‘२४.५.२०२४ (वैशाख कृष्ण प्रतिपदा) या दिवशी ‘देवर्षि नारदांची जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
‘२४.५.२०२४ या दिवशी ‘देवर्षि नारदांची जयंती’ आहे. त्यानिमित्त नारदमुनींच्या विविध गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणारी कविता प्रस्तुत करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत.
पिता ब्रह्मदेव प्रजापति ।
आणि माता देवी सरस्वती ।
बंधु असे दक्ष प्रजापति ।
आणि भगवंत वसे त्यांच्या चित्ती ।। १ ।।
देवर्षि वेचती अनमोल ज्ञानमोती ।
शांत असे त्यांची वृत्ती ।
नारदांची निस्सीम विष्णुभक्ती ।
त्रैलोक्यात त्यांची कीर्ती ।। २ ।।
दिव्य ज्ञानात वसे अनंताची शक्ती ।
आणि अगाध असे त्यांची स्मरणशक्ती ।
त्यांच्या सहवासात येते दिव्यत्वाची प्रचीती
अन् आनंदाची दिव्यानुभूती ।। ३ ।।
ब्रह्मदेवाचे ते मानसपुत्र ।
तया लाभले विष्णुकृपेचे छत्र ।
नारदमुनींचे आदर्श चरित्र ।
धन्य झाले ब्रह्मदेवाचे गोत्र ।। ४ ।।
सरस्वतीचे संस्कारी सुपुत्र ।
देव अन् गंधर्व यांचे हे मित्र ।
भ्रमण करती दिवस-रात्र ।
त्यांस उसंत नसे क्षणमात्र ।। ५ ।।
विरक्तीचे भगवे वस्त्र ।
अन् भक्तीचे भिक्षापात्र ।
हरिनामाचा करूनी गजर ।
नारद करती ब्रह्मांडात मुक्त विहार ।। ६ ।।
ब्रह्मज्ञानी देवर्षि नारद ।
असती संगीतकलेत विशारद ।
त्यांची ज्ञानसंपदा बृहद् (टीप १)।
वाक्पटू चतुरनारद ।। ७ ।।
श्रीविष्णूचे हे उपासक ।
भागवत धर्माचे असती प्रचारक ।
वाल्मिकि ऋषींचे उद्धारक ।
नारद असती प्रल्हादाचे मार्गदर्शक ।। ८ ।।
ते सदैव साधनेत असती आसक्त ।
अन् मोहमायेपासून अलिप्त ।
श्रीविष्णूचे हे परम भक्त ।
नारदमुनी असती जीवन्मुक्त ।। ९ ।।
विष्णुभक्ती अंतर्यामी ।
हे देवगुरु बृहस्पतींचे शिष्य आत्मज्ञानी ।
त्यांची माता वीणापाणि (टीप २)।
सुमधुर रसाळ असे त्यांची वाणी ।। १० ।।
ते अखंड कार्यरत रहाती ।
अन् ज्ञानशक्ती प्रवाहित करती ।
प्रभुचिंतनात मग्न असती ।
सम दृष्टीने सृष्टी पहाती ।। ११ ।।
नारद आपल्या वाक्चातुर्याने ।
सर्वांना भुरळ घालती ।
कौशल्याने कार्य साधती ।
मधुर वाणीने लीला करती ।। १२ ।।
ते आपल्या कीर्तनातून ।
पथभ्रष्टांना सन्मार्गी लावती ।
दुष्टांना धूळ चारती ।
बुद्धीबळाने अधर्माला हरवती ।। १३ ।।
भक्तीरस असे पवित्र ।
सांगे नारदांचे ज्ञानसूत्र ।
वैष्णवांच्या उपासनेचे शास्त्र ।
सांगे नारदांचे भक्तीसूत्र ।। १४ ।।
समष्टी भाव असे अपार ।
नारद लीलांचे सूत्रधार ।
कलागुणांचा करती अविष्कार ।
ज्ञानाचा देती साक्षात्कार ।। १५ ।।
देवांचे हितचिंतक ।
श्रीविष्णूचे संदेशवाहक ।
भक्तांचे साहाय्यक ।
नारद वैदिक सनातन धर्माचे रक्षक ।। १६ ।।
महर्षि व्यासांचे अगाध ज्ञान ।
महाज्ञानी थोर विद्वान ।
महाभारताचे केले लिखाण ।
तरी लाभले न समाधान ।। १७ ।।
हरिलीलांचे करा गुणगान ।
भक्तीमय झाले कृष्णद्वैपायन (टीप ३)।
त्यांनी नारदांस केले प्रणाम ।
आणि व्यासांनी रचले भागवतपुराण ।। १८ ।।
भक्तीचे संपूर्ण समर्पण ।
भावपूर्ण विष्णुस्मरण ।
पाहून भक्ताचे मन दर्पण ।
प्रसन्न झाले श्रीमन्नारायण ।। १९ ।।
भक्तीची छेडूनी तार ।
करती वीणेचा मधुर झंकार ।
नवविधा भक्तीपुष्पांचा गुंफूनी हार ।
झाले हरिनारायणाशी एकाकार ।। २० ।।
भावस्वरांचे रचनाकार ।
भावविश्वात करती संचार ।
हरिनामाचा करती उच्चार ।
सांगती जीवनाचे सार ।। २१ ।।
भाववेडे कीर्तनकार ।
श्रीविष्णूला आवडती फार ।
ते भक्तीचे शिल्पकार ।
करती भगवंताला साकार ।। २२ ।।
नारद असती श्रेष्ठ भागवतकार ।
ते असती ज्योतिषविद्येचे जाणकार ।
नारद असती कीर्तनकार ।
ते असती ‘नारद पुराणाचे’ रचनाकार ।। २३ ।।
धन्य असे नारदांची कीर्तनभक्ती ।
देते समस्त भक्तांना दैवी शक्ती ।
‘आम्हासही लाभो भगवद्भक्ती’।
हीच नारदमुनींच्या चरणी विनंती ।। २४ ।।
कृतज्ञता आणि प्रार्थना : भगवान श्रीविष्णूच्या कृपेने त्याचे परम भक्त देवर्षि नारद यांच्यावर काव्य स्फुरले, त्याबद्दल मी त्याच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे. ‘आम्हा साधकांमध्येही देवर्षि नारदांप्रमाणे निस्सीम कीर्तनभक्ती निर्माण होऊन आमच्याकडूनही सर्वत्र सनातन हिंदु धर्माचा आणि भगवद्भक्तीचा प्रचार होऊ दे’, हीच श्रीहरीच्या चरणी उत्कट प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०२४)
टीप १ – बृहद् : व्यापक
टीप २ – वीणापाणि : माता सरस्वतीच्या हातामध्ये ‘वीणा’ हे सात्त्विक वाद्य आहे. संस्कृतमध्ये ‘पाणि’ म्हणजे हात. त्यामुळे सरस्वतीला ‘वीणापाणि’ असे संबोधले जाते. टीप ३ – कृष्णद्वैपायन : महर्षि व्यासांची कांती काळी होती; म्हणून ‘कृष्ण’, त्यांचा जन्म ‘द्वीप’ म्हणजे बेटावर झाला, तसेच त्यांनी द्वैपायन बेटावर तपश्चर्या केली; म्हणून त्यांना ‘कृष्णद्वैपायन’ असे संबोधले जाते. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |