. आम्ही रथाच्या पुढे चालत होतो. तेव्हा मला ‘आमच्या मागे प्रत्यक्षात परात्पर गुरु डॉ. आठवले रथारूढ आहेत’, हे ठाऊक नव्हते. रथ जेव्हा नागेशीला आला, तेव्हा मला ‘रथामध्ये परात्पर गुरुदेव आहेत’, हे कळले आणि अतिशय आनंद झाला.

२. रथोत्सवादरम्यान निसर्गात झालेला पालट : रथोत्सवाच्या वेळी सर्वत्र वारा सुटला होता. मार्गाच्या कडेला लावलेले भगवे झेंडे फडफडत होते. सर्वत्र पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘आजूबाजूचा परिसर या काळातील नाही’, असे वाटत होते. सर्वत्र सोनेरी किरण दिसत होते. ‘झाडे, पाने आणि वारा आनंदाने गात डोलत आहेत’, असे जाणवत होते. रथ थांबताक्षणी पक्ष्यांचा थवा आकाशात आनंदाने फिरतांना दिसला. जणूकाही त्यांनाही देव आल्याचे कळले होते. इतर दिवशी पक्ष्यांचा थवा आकाशात फिरतांना असा कधीच दिसला नाही.

३. गुरुदेवांच्या ठिकाणी सोनेरी किरण, पुष्कळ तेज आणि पांढरा प्रकाश दिसणे : मी गुरुदेवांना रथात पाहिले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. प्रत्यक्षात रथात बसून माझे गुरुदेव सोनेरी किरण घेऊन आले होते. याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या वेळी मला गुरुदेवांकडे नीट पहाताच येत नव्हते; कारण त्यांच्या ठिकाणी पुष्कळ तेज आणि पांढरा प्रकाश दिसत होता.

४. रथोत्सवामध्ये सहभागी असतांना स्वतःचे अस्तित्वच न जाणवणे  : रथ रामनाथीला परत जातांना ‘पुंडलीक वरदे हरि विठ्ठल’ हा गजर करतांना मला पुष्कळ उत्साह आणि आनंद वाटत होता. माझ्या मनात कोणतेच विचार नव्हते. ‘मी पंढरपूरमध्ये आहे. आमच्यासोबत नारायण (विठ्ठल) आहे आणि मी त्याच्यासोबत आनंदाने वैकुंठात जात आहे’, असेच मला वाटत होते. मला माझे अस्तित्वच जाणवत नव्हते. मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते.

५. गुरुदेवांचा जयघोष करतांना मला गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटून ‘गुरुदेव आम्हा सर्व साधकांना मोक्षाच्या वाटेवरून नेत आहेत’, असे वाटत होते.

या अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. अदिती अनिल सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक